computer

ढिगभर प्रश्न न विचारता एखाद्याला कसं ओळखायचं? हे कौशल्य मिळवण्यासाठी ह्या घ्या खास टिप्स !!

काही लोकांना इतरांशी संवाद साधून ओळख करण्यास त्रास होत नाही. अगदी अनोळखी लोकांशी पण त्यांची काही मिनिटांतच मैत्री होते. परंतु हे कौशल्य प्रत्येकालाच अवगत नसतं. नवीन व्यक्तीबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या मनात प्रश्नांची लांबलचक यादीच तयारच असते. मैत्री करण्यासाठी प्रश्न विचारणे ही एक चांगली सुरुवात आहे. पण ढिगभर छोटे छोटे आणि उथळ प्रश्न न विचारता एखाद्याला कसं ओळखायचं? हे कौशल्य आत्मसात करण्यासाठी आज आम्ही काही मार्ग सुचवतो आहे. बघा वाचून!

अस्सल प्रश्न विचारा-

आता अस्सल प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाशिवाय संभाषण अस्तित्वात येऊच शकत नाही आणि आपल्याला ज्या प्रश्नाच्या उत्तरात खरोखरच रस आहे असे प्रश्न म्हणजे अस्सल प्रश्न!

आता एक प्रश्न विचारून थांबायचं का? तर नाही. असेच प्रश्न विचारा ज्यामुळे संभाषण पुढेही सुरू राहील. विचार करा एखाद्याने आपणास निरर्थक असे बरेच प्रश्न विचारले तर आपणास कसे वाटेल?

उदा:“तुमच्या वडिलांचे नाव काय आहे?”, “तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का?”, “तुमचा आवडता पदार्थ कोणता?”, आता बघा, एका प्रश्नाचा दुसर्‍या प्रश्नासोबत काहीही संबंध नाही. संभाषणाच्या सुरुवातीलाच असे प्रश्न विचारणे म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या मनात एखाद्या नोकरीसाठीच मुलाखत घेताय का काय अशी भावना जागृत करण्यासारखं आहे .

आता बघा, मुद्दाम ठरवून प्रश्न विचारणं टाळून अप्रत्यक्ष संकेतावर आधारित सहज प्रश्न विचारणं सोपं आणि न टोचणारं असतं. उदाहरणार्थ, जर आपल्या लक्षात आले की एखाद्या सहकार्‍याच्या लॅपटॉपवर सुंदर कुत्र्यांचा फोटो असलेला वॉलपेपर आहे तर आपण विचारू शकता, “अरे किती छान! ते तुझे कुत्रे आहेत का?”

हा एक मार्ग झाला. पण आपल्या मनात येणार्‍या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न विचारण्याचीही गरज नसते. लोक नैसर्गिकरित्या वेळोवेळी देखील स्वत: बद्दल माहिती प्रकट करतात. त्यामुळे आपण इतरांना प्रश्न न विचारताही फक्त बोलत राहिलो तरी अनेक प्रश्नांची उत्तर मिळतातच.

"कॉफी विथ करण" छापाचे 'रॅपीड फायर' प्रश्न टाळा.

आपण नुकतेच एखाद्या नव्या माणसाला भेटतो. ती व्यक्ती आपल्याला आवडते आणि तिच्याशी दोस्ती करायची इच्छा होते. म्हणून लगेच बर्‍याच प्रश्नांची सरबत्ती करणे हा मैत्री करण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय नाही.अनेक कंटाळवाणे मुलाखत टाइप विचारण्यापेक्षा एकच स्मार्ट प्रश्न विचारा. त्यानंतर पुढची माहिती न विचारता आपोपाप मिळते. म्हणजे पाहा, आपल्याला कुटुंबाबद्दल विचारायचे असेल तर "आपण आपल्या कुटुंबासमवेत किती वेळ घालवता?" असा प्रश्न विचारण्यापेक्षा "तुमच्या अशा बिझी शेड्यूलमध्ये घरच्यांना वेळ देणं कठीणचं जात असेल तुम्हाला नाही?" असा एकच प्रश्न विचारा आणि बघा माणूस न विचारलेली माहिती पण आपण होऊन देतो. थोडक्यात सोड्याच्या बाटली उघडणार्‍या 'ओपनर' सारखा एकच प्रश्न विचारा, पोटातली माहिती आपोआप उफाळून वर येते. बघा हा प्रयोग करून!

संभाषणात येणारा अवघडपणा स्वीकारा.

नव्या ओळखीत अवघडलेपणा नैसर्गिकच असतो. काही वेळा संभाषण कंटाळवाणं होत जातं आणि एक नको असणारी शांतता पसरते तेव्हा ती पोकळी भरून काढण्यासाठी वरवरचे उथळ प्रश्न विचारू नका. संभाषण जबरदस्तीने सुरू ठेवण्यासाठी असे प्रश्न विचारण्याची गरज नाही. हां, चर्चेदरम्यान अवघडल्यासारखं वाटणं पूर्णपणे सामान्य आहे. हे सत्य स्वीकारा.

२०१८ च्या एका अभ्यासात असे आढळले आहे की एखाद्या व्यक्तीसोबत संभाषणाची आरामदायक लय साधण्यासाठी साधारणत: सुमारे एक महिना लागतो. त्यामुळे लगेच खचून जाऊ नका. थोडा वेळ द्या. आपल्या विश्वासू मित्रमैत्रिणींशी प्रश्न विचारून संभाषणाची प्रॅक्टिस करत राहा.

समोरच्या व्यक्तीची उत्तरे सक्रियपणे ऐका.

जर तुम्हाला एखाद्यास समजून घेण्यात खरोखरच रस असेल तर त्यांना आपण फक्त प्रश्नच विचारू शकत नाही, तर त्याच्या उत्तरांकडेही आपण लक्ष दिले पाहिजे आणि आपण लक्षपूर्वक ऐकतो आहे, उत्तरांची नोंद घेतो आहे हे ही समोरच्याला जाणवायला हवे. यालाच 'सक्रिय ऐकणे' म्हणतात. आपण सक्रिय ऐकण्याचे कौशल्य विकसित केले पाहिजे.

या सक्रिय ऐकण्यात आपण बोलत नसतानाही आपण संभाषणात भाग घेतलेला असतो. म्हणजे समोरची व्यक्ती बोलत असताना तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणणं ऐकणे, थोडा त्या व्यक्तीच्या शरीराकडे आपल्या शरीराचा झुकाव असणे, मान डोलवून रिस्पॉन्स देणे वगैरे वगैरे..

समोरच्या व्यक्तीच्या प्रतिसादाकडेही लक्ष द्या.

आपल्या एखाद्या प्रश्नास समोरची व्यक्ती शारीरिक प्रतिसाद कसा देते त्यावरून देखील आपण बरेच काही शिकू शकतो. प्रत्युत्तर देताना ते आपल्या बाजूने झुकत आहेत का? त्यांच्या शरीराचे हवाभाव वगैरे लक्ष देऊन ओळखा. जर ते उत्साही दिसत असतील तर आपण कदाचित एखाद्या चांगल्या विषयांवर बोलत आहात. जर त्यांनी त्यांचे शरीर किंवा डोके फिरवले तर प्रश्न बंद करा किंवा त्यांनी संक्षिप्त उत्तर दिल्यास कदाचित त्यांना जास्त रस नाही अस समजा.

एखाद्याल्या आपल्यासोबतच्या संभाषणात किती स्वारस्य आहे त्याची पातळी ओळखायला शिकणे हे मैत्री पुढे जाण्यासाठी, अधिक यश मिळविण्यासाठी मदत करू शकते. एखादी व्यक्ती कदाचित तुमच्याशी बोलण्यास कमी उत्सुक आहे असे तुम्हाला वाटत असेल तर आपण त्यांना चुकीचे प्रश्न विचारत आहोत असे समजून प्रश्नांचा रोख बदला, विषय बदला किंवा संभाषणाला अर्धविराम द्या.

संभाषणात जागरुकता असली पाहिजे आणि दिसली पाहिजे.

कधीकधी आपले लक्ष विचलित होऊ शकते. आपलं लक्ष विचलित झाल्याचं समोरच्या व्यक्तीच्या नजरेस आलं तर आपल्याला संभाषणात रस नाही नाही असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे आपणास आपले लक्ष विचलित झाल्यासारखं वाटलं तर ते टाळा किंवा संभाषण पूर्णतः थांबवा. आपण संभाषणाकडे खरोखर लक्ष देऊ शकत नसल्यास प्रामाणिक रहा. “मी थोडासा थकलो आहे, आपण या विषयावर नक्कीच नंतर बोलूया" असं स्पष्ट बोला. असं बोलण्याने तुमच्या मनात समोरच्या व्यक्तीबद्दल आदर आहे असा संदेश जाऊ शकतो आणि कदाचित ती व्यक्तीही तुमच्या प्रामाणिकपणाचा देखील आदर करेल.

खोटेपणा टाळा.

समोरच्या व्यक्तीसोबत कनेक्शन बनवण्यासाठी नेहमीच आपल्यात आणि त्या व्यक्तीमध्ये काही साम्य असलेच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. समानतेची क्षेत्रे नैसर्गिकरित्या बाहेर येऊ द्या. त्यामुळे खोटं बोलणं टाळा. आपल्यात काही साम्य नसेल तर ज्या गोष्टीविषयी तुम्हांला आवड आहे त्या गोष्टींचा परिचय करुन घ्या.

कोणाशी तरी संबंध ठेवण्यासाठी लुटुपुटूचं साम्य दाखवण्यात काहीही धोका नाही असं तुम्हाला वाटेल. पण जेव्हा सत्य बाहेर येईल आणि ते सहसा येतेच तेव्हा आधीचे संभाषण फोल जाईल. त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की तुम्ही अतिशयोक्तीपूर्ण बोलला होता. किंबहुना आपली होत असलेली मैत्रीच संपूर्ण लबाडीवर आधारित आहे.

स्वतःबद्दल बोला.

कोणतेही संबंध एकतर्फी नसावेत. जर दुसरी व्यक्ती देखील आपल्याला ओळखत नसेल तर मैत्री जास्त चांगली होणार नाही. प्रश्न विचारण्यासह स्वत:बद्दलही थोडी माहिती शेअर करा. समोरच्या व्यक्तीला आपल्या बद्दल फारच कमी माहिती असल्यास काही लोकांना अस्वस्थ वाटू शकते, म्हणून आपल्याबद्दलही काही गोष्टी शेअर केल्याने त्यांना संभाषण अधिक सहज वाटेल.

प्रशंसा कमीतकमी आणि अस्सल म्हणजेच खरी ठेवा.

समोरच्या व्यक्तीला आपण आवडावे म्हणून एखाद्याचे कौतुक करणे कदाचित एक चांगला मार्ग आहे परंतु आपण ते प्रमाणाबाहेर करू नये. असं केल्याने बहुदा आपण त्या व्यक्तीला अप्रमाणिक वाटू शकतो. तसेच बर्याचदा अती स्तुती लोकांना अस्वस्थही करू शकते. प्रशंसा अर्थपूर्ण आणि प्रामाणिक करावी. मनापासून कौतुक केल्याने एखाद्या संभाषणास प्रारंभ करण्यास मदत होते व एखाद्याला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची संधीही आपल्याला मिळते.

प्रशंसा करताना काळजी घ्या. कपड्यांचा किंवा दागिन्यांची प्रशंसा करण्यात सहसा कोणतीही हानी होत नसली तरी एखाद्याच्या दिसण्याबद्दल किंवा शारीरिक आकाराबद्दल टिप्पण्या करणे टाळा. एखाद्याच्या दिसण्याची आपण काहीतरी सकारात्मक चांगली स्तुती करत असलो तरीही, शारिरीक सुंदरतेवरील टिप्पण्या कामाच्या ठिकाणी नेहमीच योग्य नसतात.

सल्ला देणे टाळा.

अलीकडेच ओळख झालेल्या एखाद्या व्यक्तीने तिच्या वैयक्तिक समस्येबद्दल सांगण्यास सुरूवात केली तर आपली अंतर्मनाची प्रतिक्रिया कदाचित त्यांना सल्ला देऊ अशी असेल. परंतु अशावेळी जोपर्यंत "तुम्ही माझ्या जागी असाल तर काय कराल?" असा प्रश्न समोरची व्यक्ती विचारत नाही तोपर्यंत आपण सल्ले देण्याऐवजी सहानुभूतीपूर्वक ऐकणेच कधीही चांगले आहे. आपण खरोखर मदत करू इच्छित असल्यास स्पष्टपणे “ते खरोखर कठीण आहे. आपल्याला काही मदत पाहिजे असल्यास मला कळवा. मी शक्य असल्यास मदत करेन" असे म्हणा.

"तुम्हाला त्याबद्दल काय वाटते?" किंवा “मी काय करावे?” किंवा “मी तुम्हाला योग्य असे केले असे तुम्हाला वाटते का?” असे सतत प्रश्न विचारल्याने एखाद्यावर इच्छा नसताना, त्यांना सोयिस्कर नसतानाही अशा प्रश्नांची उत्तर देण्याचा दबाव वाढत राहील त्यामुळे असे प्रश्न टाळा.

सतत टेक्स्ट मेसेज पाठवणे टाळा.

मैत्रीच्या सुरूवातीच्या काळातील अस्ताव्यस्तपणा टाळण्यासाठी मेसेज करणे चांगला मार्ग तुम्हाला वाटेल. परंतु विशेषत: मैत्रीच्या प्रारंभिक टप्प्यात टेक्स्ट मेसेजचा भडिमार टाळा. सततचे मेसेज करणे टाळून कधीतरी प्रत्यक्ष भेटीत बोलूया असे म्हणा. इथे संतुलन राखण्याची काळजी घ्यावी. आपण चॅटिंग करीत असतानाही सततचे मेसज करणे टाळा आणि त्या व्यक्तीस प्रत्युत्तर देण्याची संधी द्या. गैरसमज टाळण्यासाठी महत्वाचे विषय वैयक्तिक भेटूनच चर्चेला घ्या.

आधीच्यातुमच्या निरोपाला उत्तर मिळण्यापूर्वीच नविन मेसेजेस पाठविणे टाळा. लोक व्यस्त असतात आणि नंतर तुमच्या इतक्या मेसेजला रिप्लाय करणं त्यांना अवघड वाटू शकतं किंवा ते घाबरूनही जाऊ शकतात.

संवेदनशील विषयांवर बोलण्याची जबरदस्ती करू नका.

काही लोकांना राजकारण, धर्म, पूर्वीचे नातेसंबंध, सद्य संबंध किंवा इतर अनेक संभाव्य नाजूक विषयांबद्दल बोलणे आवडते. पण सगळ्यांनाच असे आवडते असे नाही. जोपर्यंत एखाद्याला आपण चांगले ओळखत नाही तोपर्यंत बर्‍याच लोकांना या विषयांवर बोलण्यास आवडत नाही. त्यामुळे आपण एखाद्यास नीट ओळखत नसतानाही आशा विषयांत खोल जाणे टाळणे हेच शहाणपणाचे आहे. अधिक संवेदनशील विषयांची ओळख करून देणे योग्य आहे. परंतु समोरच्या व्यक्ती कशा प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष द्या. जर त्यांनी छोटी/मोघम उत्तरे दिली किंवा या विषयावर बोलायची इच्छा नाही असं उत्तर दिल्यास त्यांचा मताचा आदर करत विषय बदला.

वेळ द्या.

मैत्री विकसित होण्यासाठी ३ महिन्यांच्या कालावधीत १००पेक्षा जास्त तास लागू शकतात. एखाद्याबरोबर फक्त वेळ घालवण्याचा अर्थ असा नाही की आपण दीर्घकाळ टिकणारी मैत्री कराल. परंतु जेव्हा आपण एखाद्याबरोबर जास्त वेळ घालवाल तेव्हा आपल्या मैत्रीची शक्यता वाढते.

एखाद्याच्या त्वरित जवळ जाण्याची इच्छा आहे हे समजण्यासारखे आहे, परंतु गोष्टी नैसर्गिकरित्या विकसित होऊ देणे हे योग्य आहे. एखाद्यास मैत्री करण्यास भाग पाडण्यापेक्षा आपण ज्या व्यक्तीस जाणून घेऊ इच्छित आहात त्याच्याबरोबर केवळ वेळ घालविण्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यासाठी वरील टिप्स वापरा.

हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येकवेळी मैत्री टिकेलच असेही नाही. जसे काही लोक रोमँटिक साथीदार म्हणून योग्य नसतात तसेच काही लोक हे मैत्रीसाठी देखील योग्य नसतात. आपण मैत्रीसाठी प्रयत्न केलेही असतील परंतु तरीही मैत्री जमली नाही तर मैत्रीसाठी आमंत्रणे देणे थांबविणे आणि शाळा, कार्यालय किंवा इतर कुठेही त्या व्यक्तीस पाहिल्यास 'फॉर्मल' संवाद करणे हेच योग्य आहे. जर त्यांना आपल्याशी मैत्री करण्याची इच्छा असेल तर त्यांना आता आपल्यापर्यंत स्वतःहून येऊ द्या.

 

लेखक: सागर वाघमारे

सबस्क्राईब करा

* indicates required