एकेकाळी गरजेपोटी वापरली बर्मुडा शॉर्ट्स जगभरात 'लेटेस्ट फॅशन' कशी झाली ?
आजचा लेख म्हणजे आपल्या सर्वांचा हाफ पँट ते बर्म्युडा शॉर्ट्स या प्रवासाचा मनोरंजक आढावा आहे.एकेकाळी मिसरूड फुटायच्या वयात कोणी 'हाप्पँट'वापरत असेल तर त्याला पांडू हवालदार म्हटले जायचे. पण आता तर सगळ्याच वयातले लोकं , त्यात महिला पण आल्याच, बर्म्युडा शॉर्ट्स घालून फिरतात आणि त्याला 'फॅशन स्टेटमेंट' असं म्हटलं जातं.चला तर वाचू या फॅशनचा प्रवास !
हा बर्म्युडा शॉर्ट्स कसा बनला? नेमका आला कोठून ?
बर्म्युडा शॉर्ट्स मूळत: २० व्या शतकात ब्रिटीश सैन्यासाठी तयार करण्यात आले होते. खरं तर ही बर्म्युड्याची संकल्पना ब्रिटीश सैन्यातच काम करणाऱ्या व्यक्तीने अस्तित्वात आणली. जुन्या ब्रिटीश जमान्यात उष्णकटिबंधीय भागात कर्तव्य बजावताना लष्करी कर्मचार्यांचे पोषाख हलक्या वजनाचे आणि आरामदायक आहेत का हे पाहणे,हे त्या सैन्यातील व्यक्तीचे काम होते...
उपोष्णकटिबंधीय म्हणजे -दमट आणि गरम -हवामानात लांबडी विजार म्हणजे फुल पॅन्ट वापरणे शिपायांना कठीण जात होते. ग्रीन हॉवर्ड्स, ही बर्म्युडातील पहिली ब्रिटीश आर्मी रेजिमेंट होती.बर्म्युडा वसाहत ब्रिटीश साम्राज्याच्या वसाहतींपैकी एक,ज्यांनी अधिकृतपणे बर्म्युडियन शॉर्ट्स वापरायला सुरुवात केली.आर्मी शॉर्ट्स आणि ऑफिसर्सचे लांब सॉक्स. थोडक्यात हाफ चड्डी आणि लांबलचक मोजे !! हॅमिल्टन शहरातील शिंप्यांनी बर्म्युडा शॉर्ट्सच्या वेशात काही प्रमाणात बदल केले आणि ती फॅशन म्हणूनही प्रस्थापित केली. अशाप्रकारे बर्म्युडा शॉर्ट्सचा इतिहास इथून सुरू होतो.
बर्म्युडा शॉर्ट्सचा जन्म कसा झाला याच आणखीन एक उदाहरण देता येईल...
मूळचे स्थानिक बर्मुडियन नॅथॅनियल कॉक्सन यांचे एकमेव चहाचे दुकान त्याकाळी बर्मुडा येथे होते.बर्मुडात नौकानयन अधिकाऱ्यांचे येणे जाणे वाढले आणि अचानक ते हॉटेल एकदम जोरदार चालायला लागले. त्या अचानक वाढलेल्या खपामुळे कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण पडला व त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला. अचानक वाढलेल्या खपामुळे कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण पडला व त्यांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला.कर्मचाऱ्यांनी याची तक्रार कॉक्सन यांच्याकडे केली. त्यावेळी त्यांचा पोशाख निळ्या रंगाचा कोट व खाकी फुल्ल पॅन्ट असा होता. कॉक्सन हे अतिशय चतुर व्यावसायिक होते. त्यांना कर्मचाऱ्यांच्या पोशाखावर अधिक खर्च करायचा नव्हता. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली.त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या खाकी पॅन्ट या मागवून घेतल्या आणि त्या गुडघ्यापासून कापल्या आणि जन्म झाला पहिल्या वहिल्या बर्म्युडा शॉर्ट्सचा. रिअर ॲडमिरल असलेल्या मसॉन बेरिज हे त्या चहाच्या हॉटेल मध्ये नेहमी यायचे त्यांना हे नवीन पोशाख आवडला त्यांनी या पोशाखाचा उपयोग त्यांच्या अधिकाऱ्यांच्या पोशाखात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बर्म्युडा शॉर्ट्स असे नाव दिले...
सुरुवात झाली लोकल फॅशन म्हणून :-
विसाव्या शतकात बर्म्युडा शॉर्ट्स अधिकच नावारूपात आले.फक्त समुद्र किनाऱ्यावरतीच नव्हे तर रस्त्यावर फिरतानाही देखील बर्म्युडा शॉर्ट्स वापरू जाऊ लागले. १९२० च्या सुमारास बर्मुडियन बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी देखील बर्म्युडा शॉर्ट्स घालायला सुरुवात केली. त्यानंतर ते समुद्रकिनारी आणि उत्तम हॉटेल मध्ये देखील दिसू लागले..समुद्राच्या निळ्यागर पाण्याला, गुलाबी वाळूला आणि आजूबाजूच्या हिरवळीला साजेशी अशी सुंदर रंगसंगतीय या पँटी मिळायला लागल्यावर त्याचे फॅशनमध्ये रुपांतर झाले.१९५० च्या दरम्यान महिलांना देखील बर्म्युडा शॉर्ट्स घालण्याची परवानगी दिली गेली. त्या अगोदर गुडघाभर पाय दाखवणे असभ्य वर्तन मानले जायचे. खरंतर छोटे शॉर्ट्स घातल्या बद्दल दंडात्मक कारवाई पण केली जात असे.
****
हिवाळ्याच्या लांब सुट्टीसाठी वाफेवर चालणाऱ्या जहाजेतून येणारे ब्रिटिश पर्यटकांनी हे बर्म्युडा वापरायला सुरुवात केली आणि त्यांनी या फॅशनचा अमेरिका आणि जगाच्या इतर भागात प्रसार केला.काही वर्षातच बर्म्युडा म्हणजे व्यावसायिक पोशाख अशी ओळख न रहाता 'कॅज्युअल वेअर' म्हणून ओळखले जाऊ लागले. इतकंच नाही तर बर्मुडाच्या कायम लांब पॅन्ट वापरणार्या स्थानिक व्यावसायिकांनी देखील उन्हाळ्यात कोरड्या हवामानात लांब पॅन्ट ऐवजी बर्म्युडा शॉर्ट्स वापरायला सुरुवात केली.
फॅशनेबल आणि ट्रेंड सेटीग
अगदी अलीकडच्या काळात या डिझाइनर असलेल्या Christian Dior , Armani, Ralph Lauren यांच्यासारख्या ब्रँड्सने आपल्याच अंदाजात पॅरिस आणि न्यूयॉर्क सिटी रनवे मध्ये सादर केला. हॉलिवूड चित्रपट सृष्टीने देखील याची उत्तम दखल घेतली आणि ते बर्मुडाला रेड कार्पेट पर्यंत घेऊन गेले. अतिशय लोकप्रिय असे दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि निर्माते फॅरल यांनी बर्म्युडा शॉर्ट्स २०१४ अॅकॅडमी अवॉर्ड्स समारंभात वापरले होते. जन्माने बर्मुडियन असलेल्या फॅशन डिझाइनर रेबेका हॅन्सन यांनी TABS स्वरूपात बर्म्युडा शॉर्ट्सला नवीन रूप दिलेले आहे. बर्म्युडा आयर्लंड सारख्याच त्या ट्रेण्डी आणि सुंदर रंगसंगती असलेल्या आहेत. TABS फक्त स्टायलिशच नाहीत तर सुती कपड्यांपासून बनलेल्या आरामदायी आहेत
हा लेख लिहिता लिहिता...
.हा लेख लिहिता लिहिता एक मजेदार संवाद आमच्या कानावर पडला तो वाचाच असा आमचा आग्रह आहे.
'आमची म्हणजे माझ्या भावी सुनेची आणि माझी ओळख होण्याच्या दिवसात हळूच ती मला विचारत होती
"आई आमच्या लग्नानंतर घरी ड्रेस वापरले तरी चालतील ना ?"
मी अगदी बेसावध उत्तर दिलं"अगं काहीही वापर ,आपल्याकडे वातावरण मोकळीकीचं आहे "
सारांश इतकाच की मुलाच्या लग्नाअगोदर बाल्कनीत दोन बर्मुडे वाळत असायचे आता तीन बर्मुडे वाळत असतात.
अभिषेक मिनाक्षी कोकरे