computer

हा अपघात झाला आणि विमानसेवेला पर्यायी सेवा कधी येऊ शकली नाही...हेडेनबर्ग अपघातात नेमकं काय घडलं?

रस्त्यावर चालणाऱ्या वाहनात आजकाल किती तरी प्रकार पाहायला मिळतात. पाण्यातून चालणाऱ्या जहाजातही अनेक प्रकार आहेत. पण आकाशात उडणाऱ्या विमानाच्या बाबतीत मात्र असे फार प्रकार पाहायला मिळत नाहीत. खरेतर विमानाला पर्याय म्हणून एअरशिप हा एक वेगळा आणि अलिशान सफारीचा आनंद देणारे वाहन बनवण्याचा प्रयत्न १९ व्या शतकापासूनच सुरू होता. विमानाला पंख असतात, तर एअरशिप हे एखाद्या लंबगोलाकार फुग्याप्रमाणे असते. त्यात कमी घनता असलेली हवा भरली जाते आणि त्यामुळे हे जहाज आकाशातही स्थिर राहू शकते. आज आम्ही अशाच एका एअरशिपच्या प्रयोगाची माहिती खास बोभाटाच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत..

जर्मनीच्या डॉयचे जेपलिन कंपनीने मोठ्या आकाराच्या आणि प्रवाशांसाठी सर्व अलिशान सोयीनीयुक्त अशा एअरशिपची निर्मिती केली होती, त्याला नाव दिलं होतं- हिडेनबर्ग!! ८०३.८ फुट लांब आणि १३५.१ फुट व्यास असलेल्या या प्रचंड मोठ्या एअरशिपमध्ये प्रवाशांसाठी खूप चांगल्या सुविधा देण्यात आल्या होत्या. यामध्ये ७२ बेड होते, शिवाय स्वातंत्र्य डायनिंग रूम, मोठमोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटसमध्ये विश्रांती घेण्यासाठी एक मोठा हॉल म्हणजेच लाउंजदेखील होता, ग्रंथालय, स्मोकिंग करणाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन, मोकळ्या हवेत फिरण्यासाठीही एक विशेष जागा ठेवण्यात आली होती. अशा अनेक सोयीनी युक्त असणारे हे हेडेनबर्ग एअरशिप विमानसेवेला एक चांगला पर्याय ठरले असते, पण दुर्दैवाने ६ मे १९३७ रोजी हेडेनबर्ग एअरशिपचा गंभीर अपघात झाला आणि विमानसेवेला पर्याय निर्माण होण्याची शक्यताच धुळीस मिळाली.

हेडेनबर्गच्या आतले सर्व फर्निचर अल्युमिनियमचे बनवलेले होते, तर याची बॉडी ड्युरालियम पासून बनवलेली होती. याच्या मागच्या बाजूला बसवण्यात आलेल्या एअरबॅग्जमध्ये हायड्रोजन भरण्यात आला होता. हेलियम हा वजनाने सर्वात हलका वायू असला तरी त्याकाळी जर्मनीला हा महागडा वायू विकत घेणे परवडणारे नव्हते म्हणून हेडेनबर्गमध्ये हायड्रोजनचाच वापर केला जात होता.

दुर्घटनाग्रस्त होण्याआधी हेडेनबर्गने ६३ वेळा यशस्वी उड्डाण केले होते. ६४व्या उड्डाणाच्या वेळी मात्र या विशाल हवाई जहाजाचा अंत झाला. हेडेनबर्गने ३ मे १९३७ जर्मनीच्या फ्रांकफुर्ट विमानतळावरून उड्डाण केले. हवेतही ताशी ८० किमी वेगाने धावणारे हे एअरशिप १२ तासात न्यू जर्सीला पोहोचेल अशी अपेक्षा होती. हेडेनबर्गने फ्रांकफुर्टवरून हवेत उड्डाण तर केले, पण पुढे काही तरी अघटीत घडणार आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यादिवशी वातावरणात काहीतरी बदल झाला होता. त्यामुळे हेडेनबर्गला आपले अंतर अपेक्षित वेगाने कापता येत नव्हते. फक्त बारा तासांत आपल्या इच्छित स्थळी पोहोचेल अशी अपेक्षा असणारे हे एअरशिप चोवीस तास उलटले तरी अर्ध्या रस्त्यातच होते. ६ मे रोजी हे एअरशिप न्यू जर्सीच्या जवळ पोहोचले, मात्र त्या दिवशी न्यू जर्सीमध्ये वादळ घोंगावत होते. वादळामुळे हेडेनबर्ग उतरवणे खूपच जिकीरीचे वाटत होते. वादळ निवळेपर्यंत एअरशिपचे कॅप्टन मॅक्स पृस आणि इतर अधिकाऱ्यांनीही हेडेनबर्गला हवेतच तरंगत ठेवण्याचे ठरवले.

संध्याकाळी सात वाजले तरी वाऱ्याचा जोर काही कमी होत नव्हता. हेडेनबर्गचे लँडिंग करण्यात आधीच खूप उशीर झाला होता. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला नेत एक जोराचा हिसडा देत हेडेनबर्गचे लँडिंग करायचे असे ठरवून कॅप्टन मॅक्सने हेडेनबर्गला वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला नेत खाली जमिनीकडे झेप घेतली. एअरशिपचे लँडिंग करण्यापूर्वी खाली दोऱ्या सोडल्या जातात आणि जमिनीवरील क्रू मेंबर्स या दोरीच्या सहाय्याने एअरशिपला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असत. हेडेनबर्ग जमिनीपासून १८० फूट उंचावर असताना त्याच्या लँडिंग लाईन्स म्हणजेच नियंत्रण करणाऱ्या दोऱ्या खाली सोडण्यात आल्या होत्या.

खालचे क्रू मेंबर्स हेडेनबर्गला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते, इतक्यात त्याच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला आणि मागचा सगळा भाग खाली कोसळला. हेडेनबर्गचा तोल गेल्याने पुढचा भाग खाली येण्याऐवजी वर उचलला गेला. एखादा व्हेल मासा पाण्यात उसळी घ्यावा तसा हा पुढचा भाग सुमारे १०० फूट उंचावर गेला आणि वेगाने खाली कोसळला. हेडेनबर्गमधून त्यावेळी ९७ लोक प्रवास करत होते. यातील काही लोकांनी हेडेनबर्गला आग लागलेली पाहताच खिडकीतून खाली उड्या घेतल्या. ९७ पैकी ६२ लोक जिवंत राहिले, पण त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उरलेले ३५ जण या आगीत भस्मसात झाले. खालून हेडेनबर्गला नियंत्रित करू पाहणाऱ्या एका क्रू मेंबरच्या अंगावर हेडेनबर्गचा जळता तुकडा पडल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. अशा रीतीने या अपघातात एकूण ३६ लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.

महाकाय हेडेनबर्गचा सांगाडा अवघ्या काही क्षणांत जळून खाक झाला होता. या अपघाताने सगळेच हादरून गेले. एअरशिपने प्रवास करण्याच्या कल्पनेनेही लोकांना घाम फुटू लागला.

रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांचेही कित्येक अपघात होत असतात म्हणून कुणी वाहननिर्मिती बंद केली नाही. समुद्रातून प्रवास करणाऱ्या टायटॅनिकचा अपघात तर अनेकांच्या स्मृतीपटलावर कोरला गेला आहे, तरीही कुणी जलप्रवास आणि जहाजबांधणी करण्याचे सोडून दिलेले नाही. एअरशिपच्या बाबतीत मात्र असे झाले नाही. या एका अपघातानंतर संपूर्ण एअरशिपच्या क्षमतेवरच प्रश्न निर्माण झाला. त्यातही हायड्रोजन वापरून चालणारे एअरशिप म्हटले की, लोक दचकतातच. या भीषण अपघाताने एअरशिप प्रवासाची शक्यताच धुळीस मिळवली. म्हणूनच तर आकाशातील विमानांची मक्तेदारी अजूनही संपलेली नाही.

या अपघाताने एअरशिपच्या निर्मितीलाच खीळ बसली. ज्यामूळे हवाई प्रवासात कसले ते वैविध्यच राहिले नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required