कधी हा म्हातारा भेटलाच तर बँकेवर हसतखेळत दरोडा कसा घालायचा हे विचारून घ्या !
आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात जे अगदी हसतखेळत आपल्या आयुष्याचा भाग बनतात. पण ऐनवेळी ते असा विश्वासघात करतात की विचारता सोय नाही. या प्रकारचा अनुभव अनेकांना आलेला असतो.असा झटका खाल्लेले लोक परत कुणावर विश्वास ठेवावा की नाही या विचारात पडतात.. एखाद्या व्यक्तीला गोडीगुलाबीत विश्वास जिंकून फसवणे वेगळे, मात्र एका बाबाने हसतखेळत बँकेच्या लॉकरवर डल्ला मारला.आज आपण याच दरोड्याची गोष्ट वाचणार आहोत
बँक लुटण्याचा रूढ मार्ग कोणता तर मास्क लावायचा सोबत हत्यार घ्यायचे आणि दरोडा टाकायचा हेच आपल्याला माहीत असते. पण या चोरीत हत्यारे होती चॉकलेट आणि बिस्कीट!!! ही कहाणी वाचली तर आपले धूम सिरीजचे पिच्चर देखील फिके वाटायला लागतील. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊ!!!
बेल्जियम येथील अँटवर्प हे शहर हिऱ्यांची राजधानी म्हणून ओळखले जाते. साहजिकच इथल्या बँका पण हिऱ्यांनी भरलेल्या असतात. अजून एक साहजिक गोष्ट म्हणजे चोऱ्यांसाठी याच शहरातील बँकांची निवड करण्यात येते. काही चोऱ्या अयशस्वी होतात तर काही यशस्वी होऊनही नंतर पकडले जातात. या स्टोरीतील व्हिलन यशस्वी पण झाला आणि सापडला पण नाही.
२००७ साल सुरू होते. बेल्जियम येथील अँटवर्प येथील एबीएन अँम्रो बँकेचा कारभार नेहमीप्रमाणे सुरळीत चालला होता. या बँकेचा एक नियमित ग्राहक होता. कार्लोस हेक्टर फ्लेमनबाम असे कठीण नाव असले तरी अतिशय सरळ असा हा इसम होता. आपल्याकडे जसे म्हातारे लोक काही काम नसले तर बँकेत जाऊन पासबुकची एन्ट्री मारून येतात. तसे हा कार्लोस पण दर एक दोन दिवसांनी बँकेत जाऊन काहीतरी काम करत असे.
त्याची ओळख ही एक यशस्वी हिरा व्यापारी अशी होती. ही ओळख पटावी अशी प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे बघून दिसत असे. एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक हा तेवढ्याच मोठ्या मनाचा पण मालक आहे असे लोक म्हणत. बँकेला गेला की अतिशय नम्रपणे कर्मचाऱ्यांसोबत बोलणे, तिथे आलेल्या लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट देणे अशा प्रकारे त्याने सर्वांचे मन जिंकले.
दरवेळी हा बँकेत काही जास्त पैसे जमा करत असे.सोबत बँक कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देणे, त्यांच्याशी मैत्री करणे असेही काम सोबतच सुरू असे. जवळपास ६० वर्ष वयाचा दिसणारा हा माणूस आता पूर्ण बँकेतील लोकांचा अगदी घरातला माणूस झाला होता. अगदी डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठवावा असा !
पुरेसा विश्वास जिंकल्यावर जसे आपल्याकडे एखादा पैसा ठेवलेल्या ठिकाणी जाऊन आला तरी आपण शंका घेत नाही असेच त्यांच्याही बाबतीत झाले. या कार्लोस हेक्टरने संपूर्ण बँकेची माहिती तर घेतलीच पण त्याने या काळात याच कर्मचाऱ्यांकडून जिथे हिरे ठेवले होते, त्या लॉकरच्या सर्व सुरक्षा व्यवस्थेची माहिती पण घेतली. आणि शेवटी तो दिवस उजाडला जेव्हा त्याने लॉकरची चावी मिळवली.
सर्वांचा लाडका असा हा कार्लोस हेक्टर त्याच बँकेतून १,२०,००० कॅरटचे हिरे घेऊन बाहेर पडला. या हिऱ्यांची किंमत किती असेल? तर तब्बल २ कोटी ८० लाख डॉलर!!! तो जसा गायब झाला तसा आजवर सापडला नाही. आता हे कार्लोस हेक्टर हे त्याचे खरे नाव नव्हते. ते नाव देखील चोरी केलेले होते.
इस्त्रायलला या घटनेच्या काही वर्षांपूर्वी याच नावाचा एक पासपोर्ट चोरी झाला होता. अशा पद्धतीने अतिशय थंड डोक्याने त्याने वर्षभर संपूर्ण बँक कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध तयार केले आणि संधी मिळताच कोट्यावधींचे हिरे घेऊन त्याने पोबारा केला. आजवर तो सापडू शकलेला नाही. या चोरीसाठी त्याने कोणी साथीदार निवडला होता का त्याला बँकेतून कोणी मदत केली का असे सर्व प्रश्न आजही अज्ञात आहेत.