computer

गुंतवणूक स्पेशल : तुमचा ब्रोकर कसा निवडाल? या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या!!

छोटी छोटी गुंतवणूक करून शेअर बाजारातून भरघोस नफा कसा मिळवता येतो ते आपण या आधीच्या लेखात बघितले. अशा प्रकारे  गुंतवणूक करणे संपूर्ण जोखीम विरहित आहे असे नाही. पण त्या विषयाकडे जाण्यापूर्वी आज आपण शेअर ब्रोकरची निवड कशी करायची ते बघू या!

ब्रोकरची निवड करताना आपली गरज नेमकी काय आहे हे निश्चित करणे आवश्यक आहे.  तुम्ही ट्रेडर आहात की दीर्घ / मध्यम पल्ल्याचे गुंतवणूकदार म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहात हा विचार करा.

ट्रेडर आणि त्यांचे प्रकार-

ट्रेडरचा उद्देश कमीतकमी वेळात जास्त उलाढाल करून नफा मिळवणे असा असतो. या प्रकारात पण डे ट्रेडर /पोझिशनल ट्रेडर  / बीटीएसटी ट्रेडर अशा वेगवेगळ्या भूमिका असतात. ही सर्व वर्गवारी अधिकृतरित्या वेगळी नसते हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. डे ट्रेडर एकाच दिवशी एक किंवा अनेक शेअर विकत घेऊन किंवा विकून त्याच दिवशी विकत किंवा खरेदी करत असतो. बीटीएसटी ट्रेडर आज खरेदी करून उद्या विकत असतो. पोझिशनल ट्रेडर आज खरेदी करून आठवड्याभरात विकत असतो.

लॉंग टर्म इन्व्हेस्टर गुंतवणूकदार हा दीर्घ मुदतीसाठीअनेक छोट्या राशीतून एक पोर्टफोलिओ (संग्रह) बनवत असतो. त्याला दर तासाला दररोज वारंवार ब्रोकरची गरज नसते. या आवश्यकतेनुसार ब्रोकरची निवड करायची असते.

ब्रोकरची सर्वसाधारण वर्गवारी-

ब्रोकर्स फुल सर्व्हिस ब्रोकर आणि डिस्काउंट ब्रोकर अशा प्रकारचे असतात. फुल सर्व्हिस ब्रोकर म्हणजे जो शेअर खरेदी-विक्री सोबत गुंतवणूक कुठे आणि कशी करावी याचा सल्ला देतो. शेअर बाजारासोबत कमोडीटी मार्केट, म्युच्युअल फंड-इतर अनेक सेवा उपलब्ध करून देतो. सर्वसाधारण गुंतवणूकदारांचा पहिला पर्याय म्हणजे बँक! समजा तुमचे खाते ऍक्सीस किंवा कोटक, एचडीएफसी अशा बँकेत असेल तर ते सोयीचे असते. या बँकांच्या ब्रोकर म्हणून काम करणाऱ्या उप-कंपन्यांच्या माधमातून व्यवहार सहज होतो. ऍपच्या माध्यमातून इथे खरेदी-विक्री करता येते. संपर्कस्थळ point of contact एकच असल्याने वेळ वाचतो. दलालीचा विचार केला तर हे थोडे महाग वाटू शकते.  त्याखेरीज तुमच्या खात्यात जमा रकमेचा अंदाज असल्यामुळे अनावश्यक मार्केटिंग कॉल येत राहतात. अ‍ॅक्सीस डायर्व्क्ट- कोटक सिक्युरिटीज - आयसीआयसीआय डायरेक्ट- एसबीआय सिक्युरिटीज अशा कोणत्याही 'फुल सर्वीस ब्रोकर' कडे खाते उघडणे छोट्या गुंतवणूकदाराच्या हिताचे असते.

इथे उल्लेख केलेले  बँकेसोबत जोडलेले  ब्रोकर  हे फुल ब्रोकर सर्वीस ब्रोकर आहेत. बारीकसारीक फरक वगळता सर्व ब्रोकर सारखेच असतात.  तरीपण आपण ब्रोकर्सचा एक तुलनात्मक तक्ता आपण बघू या! 

हे ब्रोकर वगळता अनेक इतर 'कार्पोरेट ब्रोकर' म्हणून ओळखले जाणारे ब्रोकर आहेत. त्यापैकी उत्कृष्ट आणि प्रसिध्द ब्रोकरची नावे अशी आहेत. 

शेअरखान- मोतीलाल ओस्वाल- जीओजीत -आयआयएफएल : हे ब्रोकर पूर्ण सेवा देणारे ब्रोकर आहेत. त्यांच्या प्रतिनिधी शाखा अनेक शहरांमध्ये आहेत. परंतु सेवेचा दर्जा स्थानिक प्रतिनिधीवर अवलंबून असतो. या सर्व कंपन्यांचे वैशिष्ट्य असे आहे की यांचे रीसर्च डिपार्टमेंट तगडे असल्याने त्याचा फायदा छोट्या गुंतवणूकदाराला होऊ शकतो. परंतु याच एका कारणासाठी खाते उघडण्याची गरज नाही. इंटरनेटच्या जमान्यात सल्ला तसाही मिळणार असतो.

हे सर्व ब्रोकर फुल सर्व्हिस ब्रोकर असल्याने त्यांच्याकडे खाते उघडणे थोडे महाग असते. यासाठी जर खर्चात बचत करायची असेल तर 'डिस्काउंट ब्रोकर' हा बिनखर्चाचा किंवा कमी खर्चाचा पर्याय उपलब्ध आहे. डिस्काउंट ब्रोकर खरेदीविक्रीची सुविधा ऑनलाईन देत असल्याने त्यांच्याकडे पर्सेंटे़ज प्रमाणे दलाली आकारली जात नाही. त्यांची दलाली ही सौद्यांच्या संख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ  २० रुपये प्रति सौदा अशा रीतीने!  सध्या डिस्काउंट ब्रोकर मध्ये झिरोधाचे नाव अग्रेसर आहे. खाते उघडणे- सौदा करणे म्हणजे खरेदी विक्री करणे - हे सर्व फार जलद आणि कमीतकमी खर्चात होते. 

फुल सर्व्हिस आणि डिस्काउंट ब्रोकर यांच्यामध्ये फरक असा आहे की रीसर्च किंवा इतर सेवा डिस्काउंट ब्रोकर देत नाहीत. या दोन्हीखेरीज इतर अनेक छोटे ब्रोकर बाजारात आहेत. हे ब्रोकरसुध्दा त्यांच्या ग्राहकांना उत्तम सर्व्हिस देतात. त्यांचा व्याप मर्यादित ठेवून ते सेवा अधिकाधिक चांगली देतात. तुलनाच करायची झाली तर हे ब्रोकर तुमच्या आमच्या 'फॅमिली डॉक्टर' सारखे असतात. छोट्या गुंतवणूकदारांनी या वर्गवारीतल्या ब्रोकरकडेही खाते उघडायला हरकत नाही. 

तर मंडळी, आधी कोणत्याही छोट्या गुंतवणूकदाराने डे ट्रेडींग पासून सुरुवात करू नये. दीर्घ किंवा मध्यम मुदतीची गुंतवणूक करावी. संपर्क सहज होईल असा ब्रोकर निवडावा. दिवसभर फोन करून टेलिकॉलरमार्फत सौदे करण्याचा आग्रह करणारे ब्रोकर टाळावेत. तुमच्या डीमॅट खात्याची वेळोवेळी माहीती देणारा, विक्रीनंतर लगेच खात्यात पैसे जमा करणारा ब्रोकर निवडावा.

आता शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा तोडगा जो फक्त बोभाटाच तुम्हाला सांगू शकेल तो असा आहे. प्रत्येक ब्रोकरला तीन प्रकारच्या ऑडीटला सामोरे जावे लागते . 
ही ऑडिट अनेक वेगवेगळ्या संस्था करत असतात. त्यांची यादी अशी आहे.

१- एनएसी किंवा बीएसइ म्हणजे एक्स्चेंजचे ऑडिट.
२ सेबीचे ऑडिट -सेबी शेअरबाजार नियंत्रीत करते 
३ कस्टोडीअन ऑडिट- सीडीएसएल किंवा एनएसडीएल म्हणजे डीमॅट खाते सांभाळाणार्‍या संस्था.

या तीन ऑडीटच्या मार्गाने ज्या ब्रोकरबद्दल कमीतकमी 'त्रुटी आणि तफावती' दर्शवल्या जात असतील तो ब्रोकर सगळ्यात 'सेफ ब्रोकर' असे समजण्यास हरकत नाही.

ब्रोकर आणि कस्टमर या व्यवस्थेचे संक्षिप्त स्वरूप आम्ही येथे समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूक कशी करावी हा विषय नंतर आपण बघणार आहोतच.

तुमच्या प्रश्नांचे स्वागत आहे!

 

आणखी वाचा :

गुंतवणूक स्पेशल - असे टाका शेअर बाजारात पहिलं पाऊल!

सबस्क्राईब करा

* indicates required