कोळशावरचा भारतीय कुकर, हॉकिन्स-प्रेस्टीज, इंस्टापॉट ते जुगाडू ऑटोक्लेव्ह!! जाणून घ्या तब्बल ३४०वर्षे जुन्या कुकरची कहाणी!!
"चार शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करा", "पाच मिनिटं धीर धरा, कुकरचं झाकण पडलं की वाढतेच". ही वाक्यं आता आपल्या रोजच्या ओळखीची झालीत. आपल्या स्वयंपाकघरात झटपट अन्न शिजवणारा प्रेशर कुकर आता 'साठी' पार झालाय हे सांगितलं तर थोडी गंमतच वाटेल. आजच्या आधुनिक स्वयंपाकघरात अशी अनेक उपकरणं आहेत ज्यांनी महिलांचे 'रांधा- वाढा -उष्टी काढा' चे श्रम सुसह्य केले आहेत. चला तर आज वाचू या प्रेशर कुकरची काही मनोरंजक माहिती...
स्वातंत्र्योत्तर काळात १९५९ साली हॉकिन्स आणि प्रेस्टीज हे दोन प्रेशर कुकर भारतात आले. यापैकी हॉकिन्सची स्थापना एच.डी वासुदेवा या उद्योजकाने एच. डी. हॉकिन्स या इंग्लिश कंपनीच्या सहकार्याने सुरु केली. वासुदेवा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी केवळ २०,००० रुपयाच्या भांडवलावर या कंपनीची पायाभरणी केली. वासुदेवा यांचा मूळ व्यवसाय जनरल इन्शुरन्सचा होता. त्याच वर्षी TTK (टी. टी.कृष्णम्माचारी) उद्योग समूहाने 'प्रेस्टीज' प्रेशर कुकर बाजारात आणला. या उद्योग समूहाचे प्रवर्तक आपले केंद्रीय अर्थमंत्री होते.
स्वतंत्र भारतातल्या या पहिल्या आर्थिक घोटाळ्यात चक्क अर्थमंत्र्यांनाच राजीनामा द्यायला लागला!!
(एच.डी वासुदेवा)
थोड्याच वर्षांत या दोन्ही कुकरना बाजारात मोठी मागणी आली आणि नंतर बरीच वर्षे घरात यांना स्पर्धाच नव्हती. पण त्यांनी गृहिणींमध्ये मात्र दोन तट पाडले. चर्चेचा विषय होता या प्रेशर कुकरच्या झाकणाचा!! हॉकीन्सचे झाकण आतल्या बाजूचे असायचे, तर प्रेस्टीजचे बाहेरच्या बाजूने. त्यांच्या शिट्टीमध्ये पण थोडाफार फरक होता.
मुख्य प्रश्न होता गृहिणीच्या सुरक्षिततेचा ! या दृष्टीने या दोन्ही ब्रँडने भरपूर संशोधन (बिस्मथ+टिन या धातूचे मिश्रण) करून सेफ्टीव्हॉल्व्ह बनवला होता. त्यामुळे आतल्या प्रेशरने स्फोट होण्याची शक्यता फारच कमी होती. प्रेस्टीजचे मार्केटींगचे तंत्र मात्र नेहमीच हॉकीन्सच्या दोन पावले पुढे होते. आठवते ना ती जाहिरात, "जो बिवीसे करे प्यार ...!!" या काळात लग्नप्रसंगी भेट म्हणून देण्यासाठी प्रेशरकुकर ही इतकी लोकप्रिय आयडीया होती की एकाच वेळी चार-पाच तरी कुकर आहेरात यायचे. याचा अर्थ असा नव्हे की हॉकिन्स आणि प्रेस्टीज बाजारात येण्याआधी प्रेशर कुकर भारतात आले नव्हते. तुमच्या घरात अजूनही ते तांब्याचे जुने कुकर वापरात नसले तरी आठवण म्हणून जपून ठेवलेले असतीलच!
सध्या भारतात आपण जे कुकर वापरतो ती प्रेशर कुकरची तिसरी पिढी आहे. १६७९ साली जगातला पहिल्या प्रेशर कुकरच्या निर्मितेचे श्रेय डेनीस पॅपिन या फ्रेंच संशोधकाकडे जाते. त्याने या उपकरणाचे नाव प्रेशर डायजेस्टर असे ठेवले होते. १६८२ साली या अभिनव कल्पनेचे सादरीकरण त्याने ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचा स्वयंपाक रांधून केले.
पॅपिन स्टीम इंजिनियर असल्याने त्याला या पहिल्या प्रायोगिक कुकरचा कदाचित स्फोट होईल याची धास्ती होती म्हणून त्यानेच आणखी संशोधन करून कुकरला सेफ्टी व्हॉल्व्ह जोडला. या सुंदर कल्पनेचे व्यापारीकरण मात्र वेगवेगळ्या लोकांनी केले. प्रेशर कुकरचे पहिले पेटंट १९१८ साली जोस मार्टीनेझ नावाच्या एका स्पॅनिश माणसाच्या नावाने नोंदणीकृत आहे. त्याच्या कुकरचे नाव होते 'ओला एक्सप्रेस', म्हणजे झटपट शिजवणारे!! त्या पाठोपाठ १९२४ साली प्रेशरकुकर पाककृतींचे पहिले पुस्तक पण प्रसिध्द झाले.
असे नेहेमीच होते की परकीय संशोधकांच्या नावाचा उदो उदो होतो, पण भारतीय संशोधकांना मात्र काडीमात्र श्रेय दिले जात नाही. जोस मार्टीनेझच्या आधी १९१० इंदूमाधब मलिक नावाच्या बंगालच्या संशोधकाने वापरायला सुरक्षित असा प्रेशर कुकर बनवला होता. त्याची रचना फारच कल्पक होती. त्याकाळी स्वयंपाकासाठी कोळशाच्या शेगडीचा वापर केला जायचा. इंदूमाधब मलिक यांचा प्रेशर कुकर- ज्याला आयसीमीक कुकर म्हटले जायचे- त्याच्या तळात शेगडी जोडलेली असायची. एक टिफीन कॅरीयर त्याच्यावर असलेल्या उभ्या नळकांड्यात ठेवला जायचा. त्याकाळी हा प्रेशर कुकर खूप लोकप्रिय झाला होता. पक्षीतज्ञ डॉ. सलीम मलिक हा प्रेशर कुकर घेऊन पक्षीनिरिक्षणासाठी जंगलात जायचे असा पण एक उल्लेख आहे. एव्हरेस्ट सारख्या मोहीमेवर तर हमखास हा कुकर कामाला यायचा. कोळशाच्या मंद आचेवर असल्याने कुकरच्या वाफेचा दाब कधीच धोक्याची पातळी ओलांडायचा नाही, ही पण आयसीमीक कुकरची खासियत होती. १९५० नंतर या कुकरचा वापर कमी होत गेला.
(इंदूमाधब मलिक)
आता तिसर्या पिढीचे कुकर इलेक्ट्रीकवर म्हणजेच इंडक्शन शेगडीवर चालतात. त्यांचे डिझाईनही आकर्षक झाले आहे. आता घरोघरी जसे स्मार्ट टिव्ही आले आहेत, तसे स्मार्ट कुकरपण आले आहेत. या स्मार्ट कुकरमध्ये अत्यंत लोकप्रिय कुकरचे नाव आहे इंस्टा पॉट! हा कुकर मल्टीकुकर म्हणून पण ओळखला जातो, कारण त्याचा उपयोग वेगवेगळ्या दहा प्रकारांनी करता येतो. याच्या निर्मितीमागे पण एक मनोरंजक कथा आहे. २००८ साली रॉबर्ट वँग नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरची अचानक नोकरी गेली. तो घरी बेकार बसलेला असताना त्याने घरातल्या समस्यांवर विचार करायला सुरुवात केली. त्यातून इलेक्ट्रीकवर चालणारा, प्रेशर, टेंपरेचर, कंट्रोल करणारा, मायक्रो प्रोसेसर जोडलेला इंस्टापॉट जन्माला आला.
एक अभिनव कल्पना अनेक अभिनव कल्पनांना जन्म देते असे म्हणतात. फक्त भारतातच नव्हे, तर जगभर अनेक जुगाडू लोक काहीतरी प्रयोग करत असतातच. नॉर्वेमधल्या एका इसमाने माणूस बसू शकेल असा खोका घेतला. त्या खोक्याला त्याने बाहेरच्या बाजूने प्रेशर कुकर जोडून वाफ सोडण्याची व्यवस्था केली. शिट्टी अर्थातच काढून टाकली आणि तयार झाला सॉना बाथ!
विकसनशिल देशात अनेक ठिकाणी आरोग्य व्यवस्था पुरेशा नसतात. हॉस्पिटलमध्ये ऑटोक्लेव्ह म्हणजे बँडॅजेस, सिरींज, गॉझ, कापूस निर्जंतूक करण्याचे एक यंत्र असते. ज्या ठिकाणी हे महागडे यंत्र नसते, तेथे आरोग्य कर्मचारी प्रेशर कुकरचा वापर ऑटॉक्लेव्हसारखा करतात.
जुगाडू नेहेमीच सज्जन असतात असे नाही. मुंबईत अतिरेकी गटाने केलेल्या बाँब स्फोटात प्रेशर कुकरचाच वापर केला गेला होता. अंमली पदार्थांचे अर्क काढणारे बर्याच वेळा गांजा वाफेच्या नळीत अडकल्याने झालेल्या स्फोटात मरण पावले आहेत.
पण वाचकहो, प्रेशर कुकरच्या कथा 'प्रेशरकुकर बाबा' च्या कथेशिवाय अपूर्ण आहेत. सियाचेनच्या बर्फाळ रक्त गोठवणार्या थंडीत आपल्या जवानांना त्यांची श्रध्दास्थाने उमेद देत असतात. ही कथा पण सियाचेनमध्ये घडली आहे. भारतीय सैन्याचे फिरते गस्तीपथक त्याचे कर्तव्य बजावत असताना त्यांचे अन्न राहूटीबाहेरच्या चुलीवर शिजत असते. अशाच एका प्रसंगी पाकिस्तानी सैन्याने उष्णतेच्या जोरावर लक्ष्यवेध घेणारे मिसाईल डागले. इतरवेळी हे मिसाईल जवानांच्या तंबूंवर आदळले असते, पण झाले असे की बाहेर अन्न शिजवणार्या कुकरच्या उष्णतेमुळे मिसाईलच्या यंत्रणेची फसगत झाली. ते मिसाईल कुकरवर येऊन आदळले. कुकरचा स्फोट झाला पण जवानांचा जीव वाचला. कृतज्ञतेपोटी या जवानांनी एक छोटे 'प्रेशरकुकर' बाबांचे मंदिर उभारले आहे.
मित्रांनो, तुमच्या आयुष्यातले अनेक अनुभव प्रेशर कुकरसोबत जोडले गेले असतील हे नक्कीच! सांगा तुमच्या आठवणी कमेंट्समध्ये!
चला, आम्ही निघतो, आताच तिसरी शिट्टी वाजली आहे!!