computer

पीनट बटरचा ७०० वर्षे जूना इतिहास....एवढ्या वर्षात पीनट बटरचे रूप कसे बदलत गेले?

पीनट बटर म्हणजे शेंगदाण्यापासून बनवलेले लोणी. भारतात हे इतके लोकप्रिय नसले तरी अमेरिका, इंग्लंड आणि युरोपमध्ये हे प्रचंड लोकप्रिय आहे. जॅम पेक्षा पीनट बटरची लोकप्रियता जास्त आहे असे कोणी सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. शेंगदाणे म्हणजे प्रोटीनयुक्त, उत्साहवर्धक आणि फायबरयुक्त तसेच शक्तिवर्धक असतात. म्हणून त्याला फिटनेस वर्ल्डचे सुपरफूड म्हटले जाते. फिटनेसच्या चाहत्यांना वर्कआउट्सच्या आधी किंवा नंतर पीनट बटर लावलेले सँडविच खायला आवडते.

पण हे पीनट बटर आले कुठून? याचा शोध कोणी लावला याचा इतिहास आज या लेखात घेऊयात.

पीनट बटरचा इतिहास अ‍ॅझ्टेक (Aztec) संस्कृतीशी संबंधित आहे. अ‍ॅझ्टेक ही मेसोअमेरिकन (Mesoamerican)  संस्कृती आहे, जी मेक्सिकोमध्ये १३००-१५१५ दरम्यान राहत होती. हे लोक भाजलेल्या शेंगदाण्याची पेस्ट बनवत असत. पण आधुनिक काळात पीनट बटरच्या शोधाचे श्रेय तीन जणांना जाते. पहिले कॅनडाचे मार्सेलस गिलमोर एडसन, ज्यांनी १८८४ मध्ये पीनट बटरला पेटंट दिले होते. त्याने शेंगदाणे गरम करून त्यांना दळून पीनट बटर तयार केले. अमेरिकन वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कारव्हरने पीनट बटर शोधले असे म्हणतात. परंतु खरे तर त्यांनी त्या बटर पासून अनेक पदार्थ बनवले पण पीनट बटरचा शोध लावला नाही.

डॉ. जॉन हार्वे केलॉग यांनी हा शोध लावला असेही म्हटले जाते. डॉ. जॉन हार्वे केलॉग म्हणजे प्रसिद्ध केलॉग्जचे सर्वेसर्वा. कच्च्या शेंगदाणासह पीनट बटर तयार करण्यात ते यशस्वी झाले होते. केलॉग यांनी या बटरची जाहिरात करताना ते प्रथिनाना पर्याय असल्याची सांगितलं होतं. मांसाला एक स्वस्त पर्याय म्हणून पीनट बटर जगासमोर आणण्यात आले. अमेरिकेत घरोघरी पीनट बटर पोचवण्याचे काम यातून साध्य झाले. त्याची चव लोकांना इतकी आवडली की हळूहळू ते लोकप्रिय झाले. त्यानंतर पीनट बटरचे वेगवेगळे रूप बाजारात येत राहिले आणि त्याची चव आणि रंगही बदलला. एका संशोधनानुसार त्यातून बनविलेले उत्पादन अमेरिकेच्या ७० टक्के घरात वापरले जायचे. आता त्यातून बनविलेले स्वादिष्ट पदार्थ मार्केटमध्येही उपलब्ध आहेत, जसे नटी थाई चिकन स्लो कुकर डिनर, पीनट पावर्ड ब्रेकफास्ट कुकीज आणि पीनट अ‍ॅन्ड चॉकलेट चेरी स्मूदी असे एक ना अनेक.

(डॉ. जॉन हार्वे केलॉग)

कॅलॉगच्या सेनेटेरियममधील कर्मचारी जोसेफ लॅमबर्टने शेंगदाणे भाजण्यासाठी आणि दळण्यासाठी यंत्रांचा शोध लावला. पुढे त्याने स्वतःची लॅमबर्ट फूड कंपनी सुरू केली. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर नट बटर आणि ते दळण्यासाठी गिरण्या विकल्या. उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने पीनट बटरच्या किंमती खाली आल्या. पीनट बटर लोकप्रिय होण्यास हेही कारण ठरले.

असे म्हणतात पहिल्या महायुद्धाच्यावेळी १९१७ साली अमेरिकेतील ग्राहक मांस सोडून केलॉगच्या प्रथिनेयुक्त पीनट बटरकडे वळले. तिथे “मांसविरहित सोमवार” ची जाहिरात केली गेली. अमेरिकन लोक पीनट बटर लावलेले  ब्रेड खातात आणि सॅलड मध्येही शेंगदाणा तेलच वापरतात असे म्हटले जायचे.

१९२१ मध्ये कॅलिफोर्नियाच्या जोसेफ रोजफील्डने पीनट बटरला आंशिक हायड्रोजनेशन partial hydrogenation नावाची रासायनिक प्रक्रिया लागू करण्यासाठी पेटंट दाखल केले. पीनट बटरला आंशिक हायड्रोजनेशन केल्यामुळे पीनट बटरमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवणारे तेल साध्या तपमानावर द्रव असते, ते घन किंवा अर्धघन (सेमिसॉलिड) तेलात रुपांतरित करता येते. त्यामुळे पीनट बटरचा साठा करून वाहतूक करणे सोपे झाले. जोसफ रोजफिल्ड हा पहिला माणूस होता ज्याने पीनट बटरला आंशिक हायड्रोजनेशन केले.

अमेरिकेत तर पीनट बटर ब्रेडवर स्प्रेड करून खाणे ही तर संस्कृतीच बनली. पण युके मध्येही याची लोकप्रियता वाढत गेली. २०२० मध्ये खाद्यपदार्थ विक्रीमध्ये पीनट बटरने चक्क ब्रिटनच्या लाडक्या जॅमलाच मागे टाकले. मागच्या वर्षी अमेरिकेत कोविडच्या साथीत जेव्हा लोक वास आणि चव गमावत होते तेव्हाही पीनट बटर चा उपयोग झाला असे एका अभ्यासात दिसून आले. तीव्र वास देणारे आणि चव देणाऱ्या या बटरचा वास कोणी गमावला असेल तर ती व्यक्ती पोजिटीव्ह आढळली.

प्रत्येक देशाचे ठराविक पदार्थ तिथल्या लोकांच्या आवडीनुसार लोकप्रिय होतात. पीनट बटर आवडणारा मनुष्य म्हणजे अमेरिकनच असणार अशी धारणा झाली. आता जगभर त्याचा प्रसार होतच आहे.

 

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required