आपल्याला 'चड्डीत रहायला' शिकवलं कोणी ?
मंडळी, एखादा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढवून बोलत असेल तर आपण किती सहज म्हणतो, "ए… चड्डीत राहायचं!" आता चड्डीत राहायचं म्हणजे काय तर लायकीत राहायचं. पण तुम्ही हा विचार केलाय का की, आपल्याला चड्डीत राहायला शिकवलं कुणी? आता तुम्ही म्हणाल, त्यात काय? लहानपणी ज्यांनी चड्डी घालायला शिकवलं त्यांनीच. पण तसं नव्हे मंडळी. चड्डी ज्याने शोधली त्यानेच सर्वांना चड्डी घालायला शिकवलं. या चड्डीला सुद्धा अनेक वर्षांचा इतिहास आहे बरं का. चामड्याच्या पट्टीपासून ते आजच्या जॉकी पर्यंत चड्डी हा प्रकार कसा बदलत गेला ते आपण पाहणार आहोत. तर मग चला चड्डी पाहू… सॉरी सॉरी… चड्डीचा इतिहास पाहू.
खरं तर आपल्या सर्वांनाच छान टापटीप राहायला आवडतं. आणि छान दिसण्यासाठी छान छान कपडे पण लागतात. पण मंडळी, फक्त बाह्यवस्त्र छान असून उपयोग नाही. अंतर्वस्त्रे छान असतील तर माणसाला एक प्रकारचा कंफर्ट येतो. अंतर्वस्त्रे हा काही दाखवण्याचा भाग नाही. किमान सर्वसामान्य लोकांसाठी तरी नाही. हिरो हिरॉइन्सची गोष्टच वेगळी असते ते सोडून द्या! तर या अंतर्वस्त्रात चड्डी सुद्धा येते जिला आपण विविध प्रकारांनी ओळखतो. या चड्डीचा इतिहास थोडा थोडका नाही तर सात हजार वर्षांपूर्वीचा आहे. त्या काळातल्या चामड्याच्या चड्ड्या उत्खननात सापडल्या आहेत. यांचा आकार एखाद्या पट्टीसारखा असे. जंगली जनावरांची शिकार करताना पळताना अडथळे येऊ नयेत म्हणून यांचा वापर होत असे. त्यानंतर थेट रोमच्या इतिहासात चड्डीचा उल्लेख येतो ज्याला Subligaculum असं म्हणत असत. कदाचित तुम्ही सिनेमात पाहिलं असेल की रोमन योद्ध्यांच्या अंगावर Subligaculum सोडून दुसरा कुठलाच कपडा नसे. याचा आकार कमरेभोवती गोल चामड्याचा बेल्ट आणि त्याखाली लज्जारक्षणासाठी बांधलेले कापड असा असायचा. याचवेळी भारतात लंगोट प्रचलित होते. लंगोट हे खास पद्धतीने बांधण्याचे सलग लांब वस्त्र होते.
मंडळी, युरोपातल्या रेनेसान्स अर्थात पुनर्जागरण काळानंतर सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अनेक बदल घडले. आणि अर्थातच आपल्या चड्डीत सुद्धा बदल घडले. याचवेळी चड्डीला समोरच्या बाजूने मूत्रविसर्जनासाठी बांधता येईल अशी एक फट ठेवली जाऊ लागली. आता एवढ्या एका गोष्टीसाठी पूर्ण चड्डी काढण्याची आवश्यकता उरली नाही. अश्या सुधारणा होत असताना चड्डीच्या कापडातही सुधारणा होऊ लागल्या. अधिकाधिक सुखकर असे कापड वापरले जाऊ लागले ज्यात सुती कापड प्रामुख्याने लोकांना आवडू लागले. सुती कापडाच्या चड्ड्या या गुडघ्यापर्यंत लांब असायच्या. पण नंतर त्यांचा आकार लहान होऊ लागला. एकोणिसाव्या शतकात एक जॉन सुलीवन नावाचा एक बॉक्सर अशीच एक लहान चड्डी घालून रिंगणात उतरला होता. ती चड्डी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि तिला 'बॉक्सर' असेच म्हटले जाऊ लागले. 1935 मध्ये पहिली जॉकी बनवली गेली जी 'वाय' या आकारात होती. शिकागोमधल्या एका वस्त्रप्रदर्शनात ही जॉकी चड्डी एवढी लोकप्रिय झाली की तिथून ती जगभरात पोहोचली.
आता जॉकीचा विषय निघालाच आहे तर जरा त्याचाही इतिहास पाहूया मंडळी. 1878 मध्ये कूपर नावाच्या व्यक्तीने कूपर अँड सन्स नावाची कंपनी काढली होती. ही कंपनी सॉक्स तयार करत असे. मग हळू हळू ही कंपनी अंडरगारमेंट्स सुद्धा बनवू लागली. आधी उल्लेख केल्याप्रमाणे 1935 मध्ये पहिली जॉकी बनली. नंतर अगदी काही वर्षातच जॉकीने जगभरात आपले बस्तान बसवले. चड्डीच्या पट्टीवर स्वतःचे ब्रँडनेम लिहिणारी हीच पहिली कंपनी. या चड्डीच्या लोकप्रियतेमुळे कंपनीचे नाव बदलून जॉकी असेच करण्यात आले. इतकंच काय तर 1948 मध्ये ब्रिटिश ऑलिम्पिक टीमची अधिकृत अंडरवेअर म्हणून जॉकीला मान्यता मिळाली. मंडळी, आणखी एक गंमत ऐका, गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होणार नाही असे इनरवेअर अपोलो 11 या पहिल्या मानव चांद्रमोहिमेसाठी जॉकीनेच बनवले होते. म्हणजेच, नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा चंद्रावर उतरला तेव्हा त्याच्या अंगावर जॉकी होती!
मंडळी, सुरुवातीला जो प्रश्न आम्ही विचारला होता की, आपल्याला चड्डीत राहायला कुणी शिकवलं? तर त्याचं उत्तर जॉकी असंच असेल. कारण ही चड्डी आल्यापासूनच पुरुषांचे आणि महिलांचे इनरवेअर वेगवेगळे झाले. महिलांची लॉंजरी आणि पुरुषांचे चड्डी बनियन वेगवेगळे समजले जाऊ लागले. त्यांच्या शारीरिक रचनेप्रमाणे आकारही वेगवेगळे बनले. आधुनिक काळातल्या चड्डी संक्रमणामागे जॉकीच आहे.
आता एवढं सगळं समजलं तर आणखी एक गोष्ट समजून घ्या. आपल्याकडे चड्डी हा विषय तसा कमीच चर्चिला जातो. पण चड्डी वापरतात तर सर्वच जण. आपल्याकडे एक जाहिरात आली होती 'ये तो बडा टॉइंग है…' ही टॅगलाईन भन्नाट गाजली होती पण त्यावेळी आजच्यासारखं मोकळं वातावरण नसल्याने जाहिरात बॅन केली गेली. आजवर चड्डीवर एकच गाणे बनले आहे… कोणते? अहो, आपल्या गुलजार साहेबांनी लिहिलेले 'जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहेन के फुल खिला है फुल खिला है…' आठवलं? नुसतंच आठवलं नाही तर तालासुरात म्हणून पण झालं असेल हे आम्हाला माहिती आहे.
भारतात चड्डी बनवणाऱ्या कंपन्या कमी नाहीत. त्यात व्हीआयपी, डॉन, लक्स इत्यादी कंपन्या आपल्या ओळखीच्या आहेत. हां तर काय सांगत होतो की भारतात जॉकी चड्डी बनवण्याचे लायसन्स आहे 'पेज इंडस्ट्रीज' या कंपनीकडे. 2007 साली जर या जॉकी बनवणाऱ्या कंपनीचे वीस शेअर्स घेतले असते तर आज पुढच्या चार पिढ्या आयुष्यभर वापरतील एवढ्या चड्ड्या विकत घेता आल्या असत्या. कारण, तेव्हा त्याच्या एका शेअरचा भाव दोनशे सात रुपये होता आणि आज तब्बल चाळीस हजारांच्या आसपास आहे! म्हणजे तेव्हाचे 4,140 रुपये आज आठ लाखांचा परतावा देऊन गेले असते. म्हणून मंडळी, चड्डीच्या कंपनीला कमी समजू नका. कोण किती पाण्यात आहे याचा अंदाज आपल्याला नसतो. अहो, आपल्यापैकी काही लोक तर शंभर ठिकाणी भोकं पडल्याशिवाय नवीन चड्डी घेत नाहीत आणि जुनी चड्डी टाकूनही देत नाहीत. तिला फरशी पुसायच्या कामी आणतात तेव्हा शेअर्स घेणे तर लांबची गोष्ट.
आता जाता जाता एक धमाल किस्सा सांगतो आणि हे चड्डीपुराण संपवतो. मंडळी, Calvin Klein या कंपनीचे नाव तुम्ही ऐकून असाल. नव्हे, दिशा पटाणीने ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये नेलं आहे. तर या कंपनीचा संस्थापकाने स्वतःचे नावच कंपनीला ठेवले. या Calvin Klein ची मुलगी Marci Klein टीव्ही प्रोड्युसर होती. लहानपणापासून आपल्या वडिलांच्या ब्रँडच्या सान्निध्यात राहिल्याने या ब्रँडची सर्वव्यापकता तिला त्रासाची ठरली. ती कशी? तर एकदा एका मुलाखतीत ती म्हणाली, "ज्या ज्या वेळी एखाद्या मुलासोबत मी बेडवर जाते, तेव्हा तेव्हा मला माझ्या बापाचे नाव दिसते. आणि मग…"
मंडळी कसा वाटला लेख? कमेंट करून नक्की कळवा.
-अनुप कुलकर्णी