computer

शेव-भुजिया ते मोठा फरसाण ब्रँड!! हल्दीरामची कहाणी तर वाचा!!

हल्दीराम हे नाव भारतातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. काही कंपन्या अशा असतात ज्यांच्या नावावरुन त्यांचे प्रॉडक्ट ओळखले जाते. फरसाण म्हटले म्हणजे हल्दीराम हे समीकरण देखील असेच आहे. देशातल्या प्रत्येक घरात हल्दीरामचे प्रॉडक्ट किमान एकदा तरी चाखले गेले असेल. या हल्दीराम कंपनीचा आणि कंपनीमागील चेहरा हल्दीराम यांचा प्रवास हा चांगलाच रंजक आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात काहीतरी कामधंदा करावा म्हणून बिकानेरमधल्या भिखाराम अग्रवाल यांनी मुलगा चांदमल याला सोबत घेऊन भिखाराम चांदमल या नावाने दुकान सुरू केले. त्या काळात बिकानेरला फरसाणची बरीच दुकाने सुरू होत होती, म्हणून त्यांनीही हाच व्यवसाय सुरू केला. भिखारामला त्यांच्या बहिणीने भुजिया बनवयला शिकवले. ते भुजिया विकू लागले.

दुकान चांगली चालले होते, उदरनिर्वाह होत होता. भिखाराम यांना मग १९०८ साली नातू झाला. या नातूचे नाव गंगाबिशन अग्रवाल असे होते. घरी त्याला हल्दीराम म्हणून बोलवले जात होते. हल्दीराम मोठा होत असताना घरात फरसाण बनताना आणि दुकानावर विकले जाताना बघत असे. अधूनमधून तो दुकानात मदत करत असे. कालांतराने या हल्दीरामचे लग्न झाले आणि दुकानावर मग स्वतः हल्दीराम बसायला लागला. आता हल्दीराम हा थोडा डोक्यालिटी वाला माणूस होता. त्याने सेल्स वाढविण्यासाठी प्रयोग करायला सुरुवात केली. मोठ म्हणजे मटकी टाकली तर भुजिया अजून स्वादिष्ट होते हे त्याला समजले आणि तसा प्रयोग करून बघितला. त्यांचा सेल्स यामुळे चांगलाच वाढला.

थोडे यश आले आणि घरात झगडा सुरू झाला. या भांडणात हल्दीराम कुटुंब आणि दुकान यापासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःचे दुकान सुरू केली. शेवटी कसे असते, क्वालिटी असली की माणूस कुठेही टिकतो. हल्दीराम यांनी त्याकाळी असलेली भुजियाचा आकार बदलला आणि अतिशय बारीक भुजिया बाजारात आणला. हा प्रयोग चांगलाच हिट झाला

दुकानाचे नाव पूर्ण शहरात व्हायला लागल्यावर त्यांनी त्याचे नाव बदलून हल्दीराम असे ठेवले. एक प्रॉडक्ट चांगले विकले गेल्यावर त्यांनी दुसरे प्रॉडक्ट बनविण्यास सुरुवात केली. याचबरोबर आधीची भुजिया त्यांनी अजून बारीक केली. या भुजियाचे नाव त्यांनी आता डुंगर शेव असे ठेवले. हे नाव बिकानेरचे राजा डुंगर सिंग यांच्या नावावरून ठेवले होते.
 

बिकानेरला हल्दीराम यांनी आता मस्तपैकी जम बसवला होता. कमाईही भारी होत होती. अशात एकदा ते लग्नाच्या निमित्ताने कोलकाता गेले असताना सोबत नातेवाईकांसाठी ही भुजिया शेव घेऊन गेले. या नातेवाईकांनी त्यांना थेट कोलकाताला दुकान सुरू करण्याचा हट्ट धरला. त्यांनी पण तो मान्य केला आणि तिथे शाखा सुरू झाली.

हल्दीराम यांची वय व्हायला लागले तसे त्यांचे नातू मनोहर आणि शिवकुमार यांनी व्यवसाय हातात घेतला. त्यांनी मग १९७० साली पहिले स्टोअर सुरू केले नागपूरला. नागपूर आणि हल्दीराम हे कनेक्शन आजही प्रसिद्ध आहे. नागपूरमधील यशाच्या जोरावर मग थेट त्यांनी राजधानी दिल्लीत धडक मारली. १९८२ साली दिल्लीतही स्टोअर सुरू झाले. पण गोष्ट फक्त स्टोअरपुरती मर्यादित राहिली नाही.

हल्दीरामचे नागपूर आणि दिल्ली अशा दोन्ही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू झाले. या प्लांटमुळे देशभर हल्दीरामचे प्रॉडक्ट्स जाऊ लागले. क्वालिटी असल्याने देशभर नाव होण्यास वेळ देखील लागला नाही. देशभर हल्दीरामचा वारू चौफेर उधळत असताना आता वेळ आली परदेशात माल पाठवण्याची. २००३ साली अमेरिकेत त्यांनी आपले प्रॉडक्ट्स पाठविण्यास सुरुवात केली.

एकेक करत तब्बल ८० देशांमध्ये त्यांचे प्रॉडक्ट्स विकले जाऊ लागले. फरसाण मार्केटमधील हल्दीराम हा एक नंबरचा ब्रँड तर झालाच, पण दुसरा कुठला ब्रँड त्यांच्या जवळपास देखील नव्हता. एकवेळ तर अशी आली, जेव्हा २०१५ साली अमेरिकेकडून हल्दीरामवर बंदी घालण्यात आली, क्वालिटीसोबत तडजोड केली असा आरोप त्यांच्यावर केला गेला.

असे होऊनही त्यांना याचा काही मोठा झटका बसला नाही. कारण मार्केट इतके मोठे होते की त्यात अमेरिकासारख्या देशाने बंदी घालूनही त्यातून ते सावरू शकले. भारतात तीन विभागात हल्दीरामचे काम सुरूचालते. नागपूर येथून पूर्ण पश्चिम भाग, कोलकाता येथून दक्षिण आणि पूर्व भाग, तर दिल्ली येथून उत्तर भारताचा कारभार बघितला जातो. २०१९ सालचा या कंपनीचा रेव्हेन्यू बघितला तर तो ७ हजार कोटींपेक्षा अधिक आहे.

शेवेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज तब्बल ४०० प्रॉडक्ट्सपर्यंत पोहोचला आहे. एका बाजूने फरसाणसारख्या व्यवसायात असूनही हल्दीरामने घेतलेली भरारी ही तुफान जबरदस्त म्हणावी अशी आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required