शनिवार स्पेशल : भारतीय सैन्याने फत्ते केलेला तिसरा सर्जिकल स्ट्राईक...वाचा संपूर्ण माहिती !!
फेब्रुवारीच्या १४ तारखेला पुलवामाचा हल्ला झाला. त्यानंतर २६ फेब्रुवारीला भारताने जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं. पुढच्या काही दिवसात भारताचे पायलट अभिनंदन वर्तमान पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचं समजलं. काही दिवसातच ते सुखरूप भारतात परतले. फेब्रुवारीत अशा सर्व एकापाठोपाठ एक घटना घडत होत्या.
१४ तारखेपासून देशाचं लक्ष भारत पाक सीमेवर काय घडतंय याकडे होतं. पण त्याच दरम्यान भारताच्या पूर्वेच्या आघाडीवर भारतीय सेना आणखी एका सर्जिकल स्ट्राईक मध्ये गुंतली होती हे कोणालाच माहित नव्हतं. माहित तरी कसं असणार म्हणा, ही मोहीम अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती.
आता ही मोहीम फत्ते झाली असल्याने त्याबद्दल बोलायला काही हरकत नाही. आज आम्ही शनिवार स्पेशल मध्ये भारताच्या तिसऱ्या सर्जिकल स्ट्राईकचा संपूर्ण लेखाजोखा देणार आहोत.
चला तर एकेक करून माहिती जाणून घेऊया.
सर्जिकल स्ट्राईक ३.० च्या मागची कहाणी.
बंगालच्या खाडी मध्ये एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाला ‘कालडन मल्टी-मॉडल ट्रांझिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट’ नाव देण्यात आलंय. या प्रकल्पातून पश्चिम बंगाल – म्यानमार (म्हणजे आपला ब्रम्हदेश) – मिझोरम असा एक नवीन मार्ग बांधण्यात येणार आहे. पहिला टप्पा असेल पश्चिम बंगालच्या हल्दिया पोर्टपासून ते म्यानमारच्या दक्षिण किनाऱ्या जवळच्या सित्वे पोर्ट पर्यंत. दुसरा टप्पा हा सित्वे पोर्ट पासून म्यानमारच्या कालडन नदीतून म्यानमारच्या पालेत्वा पर्यंत असेल. तिसरा टप्पा हा पालेत्वाला मिझोरामशी जोडणारा असेल.
या प्रकल्पातून रस्ते आणि समुद्रातून नवीन शिपिंग मार्ग तयार करण्यात येतील. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मिझोरम आणि म्यानमार मधलं अंतर १००० किलोमीटरने कमी होईल. हा पाहा प्रकल्पातील संपूर्ण भाग.
सर्जिकल स्ट्राईक ३.० मागे कारण काय ?
मंडळीं, नकाशावरून हा केवढा मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हे तुम्हाला समजलंच असेल. एकीकडे हा प्रकल्प उभा राहत असताना म्यानमारची अतिरेकी संघटना अराकान आर्मीने प्रकल्पाला नुकसान पोहोचवण्याची योजना आखली होती. नावात ‘आर्मी’ असलं तरी ही एक दहशतवादी संघटना आहे. काचीन इंडिपेंडन्स आर्मी, अराकान रोहिंग्या सॅल्व्हेशन आर्मी, अराकान आर्मी, नागा ग्रुप अशा नावात आर्मी असलेल्या दहशतवादी संघटना सध्या भारत आणि म्यानमार सीमेवर कार्यरत आहेत. यापैकी काचीन इंडिपेंडन्स आर्मी सर्वात मोठी संघटना समजली जाते. याच संघटनेने इतर संघटनांना ट्रेनिंग दिली आहे.
मोहीम कशी राबवण्यात आली ?
भारताला या अतिरेक्यांच्या योजनेचा सुगावा लागल्यानंतर भारताने त्याचा पाठपुरावा केला. बातमी पक्की असल्याचं समजताच अतिरेक्यांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या कामात म्यानमारच्या सैन्याला पण सामील करण्यात आलं.
मोहिमेच्या सुरुवातीला भारतीय सैन्याने मिझोरम भागातून दहशतवाद्यांची सफाई केली. दुसऱ्या टप्प्यात म्यानमारच्या सैन्यासोबत मिळून अराकान आर्मीचे तळ उध्वस्त करण्यात आले. भारतासाठी ही मोहीम फार महत्वाची होती, कारण दहशतवाद्यांनी मिझोरम भागात आपला कायमस्वरूपी तळ ठोकण्याची योजना आखली होती. हे जर शक्य झालं असतं तर भारतासाठी एक नवीन डोकेदुखी निर्माण झाली असती.
(म्यानमारचं सैन्य)
१७ फेब्रुवारीला सुरु झालेली ही मोहीम २ मार्च पर्यंत सुरु होती. जमिनीवरून आणि हवेतून अशा दोन्ही मार्गाने ही मोहीम फत्ते करण्यात आली.
मंडळी, भारतीय सैन्याच्या या नवीन विजयाबद्दल तुम्ही काय म्हणाल ? कमेंट्स येउद्या भाऊ !!