१३०४ ते १८५० : वाचा कसा झाला कोहिनूरचा गोवळकोंड्याच्या खाणीपासून व्हिक्टोरिया राणीपर्यंतचा प्रवास !
मंडळी, ब्रिटीश काळात भारतातून अनेक मौल्यवान गोष्टी इंग्लंडला पाठवण्यात आल्या होत्या. त्यातील एक अमुल्य गोष्ट म्हणजे कोहिनूर. आजच्याच दिवशी १८५० साली कोहिनूर हिरा राणी व्हिक्टोरियाला पहिल्यांदा नजर करण्यात आला. त्यानंतर तो पुन्हा भारतात कधी परतलाच नाही.
मंडळी, कोहिनूर हिरा भारतातून इंग्लंडला गेला अशी माहिती आपल्या सगळ्यांनाच माहित असते पण खरं तर हा हिरा भारत, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान या तीन देशातून फिरून इंग्लंडला स्थायिक झाला आहे. असं म्हणतात की कोहिनूर आपल्या सोबत दुर्दैव घेऊन येतो. कोहिनूरचा इतिहास बघितला तर ते खरंही ठरतं. हा ऐतिहासिक हिरा अनेक सुलतान आणि राजांच्या हाती लागूनही त्यांना लाभला नाही.
आज या ऐतिहासिक दिवशी आम्ही सांगणार आहोत कोहिनूरच्या संपूर्ण प्रवासाची गाथा.
असं म्हणतात की कोहिनूर गोवलकोंडाच्या खाणीत सापडला होता. त्याच्या पहिल्या उल्लेखात कोहिनूर १३०४ साली माळवाच्या राजांकडे होता असं म्हटलं आहे. पुढे तो अल्लाउद्दिन खिलजीच्या स्वाधीन झाला. गंमत म्हणजे कोहिनूरला त्याचं ‘कोहिनूर’ हे नाव मिळायला अजून बराच अवधी होता.
कोहिनूर मुघल साम्राज्यात आला :
तर, खिलजी कडून कोहिनूर हिरा पुढील सुलतान मंडळींकडे फिरत राहिला. अशाच प्रकारे १३३९ साली तो उझबेकिस्तानच्या समरकंदला जाऊन पोहोचला. तिथे ३०० वर्ष राहिल्यानंतर पुन्हा भारतात आणला गेला. शेवटी हा हिरा १५२६ साली बाबरच्या हाती लागला. बाबरला हा एक प्रकारे इनाम म्हणून मिळाला होता. तिथून पुढे कोहिनूर मुघल साम्राज्यात पुढील अनेक वर्ष राहणार होता.
बाबरने बाबरनामा मध्ये म्हटल्या प्रमाणे कोहिनूरची किंमत म्हणजे संपूर्ण जगाच्या अर्ध्या दिवसाच्या कमाई एवढी आहे. बाबर पासून हुमायून, अकबर, जहांगीर आणि मग शहाजहानकडे कोहिनूर आला. शाहजहानने कोहिनूरला मयूर सिंहासनात जडवला.
शहाजहानला औरंगजेबाने कैद केल्यानंतर तिथेच त्याचा मृत्यू झाला. पुढे औरंगजेबाने स्वतःचा अभिषेक करवून घेतला आणि कोहिनूर औरंगजेबाच्या मालकीचा झाला. पुढे औरंगजेबानंतर मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. औरंगजेबाचा पुढील वारस मोहम्मद हा कुचकामी सुलतान निघाला. त्याला राज्य राखता आलं नाही. याचाच फायदा नादिर शहाने उचलला.
कोहिनूर हे नाव कसं मिळालं ?
१७३९ साली नादिर शहाने भारतावर आक्रमण केलं. मोहम्मदने नादिर शहा समोर पराभव पत्करला. यावेळी उत्तर भारतात प्रचंड लुटालूट झाली. (एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघायचा म्हणतात, तो धूर याच आक्रमणानंतर निघायचा बंद झाला असावा.)
नादिर शहाच्या लुटीत मयूर सिंहासन आणि त्याच बरोबर तो हिरा सुद्धा होता. नादिर शहाने जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा त्याच्या तोंडून उद्गार निघाले. कोह-ए-नूर. फारसी मध्ये याचा अर्थ होतो ‘प्रकाशाचा पर्वत’.
अहमद शहा अब्दाली (स्रोत)
इथून पुढे हा अनामिक हिरा न राहता त्याला कोहिनूर हे नाव मिळालं. कोहिनूर कोणालाही लाभत नाही या उक्तीप्रमाणे तो नादिर शहालाही लाभला नाही. नादिर शहाचा त्याच्याच जवळच्या माणसांनी खून केला.
पुढे कोहिनूर अहमद शहा अब्दालीकडे आला. (याच अहमद शहा अब्दाली विरोधात मराठे पानिपतच्या लढाईत लढले होते.) अहमद शहाने कोहिनूरला अफगाणिस्तानात नेलं. पुढे अहमद शहा अब्दालीचा वारस शुजा शहा दुर्राणीकडे कोहिनूर गेला. शुजाने कोहिनूरला एका ब्रेसलेट मध्ये जडवून तो वापरायला सुरुवात केली. पण कोहिनूर शुजा शहाला देखील लाभला नाही. त्याची अफगाणिस्तानातून हकालपट्टी झाली.
पुन्हा भारतात आगमन :
अफगाणिस्तानातून पळून शुजा पंजाबच्या रणजीत सिंग यांच्याकडे आला. रणजीत सिंग यांनी शुजाची मदत केली. त्यांच्याच मदतीने शुजा पुन्हा अफगाणी गादीवर बसला. याबदल्यात शुजाने कोहिनूर रणजीत सिंग यांना भेट म्हणून दिला.
वारसा प्रमाणे कोहिनूर रणजीत सिंग यांचा मुलगा दलीप सिंग यांच्या मालकीचा झाला. पण खरं तर रणजीत सिंग यांनी कोहिनूरला पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या नावे केला होता. त्यांच्या जाण्यानंतर त्यांची इच्छा दलीप सिंगांनी पूर्ण केली नाही. उलट तो आपल्या जवळ ठेवून घेतला.
१८४९ साली दुसरं इंग्रज-शीख युद्ध झालं. या युद्धात शिखांचा पराभव झाला. इंग्रजांनी लाहोर आणि पंजाबचा भाग ताब्यात घेतला. तिथून पुढे ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा कंपनी राज सुरु झाला.
कोहिनूर इंग्रजांच्या हाती :
जिंकल्यानंतर इंग्रजांनी शिखांची मालमत्ता जप्त केली. युद्ध भरपाई म्हणून ही मालमत्ता जप्त केली गेली होती. असं म्हणतात की पराभव झाल्यानंतर दलीप सिंग यांनी स्वतः कोहिनूर इंग्रजांना नजर केला. काही इतिहासकरांच्या मते इंग्रजांनी तो इतर मालमत्तेबरोबर जप्त केला.
कारण काहीही असलं तरी तो शेवटी १८४९ साली भारतातून इंग्लंडला रवाना झाला. कोहिनूरला ब्रिटन पर्यंत नेण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर होती त्याने कोहिनूर हरवला. पण सुदैव म्हणजे एका नोकराने तो परत आणून दिला.
कोहिनूर राणीच्या दरबारात :
३ जुलै १८५० रोजी राणी व्हिक्टोरियाला बकिंगहम पॅलेस मध्ये कोहिनूर नजर करण्यात आला. पुढे राणी व्हिक्टोरियाने कोहिनूरला पैलू पाडले. पुढे कोहिनूर हा राणीच्या मुकुटात कायमचा स्थिरावला.
या सर्व प्रवासात कोहिनूर १८७ कॅरेट वरून आजच्या १०८ कॅरेटवर आला.
तर मंडळी अशा प्रकारे कोहिनूरचा गोवलकोंडाचा खाणीपासून ते व्हिक्टोरिया राणी पर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आणि रक्तरंजित राहिला आहे.