computer

हा माणूस कोण ? आणि त्याचा फोटो प्रत्येकाच्या टीशर्ट वर कसा पोचला ?

टी-शर्ट पासून ते शहरातल्या भिंतींवर हा चेहरा दिसतो. हा आहे तरी कोण ? खरं तर एवढ्या वर्षात या व्यक्तीचं नाव जाऊन फक्त चेहराच उरला आहे. तरी या चेहऱ्याची ओळख करून देतो. या चेहऱ्याचं नाव आहे ‘अर्नेस्टो चे गेव्हारा’. क्रांतिकारक, सेनानी, नेता, शिक्षणाने आणि व्यवसायाने एक फिजिशियन. दक्षिण अमेरिकेत ६० च्या दशकातल्या धगधगत्या वातावरणात स्वस्त बसून आपलं काम करत राहणं शक्यच नव्हतं. एका तरुण तडफदार व्यक्तीला तर नाहीच नाही. त्यामुळे आपलं शिक्षण व्यवसाय सोडून हा तरुण येऊन पडला क्रांतीत. दक्षिण अमेरिकेतल्या त्या क्रांतिकारी युगाचं प्रतिक म्हणजे चे गेव्हारा.

पण चे गेव्हारा हा व्यक्ती सामान्य माणसाला फारसा माहिती नाही. तरी तो क्रांतीत, मोर्चात आणि तरुणांच्या कपड्यांवर दिसतो. ही किमया कशी साधली गेली ? या मागचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही या लेखातून करणार आहोत.

चे गेव्हारा खऱ्या अर्थाने जगभर पोहोचला तो त्याच्या या छायाचित्राने. या छायाचित्राचं नाव आहे “गुरील्लेरो हिरोईको”. ज्याचा सोप्पा अर्थ होतो “वीर गनिमी (गुरील्ला) योद्धा”. आज हा फोटो एका व्यक्तीचा फोटो न राहता एक प्रतिक बनलं आहे. सर्वात आधी या फोटोग्राफची पार्श्वभूमी जाणून घेऊ या.

क्युबाचं स्वातंत्र्य आणि ‘चे’ :

क्युबाला बटिस्टाच्या राजवटीपासून मुक्त करण्याची मोहीम १९५३ पासून सुरु झाली होती. तसं पाहायला गेलं तर क्युबा हा आधी स्पेनच्या आणि नंतर अमेरिकन भांडवलदार व क्युबन जमीनदारांच्या तावडीत सापडलेला देश होता. या देशाला क्रांतीची वाट दाखवली ती फिडेल कॅस्ट्रो या क्रांतीकारकाने. १९५३ साली त्याने पाहिलं बंड केलं, पण ते सपशेल फासलं. पुढे १९५९ साली फिडेल त्याचा भाऊ राउल कॅस्ट्रो आणि त्यांना येऊन भेटलेला आर्जेन्टिनाचा क्रांतिकारी ‘चे गेव्हारा’ यांनी मिळून ही क्रांती यशस्वी करून दाखवली. अनेक वर्षांच्या भांडवलदारांच्या घशातून क्युबा स्वतंत्र झाला होता.

१९६० साली क्युबाच्या क्रांतीला १ वर्ष पूर्ण झालेलं असताना ४ मार्च रोजी एक दुर्घटना घडली (किंवा घडवण्यात आली). क्युबाच्या हवाना समुद्र किनाऱ्यावर उभ्या असलेल्या फ्रेंच ‘ला कॉब्रा’ या मालवाहू नौकेत स्फोट झाला. या दुर्घटनेत जवळजवळ १०० लोक मारले गेले. फिडेल आणि तत्कालीन सरकारने या घटनेमागे अमेरिकन गुप्तचर संघटना CIA चा हात असल्याचा आरोप केला.

(फिडेल कॅस्ट्रो)

या काळात चे गेव्हारा हा क्युबाचा उद्योगमंत्री होता. घटना घडली तेव्हा त्याने ताबडतोब घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली. ५ मार्च रोजी फिडेल कॅस्ट्रो यांनी हवाना मध्ये एक मोठा मोर्चा काढला. ज्या ठिकाणी मृतांना दफन करण्यात आलं त्याच दफनभूमीवर त्यांनी पहिल्यांदा “मातृभिमी किंवा मृत्यू” हे गाजलेले शब्द पहिल्यांदा उच्चारले.

या शोकसभेत फिडेल कॅस्ट्रो यांचा एक फोटोग्राफर जमलेल्या मान्यवरांना कॅमेऱ्यात टिपत होता. या फोटोग्राफरचं नाव होतं ‘अल्बर्टो कोर्दा’. अल्बर्टोची नजर चारी दिशांना फिरत एकेका व्यक्तीला टिपत होती. त्याचवेळी त्याला काही सेकंदासाठी चे गेव्हारा दिसला. चे गेव्हाराच्या चेहऱ्यावर असलेले त्यावेळचे भाव बघून त्याने जराही वेळ न दवडता तो क्षण कॅमेऱ्यात टिपला. त्याने २ फोटोग्राफ्स घेतले. एका फोटोग्राफ मध्ये चे गेव्हाराच्या बाजूला एक व्यक्ती आहे तर दुसऱ्या बाजूला एक झाड दिसत आहे. दुसऱ्या फोटोग्राफ मध्ये चे च्या मागे एक माणूस दिसत आहे.

अल्बर्टोला त्यावेळी हे लक्षात आलं होतं की आपण एक ‘आयकॉनिक’ फोटोग्राफ टिपला आहे. त्याने पुढे चे चा पहिल्या फोटोग्राफ मधल्या अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या. मूळ फोटोला थोडं तिरकं केलं. यानंतर त्याने फोटोला फ्रेम करून ते भिंतीवर लावलं. हाच तो चे गेव्हाराचा प्रसिद्ध फोटो “‘गुरील्लेरो हिरोईको”.

 

मंडळी, आज जशी एखादी गोष्ट व्हायरल होते तसा हा फोटो लगेचच जगभर गाजला नव्हता. त्याला आजचं रूप मिळायला थोडा काळ जावा लागला.

पहिली प्रसिद्धी :

९ ऑक्टोबर, १९६७ साली चे ला बोलिव्हियाच्या क्रांतीत पकडण्यात आलं आणि त्याला लगेचच गोळ्या घालण्यात आल्या. अवघ्या ३९ व्या वर्षी त्याला मरण आलं. त्याच्या मृत्युनंतर त्याच्याजवळच्या बोचक्यात एक डायरी सापडली. या डायरीत त्याने बोलिव्हियाच्या आठवणी लिहून काढल्या होत्या. त्याच्या मृत्युनंतर एका प्रसिद्ध प्रकाशन संस्थेच्या मालकाने ही डायरी प्रसिद्ध करण्याचं ठरवलं. यासाठी त्याने क्युबाच्या सरकारी अधिकाऱ्यांना गाठून चे गेव्हाराचं एक चांगलं छायाचित्र मागितलं. अधिकाऱ्यांनी त्यांना अल्बर्टो यांचा पत्ता दिला.

यानंतर प्रकाशक सरकारचं पत्र घेऊन जाऊन पोहोचले अल्बर्टो यांच्याकडे. अल्बर्टो यांना जेव्हा याबद्दल समजलं तेव्हा त्यांच्या समोर एकंच फोटोग्राफ आला. त्यांनी लगेचच १९६० सालच्या शोकसभेतले फोटोग्राफ्स प्रकाशकांना दाखवले. त्यांना ते आवडलेही. प्रकाशकांनी अल्बर्टो यांच्याकडे २ प्रिंट मागितल्या. जेव्हा पैशांच्या देवाणघेवाणीची वेळ आली तेव्हा अल्बर्टो यांनी आपण हे आपल्या मित्रासाठी करतोय असं सांगून पैसे नाकरले.

प्रकाशक साहेबांनी पुस्तकावर चे चा हा फोटो तर छापलाच शिवाय पुस्तकाच्या प्रचारासाठी पत्रकं छापली. अशा शंभर-एक पत्रकांवर चे चा चेहरा छापण्यात आला होता. पुस्तक जगभर प्रसिद्ध झालं. पण या पुस्तकात कुठही अल्बर्टो कोर्दा यांचं नाव नव्हतं. त्याऐवजी प्रकाशकांनी स्वतःच्या प्रकाशन संस्थेच्या नावावर सर्व हक्क सुरक्षित केले. या घटनेतून एक मात्र झालं. पुस्तक आणि चे चा चेहरा जगभर पोहोचला. अल्बर्टो यांनी पुढे प्रकाशकांना माफही केलं. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं, की जर प्रकाशकांनी या फोटोच्या प्रत्येक कॉपीसाठी एक लिरा (तुर्किश चलन) जरी दिलं असतं तरी मी मिलियन्स कमावले असते.

(अल्बर्टो कोर्दा)

अल्बर्टो यांनी या प्रकाशकांकडूनच नव्हे तर कोणाकडूनही या फोटोग्राफसाठी कधीच एक दमडी घेतली नाही. इतकंच नाही तर आज या फोटोचे हक्क त्यांच्या नावावर नाहीत. त्यांनी हा फोटो लोकांना बहाल केला आहे. २००१ साली त्यांच्या मृत्युपर्यंत त्यांचा हा अट्टाहास होता की या फोटोचा वापर कोणत्याही व्यावसायिक फायद्यासाठी होऊ नये. ते हयात असताना स्मिरनॉफ या वोडका कंपनीने चे चा फोटो असलेली वोडका बाजारात आणली होती. अल्बर्टो यांना हे आवडलं नाही. त्यांनी स्मिरनॉफ कंपनीला कोर्टात खेचलं. निकाल अल्बर्टो यांच्या बाजूने लागला. भरपाई म्हणून त्यांना ५०,००० युएस डॉलर्स मिळाले. हे पैसे त्यांनी क्युबाच्या आरोग्य क्षेत्राला दान केले. शेवटी यावर त्यांनी एवढंच म्हटलं की आज चे असता तर त्यानेही हेच केलं असतं.

चळवळीत गनिमी हिरो :

मायकल जे जेसी याने या फोटोग्राफचा इतिहास सांगणारं ‘Che's Afterlife: The Legacy of an Image’ हे पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाच्या नावातच चे चं मरणोत्तरचं आयुष्य नमूद करण्यात आलं आहे, यातच सगळं आलं. चे ने क्युबन क्रांतीनंतर दक्षिण अमेरिकेत (लॅटिन अमेरिकेत) क्रांती पोहोचवण्याचं काम सुरु केलं आणि त्यातच त्याला मरण आलं. पण तो जिवंत जरी नसला तरी त्याच्या तस्बिरीने त्याची कमतरता भरून काढली आहे.

फ्रान्सच्या १९६८ सालच्या विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या दंगलीत चे चा चेहरा दिसला होता. डॅनियाल मार्क या विद्यार्थी सेनेच्या नेत्याने ‘बोलीव्हीयन डायरी’वर असलेल्या चे चा चेहरा वापरून तत्कालीन सरकारची झोप उडवली होती. यानंतरही अनेक चळवळी, मोर्चे इत्यादीत चे चा चेहरा दिसला. आपण असं म्हणू की जिथे लोकांमध्ये अस्थिरता होती तिथे तिथे चे हा उपस्थित होता.

आजचं स्वरूप :

‘गुरील्लेरो हिरोईको’ला पहिल्यांदा वेगळ्या शैलीत मांडण्याचं श्रेय जातं जिम फिट्जपॅट्रिक या आयरिश कलाकाराला. त्याने अल्बर्टोच्या फोटोग्राफला आपल्या शैलीतून ‘लार्जन दॅन लाईफ’ करण्याचं काम केलं. त्याने चे चे डोळे थोडे वरच्या दिशेला वळवले आणि आपली छाप सोडण्यासाठी खांद्यावर तिरका ‘एफ’ (F) रंगवला. तुमच्याकडे जर चे चा चेहरा असलेला टी-शर्ट असेल तर त्यावरून तुम्ही सहज ओळखू शकाल की हे जिम फिट्जपॅट्रिकचं काम आहे की नाही.

हा पाहा जिम फिट्जपॅट्रिकने तयार केलेला ‘गुरील्लो हिरोईको’.

मंडळी, ज्या अमेरिकेवर चे च्या खुनाचा ठपका लावला जातो त्या अमेरिकेत त्याच्या फोटोने त्याच्या मृत्युनंतर पुढच्याच वर्षी (१९६८) प्रवेश केला. एका मासिकाच्या जाहिरातीसाठी हा चेहरा असलेले पोस्टर्स छापण्यात आले होते. हे पोस्टर्सनी अमेरिकन भरून गेला होता. अशा प्रकारे तो अमेरिकेतही पोहोचला.  

या फोटोत असं काय आहे असा प्रश्न पडणं साहजिक आहे. ज्या दुर्घटनेच्या वेळी हा फोटोग्राफ घेण्यात आला त्या घटनेचा परिणाम असेल किंवा मनात धगधगत असलेल्या क्रांतीमुळे असेल, फोटो मध्ये  चे गेव्हाराच्या चेहऱ्यावर एकाच वेळी वेदना, राग आणि क्रांतीची ज्वाळा भडकलेली दिसत आहे. असा हा फोटोग्राफ अस्वस्थ तरुणांमध्ये गाजला नसता तरच नवल.

यावर्षी ‘गुरील्लेरो हिरोईको’ला ५९ वर्ष पूर्ण होतील. इतिहासात या फोटोला सर्वात प्रसिद्ध फोटोग्राफ म्हटलं गेलं आहे आणि त्याही पुढे जाऊन या फोटोला म्हणजे २० व्या शतकाचा चेहरा असल्याचं म्हटलं जातं.  

मंडळी, एका व्यक्तीच्या छायाचित्राने जगाच्या इतिहासात एवढी खळबळ माजवल्याचं इतिहासत दुसरं उदाहरण आढळत नाही !!

सबस्क्राईब करा

* indicates required