रास बिहारी बोस या गोष्टीसाठी जपान मध्ये इतके प्रसिद्ध असतील हे सांगूनही पटणार नाही !!

आझाद हिंद सेना म्हटलं की आपल्याला सुभाष चंद्र बोस आठवतात. पण त्यांच्याबरोबर असणारी महत्वाची माणसं लोकांच्या तितकी परिचयाची नाहीत. या सर्व दुर्लक्षित माणसांमधले एक म्हणजे रास बिहारी बोस. इतिहासाच्या पुस्तकात आपण यांचं नाव ओझरतं वाचलेलं असतं पण दुर्दैवाने पुढे त्यांचा कुठेच उल्लेख येत नाही. मंडळी भारतात रास बिहारी बोस विस्मृतीत असताना जपानमध्ये मात्र ते चांगलेच प्रसिद्ध आहेत.  पण स्वातंत्रवीर म्हणून नव्हे, तर त्यांच्या खास ‘डिश’ मुळे.

स्रोत

१८८६ साली बंगालमध्ये रस बिहारी बोस यांचा जन्म झाला. चंदननगरमध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांना लहानपणापासून आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं, पण त्याकाळात इंग्रजांचा असा समज होता की बंगाली मुलं फौजेत सामील होण्यास लायक नाहीत.  त्यामुळे त्याचं हे स्वप्न कधी पूर्ण झालं नाही. पुढे त्यांनी देहरादूनमधल्या फॉरेस्ट रिसर्च इंस्टीट्यूट (एफआरआई) मध्ये काम केलं. सरकारी सेवेत असतानाही त्यांच मन मात्र इंग्रज सरकारच्या विरोधात होतं. शेवटी रास बिहारी बोस यांनी आपली नोकरी देश सेवेसाठी सोडली.

बंगालच्या फाळणीने मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊन रास बिहारींनी ब्रिटीश व्हाईसरॉय, लॉर्ड हार्डिंग्जच्या हत्येच्या षड्यंत्रात मोठी भूमिका बजावली. या हत्येच्या षड्यंत्रात लॉर्ड हार्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यात आला आणि तो बचावला.  गम्मत म्हणजे रास बिहारींनी क्रांतिकारी म्हणून आपली इमेज एवढी गुप्त ठेवली होती की कुणालाच माहित नव्हतं की हे षड्यंत्र कोणाच्या डोक्यातून आलंय. पुढे जाऊन जेव्हा लॉर्ड हार्डिंग्ज देहरादूनमध्ये आले, तेव्हा खुद्द रास बिहारींनी त्याचं स्वागत केलं.

स्रोत

काही काळाने त्यांचे सहकारी पकडले गेल्यानंतर मात्र रास बिहारी इंग्रजांच्या टार्गेटवर आले. जर ते पकडले गेले असते तर त्यांची फाशी निश्चित होती. म्हणून त्यांनी जपानला जाण्याचं ठरवलं. १९१५ साली म्हणजे १०२ वर्षांपूर्वी ते जपानमधल्या कोबे या बंदरावर पोहोचले आणि मग तिथून टोक्योला रवाना झाले. रास बिहारी जपानमध्ये असल्याने इंग्रजांनी जपान सरकारकडे त्यांना आपल्या हवाली करण्याची मागणी केली. याकाळात त्यांना पकडले जाण्याची शक्यता बघता स्थानिक नाकामुराया या बेकरीच्या मालकाने त्यांना मदत केली आणि काही महिने ते बेकरीच्या तळघरात लपून राहिले. 

जपानमध्ये अज्ञातवासात असताना त्यांनी बेकरीमध्ये काम करणाऱ्या महिलांना भारतीय पदार्थ शिकवले. या पदार्थात करी आणि भात हे सुद्धा होते. तिथल्या सर्व मंडळींना हे पदार्थ एवढे आवडले की काहीच दिवसात सर्वांनी मुख्य खाद्यान्नात त्याचा समाविष्ट केला आणि यात आघाडीवर होती बोस यांची ‘इंडियन करी’.

स्रोत

काही काळाने एक घटना रास बिहारींच्या पथ्यावर पडली. इंग्रजांच्या एका जहाजाने जपानच्या व्यापारी जहाजावर गोळीबार केला आणि इंग्लंड जपान संबंध बिघडू लागले. याचा परिणाम म्हणजे जपानी सरकारने रास बिहारी यांच्यावरील सर्व निर्बंध काढून टाकले. याच दरम्यान ते बेकरी मालकाच्या मुलीच्या प्रेमात पडले आणि १९१८ साली तिच्याशी लग्न देखील केलं. तोशिको सोमा असं तिचं नाव.

तोशिकोने रास बिहारींना खूप मदत केली. ते बाहेर स्वातंत्र्य लढ्यात व्यस्त असताना तिने घर सांभाळलं. हा काळ असा होता की एका परदेशी नागरिकाशी आणि त्यातही एका हद्दपार माणसाशी लग्न करणं हे जपान मध्ये भयानक मानलं जायचं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही कारण १९२५ साली तोशिकोचा निमोनियामुळे मृत्यू झाला. तिच्या जाण्याने रास बिहारींच्या आयुष्यात मोठी पोकळी आली पण त्यांनी ती दूर करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिलं.

स्रोत

पुढे त्यांनी आपल्या सासऱ्यांबरोबर मिळून बेकरीच्या वरच्या भागात एक रेस्टॉरंट उघडलं. मुख्य म्हणजे त्यांनी रेस्टॉरंटच्या मेन्यू मध्ये इंडियन करी आणि भात यांना सामील केलं होतं. जपानी लोकांमध्ये काही काळातच हि डिश एवढी फेमस झाली की संपूर्ण टोकियो मध्ये त्याच्या चर्चा झडू लागल्या. भारतीय करी तिथल्या लोकांनी डोक्यावर घेतली आणि या लहान दुकानाचं रुपांतर एका कंपनीत झालं.

रास बिहारींची ही पहिली फूड कंपनी होती जी जपानच्या स्टॉक मार्केट मध्ये जाऊन सामील झाली. ‘बोस ऑफ नाकामुराय’ हे नाव पूर्ण टोकियोत सर्वांना माहित झालं. या धामधुमीत रास बिहारी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढतच होते. शेवटी त्यांचं मुख्य लक्ष हे भारताचं स्वातंत्र्य होतं.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचा वाटा असणारे रास बिहारी बोस आज त्यांच्याच देशात विस्मृतीत गेलेले असताना जपान मात्र त्यांची एक वेगळी ओळख मनात ठेवून आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required