'पॉलिएथिलीन'च्या गाळापासून बनलेल्या टप्परवेअर आणि Tupperware® होम पार्टीच्या जन्माची कहाणी!!
हा माणूस कोण आहे बॉ? असा तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर ते प्लास्टीकचे डब्बे आठवा, जे ऑफीसात विसरल्यावर तुम्ही घरच्यांची नको नको अशी बोलणी सहन केली आहेत. तर हाच तो माणूस ज्यानी 'टप्परवेअर' ची निर्मिती केली. याचं नाव अर्ल टपर आणि आपल्या भारतात 'टप्परवेअर' हवेच असा ट्रेंड निर्माण करणार्या 'टपरवेअर' कंपनीचा संस्थापक!
अर्ल टपर 'ड्यू पॉन्ट' या कंपनीत काम करत होता. ड्यू पॉन्टमध्ये काम करताना त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टीक आणि त्यांचे गुणधर्म याचा बराच अभ्यास केला. १९३८ साली त्याने अर्ल टपर या कंपनीची स्थापना केली. दुसर्या महायुध्दाच्या काळात 'गॅस मास्क' आणि त्याच्या सुट्याभागाची निर्मिती त्याची कंपनी करत असे.
महायुध्द संपल्यावर काय करायचे, असा प्रश्न मनात आल्यावर त्याने शांततेच्या काळात प्लास्टिकपासून काय बनवता येईल त्याचा विचार सुरु केला. थोड्याच दिवसांत त्याने 'पॉलिएथीलीन'च्या स्लॅग(गाळ)पासून एक नव्या प्रकारचे प्लास्टिक शोधून काढले. हे नवे प्लास्टिक मजबूत होतेच, पण लवचिकही होते. इतकेच नव्हे तर हे प्लास्टिक तेला-तूपापासून अलिप्त होते. या नव्या प्लास्टिकला त्याने डोळ्यांत भरतील अशा रंगांची जोड दिली. त्यातूनच निर्मिती झाली टपरवेअरच्या डब्ब्यांची! १९४६ साली त्याने Tupperware® या ब्रँडची नोंदणी करून बाजारात विक्री सुरु केली.
हे नवे डबे दिसायला आकर्षक होते. त्यांचे डिझाईनही वेगळे होते. हवाबंद असल्याने आतले पदार्थ आहे तसे म्हणजे उदाहरणार्थःकुरकुरीत रहायचे. लवचिक असल्याने तूटफूटही होत नसे. इतके सगळे असूनही या वस्तूंचा खप वाढत नव्हता. विक्री वाढवण्यासाठी Tupperware®ने स्टॅनली होम प्रॉडक्ट या कंपनीच्या एका महिलेची मदत घेतली. ब्राउनी मे हंफ्रे नावाच्या या महिलेने काही नव्या कल्पना अर्ल टपरसमोर मांडल्या.
(ब्राउनी मे हंफ्रे)
त्याची मध्यवर्ती कल्पना "If we build the people, they'll build the business." अशी होती. महिलांनीच महिलांना या प्रॉडक्टची माहिती द्यायची, ती कशी वापरावीत हे समजावून सांगावे आणि त्यातून त्यांना चार पैसे मिळावेत. अशी सुरुवात झाली Tupperware® होम पार्टीची!!
यानंतर Tupperware®चा खप इतक्या मोठ्या प्रमाणात सुरु झाला. इतका की दुकानात माल कमी पडायला लागला. त्यानंतर टपरवेअरने त्यांची प्रॉडक्ट फक्त Tupperware® होम पार्टीच्या माध्यमातून विकण्याचा निर्णय घेऊन दुकानातील विक्री बंदच केली. ब्राउनी मे हंफ्रेला नवे नाव मिळाले 'ब्राउनी वाईज'. आज टपरवेअरचे जे व्यासायिक रुप आपण बघतो आहे ते सर्व कार्य ब्राउनी वाइजचे आहे. आज जगभरात Tupperware® चे ३० लाखांहून अधिक विक्रेते आहेत. तशी टपरवेअरची उत्पादनांची तुलनात्मक किंमत ही बरीच जास्त असते अशी तक्रार सगळेच करतील, पण उत्पादनांचा दर्जा अप्रतिम असतो.
अनेक कंपन्यांनी या संकल्पनेवर अशाच मार्केटींग स्किम आणल्या, पण टपरवेअर इतके यश कोणालाही मिळालेले नाही. इतकेच काय, पण स्वतः ब्राउनी वाइजने 'सिंड्रेला' नावाचा स्वतःचा ब्रँड बनवला. पण ती अपयशी ठरली. त्यानंतर ती जवळजवळ अज्ञातवासातच गेली. Tupperware® आणि ब्राउनीचा करारही संपला. त्यानंतर थोड्याच दिवसात अर्ल टपरनेही Tupperware® विकून टाकली.
(अर्ल टपर आणि ब्राउनी मे हंफ्रे)
टपरवेअरची यशोगाथा ही उत्पादनाची की मार्केटींगची हे समजणे कठीण आहे. पण तुम्हाला अभ्यास करायचाच असेल, तर Tupperware Unsealed हे पुस्तक नक्की वाचा!