सावली, मेणबत्या, लंबक, क्वार्ट्झ ते स्मार्ट वॉचेस.. जाणून घ्या घड्याळाच्या स्थित्यंतराचा ५५०० वर्षांचा इतिहास!!
सुरुवातीला सूर्य उगवला आणि मावळला, चंद्र उगवला आणि मावळला- इतकेच वेळेचे भान असलेला माणूस आता मायक्रो सेकंदापर्यंत वेळेचा हिशोब ठेवायला लागला आहे. हा प्रवास काही लाख वर्षांचा नक्कीच असेल. पण Time किंवा 'काल' या संकल्पनेचा पूर्ण उलगडा अजूनही झालेला नाही. पण हाती असणारा वेळ मात्र मर्यादित असतो हे जेव्हा माणसाच्या लक्षात आले तेव्हा घड्याळाचा जन्म झाला. त्या कालमापक यंत्राचा म्हणजे घड्याळाचा शोध पण इतका सोपा नव्हता. जळत जाणारी मेणबत्ती, तेवत असलेल्या समईत उरलेलं तेल, घटिकापात्र पाण्यात बुडण्यास लागणारा वेळ ते रिस्टवॉच म्हणजेच मनगटी घड्याळ या संक्रमणाचा धांडोळा घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत.
वेळ मोजण्यासाठी घड्याळाच्या वापराचा उल्लेख सर्वात पहिल्यांदा आढळतो तो इ.स.पू. ३५०० मध्ये! उन्हात पडलेल्या सावलीच्या लांबीवरून वेळ दाखविणारे हे घड्याळ त्याकाळी चीन आणि इजिप्तमध्ये प्रचलित होते. इ.स.पू. ६०० मध्ये अनाक्झीमँडर या संशोधकाने सावलीवरुन वेळ दाखवणारे ग्रीकमधील पहिले धातूचे घड्याळ बनवले. या घड्याळ्याने फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या दरम्यानचाच वेळ कळत असे. पण मग रात्रीचे मोजमाप कसे करायचे?
तर, ही गैरसोय भरुन काढण्यासाठी इ.स.पू. १५०० च्या काळात एका विशिष्ट वेगाने जळणार्या मेणबत्त्यांचा वापर केला जाऊ लागला. याच वेळेच्या आसपासच वाळूच्या घड्याळाचा वापर केला जाऊ लागला. १५२० मध्ये जगाला वळसा घालण्याच्या उद्देशाने निघालेल्या फर्डिनांड मॅगेलान याच्या बरोबर १८ वाळूची घड्याळे होती. वाळूच्या घड्याळाप्रमाणेच पाण्याचे घड्याळही त्यावेळी प्रचलित होते. प्लेटोने अलार्म म्हणून वापरण्यासाठी पाण्याच्या घड्याळाचा वापर केला होता.
इंग्लंडचा राजा किंग अल्फ्रेड(प्रथम)ने ६ मेणबत्त्यांच्या सहाय्याने २४ तास वेळ दाखवू शकेल असे यंत्र तयार केल्याचा उल्लेख आढळतो. या यंत्रातील प्रत्येक मेणबत्ती १२ इंच ऊंच होती आणि ही मेणबत्ती १ इंच जळण्यासाठी २० मिनिटे एवढा कालावधी लागत असे. म्हणजेच १ मेणबत्ती ४ तासांचा वेळ, या हिशोबाने ६ मेणबत्त्या २४ तासांचा वेळ दाखवत असत.
(वेळ दाखवण्यासाठी मेणबत्तीचा उपयोग)
पहिले यांत्रिक घड्याळ निर्माण होण्यासाठी ११ वे शतक उजाडले. पोप सिल्व्हिस्टर दुसरा याने १० व्या शतकात पहिले यांत्रिक घड्याळ बनवले. चरखे, वजन आणि घंटेचा वापर करून बनवलेले हे यांत्रिक घड्याळ जगभर वापरले जाऊ लागले.
१५९४ मध्ये गॅलिलियोने लंबकाचा कालमापनासाठी वापर केला आणि घड्याळांच्या विश्वात क्रांतीची सुरवात झाली. अर्थात आपला हा शोध या क्रांतीची नांदी ठरेल याची पुसटशीही कल्पना गॅलिलियोला नव्हती. गॅलिलियोने शोधलेल्या लंबकाची एका नियमित फेरी पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ हा लंबकाच्या गोळ्याचे वस्तुमान (वजन) बदलले तरीही तेवढाच असतो. या सूत्राचा वापर घड्याळ बनवण्यासाठी करता येईल हे १६५७ मध्ये 'ख्रिस्तीयन हायगेन' या शास्त्रज्ञाने हेरले. याच तत्वावर आधारित त्याने एक यांत्रिक घड्याळ बनवले. हे घड्याळ आधीच्या घड्याळांपेक्षा जास्त अचूक होते. अचूक असले तरीही हे घड्याळ अंगावर बाळगण्यायोग्य मात्र नक्कीच नव्हते.
(ख्रिस्तीयन हायगेनचं यांत्रिक घड्याळ)
पहिले खिशात बाळगता येईल असे घड्याळ म्हणजे पॉकेट वॉच बनवले ते पीटर हेनलेन या जर्मन कुलुपदुरुस्ती करणारया व्यक्तीने. पॉकेट वॉचमध्ये लंबकाऐवजी बॅलन्स स्प्रिंगचा वापर केला जात असे. बॅलन्स स्प्रिंगचा वापर केल्याने या घड्याळाची अचूकता त्याकाळी सर्वाधिक होती. १५०५ मध्ये बनवलेले हे घड्याळ दर्यावर्दी मोठ्या प्रमाणात वापरत असत.
(पीटर हेनलेनचं पॉकेट वॉच)
पुढे याच तत्वाचा वापर करून अधिकाधिक अचूक घड्याळे बनवली जाऊ लागली. पण या घड्याळांत एक तृटी होती. या घड्याळांना एका विशिष्ट वेळेनंतर चावी द्यावी लागत असे. अशी चावीची घड्याळे अगदी आता आतापर्यंत दिसायची. यातून सुटका मिळाली ती १७७० मध्ये. तेव्हा अब्राहम लुईस ब्रेगेट(Breguet) नावाच्या संशोधकाने सेल्फ वाइंड होणारे पहिले घड्याळ निर्माण केले.
(अब्राहम लुईस ब्रेगेटने तयार केलेलं घड्याळ)
स्वित्झरलंडच्या झेनिथ कंपनीचे एक पॉकेट वॉच महात्मा गांधींकडे होते. इंदिरा नेहरु यांनी भेट दिलेले हे घड्याळ चोरीला गेल्याचा एक किस्सा गांधीजींनी लिहून ठेवला आहे. पश्चात्ताप झाल्यानंतर चोराने ते घड्याळ गांधीजींना परत केले. हे घड्याळ आता विजय मल्ल्याकडे आहे.
२० व्या शतकाच्या सुरूवातीला अमेरिकेत मनगटी घड्याळ म्हणजे फक्त स्त्रियांसाठी असा एक समज होता. त्याच्या छोट्या आकारामुळे ते पुरुषांसाठी अयोग्य समजले जात होते. यात बदल झाला तो १९१४ ला पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाल्यावर. युरोपियन सैनिक वेळ बघताना सोयिस्कर व्हावे म्हणून खिशातील घड्याळ मनगटावर बांधत असत. त्यावेळी युद्धातील सैनिकांसाठी वेळ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे मनगटी घड्याळाची संकल्पना अमेरिकन सैनिकांनीसुध्दा स्वीकारली.
(पहिल्या महायुद्धातील मनगटी घड्याळे)
मनगटी घड्याळ बनवण्यासाठी क्वार्ट्झ या पदार्थाचा वापर केला जाऊ लागला. क्वार्ट्झच्या स्फटिकाला विद्युत प्रवाह मिळाला की तो एका विशिष्ट वारंवारतेने हालचाल करतो. ही वारंवारता एका विद्युत सर्किटच्या मदतीने मोजली जात असे. हेच सर्किट पुढे मोटर नियंत्रित करत होते आणि हीच मोटर पुढे घड्याळाचे काटे नियंत्रित करत असे.
पुढे जाऊन मनगटी घड्याळं सर्वत्र प्रचलित झाली. १९०८ मध्ये रोलेक्सची सुरुवात झाली. १९२५मध्ये पाटेक फिलिपने पहिले कॅलेंडर दर्शविणारे घड्याळ बनवले. १९२७ मध्ये रोलेक्सने आपले पहिले वॉटरप्रूफ घड्याळ बाजारात आणले. या घड्याळाच्या मार्केटिंगसाठी रोलेक्सने एक रंजक पध्दत वापरली. रोलेक्सने एका जलतरणपटूला हातात हे घड्याळ हातात बांधून इंग्लिश खाडी पार करण्यास सांगितले. खाडी पार करून परतल्यावर हे घड्याळ अगदी योग्यपणे काम करत असल्याचे दिसले. त्यानंतर ४ वर्षांनीच १९३१ मध्ये रोलेक्सने स्वत:चे पहिले सेल्फ वाइंडिंग घड्याळ बाजारात आणले.
(रोलेक्सची जाहिरात)
घड्याळांच्या इतिहासातील अचूकतेचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा गाठला गेला तो १९६७ मध्ये. सेसीयम मूलद्रव्याच्या अणुच्या ९,१९२,६३१,७७० इतक्या आंदोलनांसाठी (ऑसिलेशन्स) लागणारा वेळ म्हणजे १ सेकंद हे जागतिक एकक ठरवण्यात आले. पुढे याच मूलद्रव्याचा वापर करून आण्विक घड्याळांची निर्मिती करण्यात येऊ लागली.
भारतात मनगटी घड्याळांची खरी सुरुवात झाली ती एचएमटी या ब्रँडपासून. १९६१ मध्ये सुरुवात झालेल्या या घड्याळ कंपनीचे अनावरण तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. या घड्याळाची क्रेझ इतकी होती की नोकरीत २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे घड्याळ भेट दिले जात असे. पुढे जाऊन १९८० च्या दशकात टायटनची घड्याळे बाजारात आली आणि एचएमटीच्या वर्चस्वास धक्का बसला. आकर्षकतेवर भर देणारया टायटनने पुढे जाऊन भारतीय बाजारावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
('एचएमटी' घड्याळ)
फक्त गरजेसाठी वापरल्या जात असलेल्या घड्याळाचे रुपांतर हळू हळू चैनीच्या वस्तूमध्ये झाले. महागडी विदेशी घड्याळे बाजारात येण्यास सुरुवात झाली. राडो, सिटीझन, फॉसिल या आणि अशा कंपन्यांनी भारताच्या नवश्रीमंत वर्गाच्या मनात आपल्या आकर्षक डिझाईन्समुळे विशेष आकर्षण निर्माण केले.
स्विस घड्याळांना विशेषतः जगभर प्रसिध्दी मिळाली. या घड्याळांच्या निर्मितीत असलेले नाजूक आणि सुंदर नक्षीकाम आणि घड्याळ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे महागडे धातू यामुळे या घड्याळांची आजही किंमत जास्त असते.
आता तर मनगटी घड्याळ फक्त वेळच नाही, तर काळजाचे ठोके, आपले भौगोलिक स्थान, व्यायाम करताना खर्च झालेल्या कॅलरीजसुद्धा दाखवते. अॅपल, सॅमसंगसारख्या कंपन्यांनी बनवलेली स्मार्ट घड्याळे आता बाजारात आपले पाय घट्ट रोवत आहेत. कमी वजन आणि फक्त वेळच न दाखवता बाकीच्या अनेक कामांत मदत करणारे हे घड्याळ आता भविष्यातील घड्याळांच्या नव्या युगाची सुरुवात आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
घड्याळांच्या या उत्क्रांतीच्या टप्प्यातच कुठेतरी मानवी उत्क्रांतीचा इतिहास दडलेला आहे. घड्याळाचे सामाजिक, आर्थिक महत्त्व मानवाच्या प्रगतीच्या टप्प्यांनुसार बदलत गेले. फक्त महिलांसाठी समजले जाणारे मनगटी घड्याळ आज पुरुषसुद्धा अगदी अभिमानाने मिरवतात. त्यामुळे घड्याळ फक्त एक कालमापक यंत्र नसून मानवाच्या प्रगतीचे दर्शन घडवून आणणारे ते एक प्रतीक आहे.