मनरेगा आणि अन्न सुरक्षा योजना भारताला देणारा, झोपडपट्टीत राहणारा आणि सायकलवर फिरणारा अर्थशास्त्रज्ञ!! यांची कहाणी तर वाचा..
अर्थशास्त्रज्ञ म्हटला म्हणजे आपल्यासमोर सुटबुटात जगभरच्या महत्वाच्या कॉन्फरन्समध्ये बोलणारा, हातात कागदपत्रांचे ढीग असणारा, चेहऱ्यावरच विद्वत्ता झळकते असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. टापटीप राहणे काही गैर नाही आणि मुळात 'अर्थ' शास्त्रज्ञ असलेला माणूस गरिबासारखा वावरेल तर कसे चालेल हे ही म्हणता येईल. पण भारतात असाही एक अर्थशास्त्रज्ञ आहे ज्यांनी देशासाठी दिलेले योगदान बघितले तर त्यांच्याबद्दल परम आदर निर्माण होईल.
विशेष म्हणजे भारतीय गरिबी निर्मूलनाच्या कामासाठी ज्या दोन योजना सर्वात महत्वाच्या मानल्या जातात, त्या मनरेगा आणि अन्न सुरक्षा योजना या दोन्ही योजनांना तयार करण्यात या अर्थशास्त्रज्ञाचा मोलाचा वाटा होता. असा हा ज्ञानी शास्त्रज्ञ कुठे राहत असावा? तर ते अतिशय सर्वसामान्य परिस्थितीत जगतात. ना कोणती कार, ना कोणता बंगला. झोपडपट्टीत राहणे आणि सायकलवर फिरणे असे त्यांचे जीवन सुरू आहे.
ज्यां ड्रेज असे या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाचे नाव आहे. त्यांचा रस्त्याच्या कडेला बसून सर्वसामान्य लोकांबरोबर बसून जेवत असतानाच फोटो मध्यंतरी व्हायरल झाला होता. पण अजूनही देशातील बहुतांश जनतेला त्यांच्याबद्दल माहिती नाही. १९५९ साली बेल्जियम येथे एका प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाच्या घरी जन्म, १९७९ साली वयाच्या विसाव्या वर्षी भारत गाठणे आणि नंतर भारतालाच स्वतःचे घर बनवणे असा त्यांचा एकूण प्रवास आहे.
त्यांचा सामान्य लोकांबरोबर बसून रस्त्यावर जेवतानाचा फोटो हा जंतरमंतर येथे एका आंदोलनादरम्यान काढण्यात आला होता. जंतरमंतरवर ज्यां देखील आंदोलनाला बसले होते. यावेळी एका गुरुद्वाराहुन या लोकांसाठी जेवणाची गाडी आली. ज्यां यांनी एक कटोरा घेतला आणि तो हातात धरून जेवायला बसले. त्यांना ज्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पोटभर जेवण देऊन केले, तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक दोन पोळ्या खात असताना आपण कसे पोटभर जेवावे? असे उत्तर त्यांनी दिले होते.
ज्यां यांनी दिल्ली येथील इंडियन स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूटमधून आपली पीएचडी पूर्ण केली आहे. भारतात आल्यावर त्यांनी इथली गरिबी आणि सामान्य लोकांचे होणारे हाल बघितले आणि आपले आयुष्य या लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी व्यतित करायचा निर्णय घेतला. यासाठी ते शक्य असेल तो प्रत्येक मार्ग वापरत असतात.
डॉ. मनमोहन सिंग देशाचे प्रधानमंत्री असताना नॅशनल ऍडव्हायजरी कमिटीचे ते सदस्य होते. ही कमिटी अतिशय वरच्या स्तरावरील असल्याने त्यांचे काम किती मोठ्या स्तरावर पोहोचले होते यांचा अंदाज येऊ शकतो. सरकारसोबत महत्वाची योजना तयार करण्यापासून तर सरकारविरुद्ध आंदोलन करून सरकारला एखादी योजना तयार करण्यासाठी धारेवर धरण्यापर्यंत ते सतत कार्यरत असतात.
ज्यां गेली ३० वर्ष लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच अनेक महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये शिकविण्यासाठी जात असतात. अर्थशास्त्र विषयावर आजवर त्यांनी १२ पुस्तके लिहिली आहेत. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेल विजेते शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या बरोबर देखील त्यांनी हंगर अँड पब्लिक ऍक्शन नावाचे पुस्तक लिहिले आहे. एवढेच नव्हे, तर अर्थशास्त्रावर जवळपास त्यांचे १५० रीसर्च पेपर प्रकाशित झालेले आहेत.
अलाहाबाद विद्यापीठात येथे निवासी प्राध्यापक असताना ते झोपडपट्टी ते विद्यापीठ असा प्रवास सायकलने करत असत. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असलेला हा माणूस सायकलने प्रवास करतो हे अनेकांसाठी विशेष होते. ज्यां यांची संपूर्ण मांडणी ही भारतातील भूक समस्या, महिला आणि बालकांचे स्वास्थ्य, शिक्षण, स्त्री पुरुष समानता याविषयी प्रामुख्याने असलेली दिसून येते.
२००२ साली थोडे उशिरानेच ज्यां यांना भारताचे नागरिकत्व मिळाले असले तरी त्याआधी कित्येक वर्षांपासून ते भारतातील गरिबी निर्मूलन कामात संपूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी अन्न हक्कांसाठी एक मोर्चा आयोजित केल्यावर त्यांना अटक करण्यात आली होती. सध्या ज्यां झारखंड येथे त्यांची पत्नी बेला भाटिया यांच्यासोबत झोपडपट्टीतच राहत आहेत