कथा विविध देशांच्या : 'लाटव्हिया' भारतीयांसाठी कसा आहे? तिथं काय करावं आणि काय करू नये?
आपला देश कुणाला प्यारा नसतो ? पण अशी काही वेळ येते की माणसं स्वतःचं गावच नाही तर देश सोडून परदेशी जातात. एक काळ असा होता की लोक "बालीष्टरी" शिकायला लंडनला जायचे आणि भारतात येऊन वकीली करायचे. त्यानंतरच्या काळात लोक मध्यपूर्वेत म्हणजे "दुबयला" जायला लागले. पण मग तिकडे युध्दं सुरु झाली ,तेलाचे भाव पडले, नोकर्या कमी झाल्या आणि तिकडे जाणार्यांची संख्या कमी झाली. १९९५ च्या नंतर अमेरिकेला जाणार्यांची संख्या वाढायला लागली. इन्फोसीस, टीसीएस, पटणी, विप्रो, यांसारख्या कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना अमेरिकेत पाठवायला लागल्या. अमेरिकेचे ग्रीन कार्ड - एच १ बी व्हिसा यासाठी लोकं जीव टाकायला लागले हे सगळं तुम्हाला माहिती आहेच. पण ओइसीडी (ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमीक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट) या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिलेली आकडेवारी बघितली, तर असं कळेल की भारतीय नागरीक आता फक्त कॅनडा अमेरिकाच नव्हे, तर अनेक अशा देशात स्थिरावली आहेत की काही देशांची नावं आपण ऐकली पण नसतील. चला बघू या, हे देश कोणते आणि आपल्या भारतीयांचा या देशांत काय अनुभव आहे! काय सांगावं आपल्यापैकी काही या देशात जातील पण. नाही का? आजचा देश आहे लाटव्हीया (लात्वीया)
आहे कुठे हा देश?
लाटव्हिया -इस्टोनीया- लिथुआनीया या तीन देशांना बाल्टीक देश म्हणतात. हा लात्वीया त्यापैकीच एक. उत्तर युरोपात बाल्टीक समुद्राच्याजवळ असलेल्या या देशाचे शेजारी आहेत रशिया आणि बेलारूस. अर्थात पूर्वी बेलारुसही रशियाचाच भाग होता. लात्वीयाच्या समुद्री किनार्याला लागून स्वीडन आहे. कडाक्याची थंडी असलेल्या या देशात संमिश्र लोकवस्ती आहे. रशिया, बेलारूस या देशात मूल वस्ती करणारे काही लोक आता इथले नागरीक आहेत. तशी मूळ लाटव्हिअनांची संख्या एकूण लोकवस्तीच्या ६२ टक्के आहे.
भारतीय लोक इथे का जातात ?
मुख्यतः शिक्षणासाठी विद्यार्थी इथे येतात. इथं शिकायचम असेल, तर व्हिसा सहज मिळतो. हा देश युरोपियन युनियनचा सदस्य असल्याने त्यांचा 'इरॅस्मस मुंडस' या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग आहे. भारतासारख्या विकसनशील देशांच्या विद्यार्थ्यांना इथे खास सवलती मिळतात. शिक्षण चालू असताना इन्टर्न (शिकाऊ उमेदवार ) म्हणून सहज नोकरी मिळते. ही सोडून इथं शिक्षण घेण्याची इतरही काही कारणं आहेत. म्हणजे पाहा- इथं शिक्षण शुल्क म्हणजे फी अत्यंत कमी आहे. ॲडमिशनसाठी IELTS ही इंग्रजीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्याची सक्ती नाही. व्हिसासाठी प्रत्यक्ष जावे लागत नाही. शेन्जेन व्हिजा असल्यानं तुमच्याकडं युरोपाचा व्हिजा असेल तर या देशासाठी खास व्हिजा घ्यावा लागत नाही. आणि जर समजा फक्त लात्वियामध्ये शिकण्यासाठी जरी व्हिजा घेतलात, तरी तो शेन्जेन असल्यामुळं पूर्ण युरोपात फिरण्याची मोकळीक मिळतेच की हो. शिक्षणात खंड पडला तरी चालतो. वार्षिक खर्च पाच ते सहा लाख आहे. सगळ्यात महत्वाचं कारण असं की विद्यापीठं जुनी आहेत, त्यामुळे शैक्षणिक दर्जा उत्तम आहे.
इंजीनीअरींगसाठी रीगा नावाची टेक्निकल युनिवर्सिटी सुप्रसिध्द आहे सध्या ३००+ भारतीय विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहेत. प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी शेन्जेन व्हिसाच्या अंतर्गत येणार्या इतर देशात नोकरी करण्याची मुभा आहे. इथं शिक्षण झाल्यावर भारतात चांगल्या पगाराची नोकरी मिळते. घरच्या अन्नाची फारच आठवण यायला लागली, तर इंडीयन राजा, परोठा, सिंग्ज, नमस्ते रीगा सारखी भारतीय जेवण देणारी हॉटेलंपण आहेत.
नमस्ते रीगा मधला मेन्यू (स्रोत)
नोकरीसाठी मात्र फार मोठ्या संधी इथे उपलब्ध नाहीत. याची कारणंही बरीच आहेत. केवळ इंग्रजी भाषा येणार्यांसाठी इथं नोकरी मिळणं कठीण आहे. इथे शिक्षण घेताना स्थानिक भाषा शिकून घेतली आणि सोबत टेक्निकल स्किल असेल, तर नोकरी मिळेल. असे नसेल तर इथं नोकरी शोधू नये. नोकरी मिळाली तरी पगार तासाला एक ते दो युरो म्हणजे, महिन्याला फारतर सहाशे युरो मिळतात. त्यापेक्षा इथं शिक्षण घेऊन भारतात नोकरी केलेली जास्त परवडते.
लाटव्हियामध्ये भारतीयांनी तयार केलेली क्रिकेट टीम (स्रोत)
इथली माणसं कशी आहेत?
माणसांच्या बाबतीत इथं संमिश्र प्रतिक्रिया ऐकू येतात.
अपर्णा वीर या पुण्याहून लाटव्हियाला गेलेल्या विद्यार्थीनीचा अनुभव असा आहे की
अपर्णा वीर (स्रोत)"मी २०१५ साली पहिल्यांदा लाटव्हियाला गेले, तेव्हा माझ्याकडे बघताना ही "फॉरेनर आहे" असे समजून सगळे वागत होते, पण मी भारतातून आले आहे, एशियन आहे , ब्राऊन स्किनवालि आहे, एकटी परदेशात फिरते आहे याचे फारसे अप्रूप कोणाला वाटले नाही. आणि वाटले असले तरी कोणी जाणवू दिले नाही. इंडीया म्हटल्यावर कोणीही हत्ती, साप असे बावळट प्रशन विचारले नाहीत. मी सर्वत्र एकटी फिरत होते, पण मला कुठेही असुरक्षीत वाटले नाही ".
पण दुसर्या एकाच्या मते "९९ टक्के गोरी प्रजा असलेल्या या देशात भारतीयांनी जाऊ नये. इथे वर्णद्वेष आहे आणि नेहेमी जाणवतो. मी बिझिनेससाठी गेलो असल्याने आणि सूट वगैरे घातला असल्याने मला चांगले वागवले गेले. पण तुम्ही इथे येऊ नका"
महत्वाची सूचना: हा देश अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर तांत्रिक अभ्यासाठी उत्तम आहे. पण नोकरीचा विचार केला तर भारतात अनेक "नोकरीचे दलाल" जे चित्र दाखवतात ते खरे नाही. त्यांच्या प्रचाराला बळी पडू नये.