computer

विश्व-विक्रम स्थापन करणारे गिर्यारोहक वैभव ऐवळे आषाढीच्या वारीत काय करत होते ??

गिर्यारोहक म्हणून वैभव पांडुरंग ऐवळे याची ओळख त्याच्या लेखातून बोभाटाच्या वाचकांना आहेच.भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो सर करून ७२ भारतीय ध्वजांचे ध्वज-तोरण फडकावून विश्व-विक्रम स्थापित केला.पण आज आम्ही वैभवने नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीत काही नवा उपक्रम केला त्याची माहिती देत आहोत. वैभव सोलापूर जिल्ह्यातल्या संगोली येथील वाढेगावातला,म्हणजे पंढरपूर जवळच्याच गावातला त्यामुळे  बऱ्याच वेळा चंद्रभागेत डुबकी मारून माऊलीचे दर्शन घेतले आहे. पण,वारीला जाण्याचा योग कधी आला नाही. वारी करावी असे नेहमी वाटत होते. यावर्षी एका सामाजिक संकल्पनेचा पाठपुरावा करण्यासाठी त्याने वारीत सहभाग घेतला. काय होती ती संकल्पना ? त्याच्याच शब्दात वाचूया !

अवयवदानाचे महत्व सर्वसामान्य लोकांना कळावे याकरीता आम्ही यंदाची वारी केली. वारीमध्ये चालत असताना दिंडीतील सर्व वारकऱ्यांना आम्ही अवयव दानाचे महत्व पटवून दिले आणि त्यांना अवयवदान कसे करावे याची सविस्तर माहिती दिली. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवूया! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी आम्ही यंदा पंढरीची वारी केली.
 

आजच्या तारखेस शहरात राहणार्‍यांच्या मनात पण अवयवदानाबद्दल अनेक समज -गैरसमज आहेत. वारीत तर आमच्यासोबत असणारे वारकरी तर खेड्यातून आलेले होते.त्यापैकी पन्नाशीच्या पुढे गेलेल्या वारकर्‍यांना आम्ही अवयवदानाचे महत्व समजावून सांगीतले तेव्हा त्यांच्या अविर्भावातून थोडीशी भिती- थोडी शंका जाणवली. या उलट वारीत नव्याने सामील झालेल्या तरुणांनी मात्र अवयवदानाबद्दल उत्सुकता दाखवली. बर्‍याचजणांनी लिंक मागून घेतल्या. अर्थातच ही आमच्या उपक्रमाची सुरुवात आहे त्यामुळे लगेच काही घडेल असे नाही पण आम्ही सुरुवात केली याचे आम्हाला समाधान आहे. आता या अवयवदानाची थोडीशी माहिती  बोभाटाच्या वाचकांसाठी देत आहोत.
अवयवदान म्हणजे काय? 
जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू डेड होतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरिरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरिरातील किडनी, यकृत डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडणी मिळते तर कुणाला डोळे! किडनी, लिव्हरमुळे जीवनदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.
अवयवदान कुणीही करू शकते. आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. मुलाने वडिलांना किडनी दिली. बहिणीने भावाला दिली. मुलाने वडिलांना यकृत दिले. अवयवदानाला ना जात आडवी येते ना धर्म! म्हणूनच अवयवदान हे जात-धर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अवयवदानाची प्रक्रिया सोपी आहे. अवयवदानाचा फॉर्म भरला असेल तर, एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास, किंवा एखादा ब्रेनडेड झाल्यास नातेवाईकांच्या इच्छेनुसार सहा तासाच्या आत अवयवदान करता येते. किमान तीन वर्षे ते अधिक वयाच्या व्यक्तीचे अवयवदान केले जाऊ शकते. म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्यांसाठी अवयवदान करुन त्यांचे जीवन समृद्ध करूया. अवयवदानाचा फॉर्म भरुया!

सबस्क्राईब करा

* indicates required