मॅकडॉनाल्ड फ्रेंच फ्राइज कसे बनवते तुम्हाला माहित आहे का ?
फ्रेंच फ्राइज म्हणजे आहे काय अन् नाही काय? तेल गरम केलं, बटाट्याचे काप काढले, तळले, त्यावर मीठ पेरलं आणि झाले तयार फ्रेंच फाइज -इतकी सोपी रेसीपी नाही बरं मॅकडॉनाल्डच्या फ्रेंच फ्राइजची!
मुळात बटाटा म्हणजे फक्त बटाटा हा आपला समज असतो, पण उत्कृष्ट फ्रेंच फ्राइज बनवायच्या असतील तर कोणत्या जातीचे-कोणत्या वाणाचे बटाटे घ्यायचे हे पण निश्चित करावं लागतं. उदाहरणार्थ आपल्या घरी भाजीसाठी जो बटाटा वापरला जातो, त्या बटाट्याची जात कुफ्री बादशाह किंवा कुफ्री पुखराज असते. वाटोळे, मध्यम आकाराचे हे बटाटे फ्रेंच फ्राइज बनवायला चालत नाहीत. तुम्ही निरिक्षण केलं तर असं लक्षात येईल की मॅक फ्राइज लांबसडक असतात. लाल पाकीटातून डोकावणारा फ्रेंच फ्राइजचा गुच्छ डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या फ्राइजसाठी रताळ्यासारखे लांबट बटाटे लागत असतील. असे लांबसडक बटाटे फक्त रसेटो बरबँक या जातीचे असतात. हे वाण भारतात मिळतच नाही, मग बटाटे काय रोज अमेरिकेतून इकडे येतात का काय? नाही.
मॅकची कामाची पध्दतच इतक्या बारकाव्यांनी भरलेली असते की त्यांना हवे असलेले बटाटे ते आपल्याच शेतकर्यांकडून पिकवून घेतात. त्यासाठी त्यांनी तीन-चार सोर्सिंग किंवा सप्लायर कंपन्यांना हाताशी धरलं आहे. मॅककेन, कॉनअॅग्रा-आणि सिंप्लॉट या तीन मुख्य सोर्सिंग एजंटची जबाबदारी अशी असते की मॅकला लागणारे बटाटे शेतकर्यांकडून "काँट्रॅक्ट फार्मींग " पध्दतीने पिकवून घ्यायचे आणि मॅकला सप्लाय करायचे.
हे झालं फ्राइजच्या बटाट्याबद्दल. आता बघू या यामध्ये असणार्या रसायनांबद्दल..
एकदा का बटाटा शेतातून मॅकच्या प्रोसेसींग युनिटला आला की आधी सांगीतल्याप्रमाणे ब्लँच केला जातो. त्याच्यावरचे मातीचे अंश, खत आणि कीटकनाशकाचे अंश नाहीसे करण्याचा प्रयत्न केला जातो. या बटाट्याच्या उभ्या काचर्या किंवा उभे काप केले की ते काळपट पडू नयेत म्हणून ते सोडीयम अॅसिड पायरो फॉस्फेटच्या (०.०८ %) द्रावणातून काढले जातात. ब्लँचींगच्या दरम्यान त्यातली साखर कमी झाली असते म्हणून डेक्स्ट्रोज (एक प्रकारची साखर)सुद्धा पेरली जाते. ते काप टिकावे म्हणून सायट्रीक अॅसिड वापरले जाते. त्याखेरीज काही नैसर्गीक फ्लेवर्स शिंपडले जातात. कोणताही पदार्थ तळताना तेलात फेसच फेस निर्माण होतो . तो टाळण्यासाठी डायमिथील पॉलीसिलोक्झेन या एका रसायनाचा वापर केला जातो. तळलेल्या पदार्थाला वापरात येणार्या तेलाची चव असते म्हणून कॅनोला, सोयाबीन या सारखी तेलं तळणात वापरली जातात. पाह्यलंत, फ्रेंच फ्राइज तुमच्यासमोर येईपर्यंत प्रत्येक पायरी किती नियोजनबध्द असते.
असे हे फ्रेंच फ्राइज बघता बघता संपतात आणि पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. यालाच तलफ येते किंवा चटक लागते असे म्हणतात. जोपर्यंत एखादा खाद्य पदार्थ वारंवार हवाहवासा वाटत नाही, तो पर्यंत त्याचा खप वाढत नाही. हे लक्षात घेऊनच फ्रेंच फ्राइजची रेसेपी बनवली गेली असते हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. या चटक लावण्यात हातभार असतो मीठाचा, तेलाचा आणि फ्रेंच फ्राइजच्या रंगाचा!! मॅकच्या दुकानात गेल्यावर मेन्यू लक्ष देऊन वाचला तर लक्षात येईल की प्रत्येक पदार्थासोबत 'काँबो'मध्ये फ्रेंच फ्राइज असतातच. साहजिकच फ्राइजचा खप वाढतो, चटक लागते आणि ग्राहक वारंवार दुकानात यायला लागतो.
नेमका हाच मुद्दा मायकेल पोलन नावाच्या एका चळवळ्या पत्रकाराने मांडला आहे त्याच्या म्हणण्याप्रमाणं घरचं खाणं आणि बाहेरचं खाणं यात फरक असा आहे की बाहेरचं खाणं हे नफ्यासाठी बनवलं असतं, तर घरचं खाणं पोषणासाठी बनवलं असतं. खायचंच असेल घरचं अन्न खा, कंपन्यांनी बनवलेलं नको. हा मुद्दा स्पष्ट करताना त्यांनी मॅकच्या फ्रेंच फ्राइजचं उदाहरण दिलं आहे. रसेट बरबँकचे म्हणजे फ्रेंच फ्राइजसाठी वापरल्या जाणार्या खास बटाट्याचं उत्पादन वाढावं म्हणून ' मॉनीटर' नावाचे किटकनाशक वापरलं जातं. हे कीटकनाशक इतकं विषारी असतं की फवारणीनंतर शेतकरी पाच दिवस शेतात फिरकतच नाहीत. हे कीटकनाशक बटाट्याच्या पोटात उतरतं म्हणून बटाटे शेतातून काढल्यानंतर बरेच दिवस सुकायला ठेवले जातात. त्यातून ते कीटकनाशक पूर्णतः बाहेर पडतंच असं काही नाही. कंपन्या अन्न बनवताना अन्नपदार्थाची चटक कशी लागेल याचाच विचार करतात.
तुमच्या आवडत्या फ्रेंच फ्राइजच्या दोन्ही बाजू आम्ही तुमच्यासमोर मांडल्या आहेत. खायचं कुठे ते तुम्हीच ठरवा.