पावसाळ्यातल्या वीजांपासून संरक्षण करण्याचे साधेसोपे उपाय!!
पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. तशी शेतकऱ्यांसोबत इतरांचीसुद्धा लगबग सुरू झाली आहे. पावसाळा म्हटला म्हणजे वीजा कडाडणे आलेच!! या वीजांभोवती अनेक अफवा पण तयार झाल्या आहेत. त्यामुळे झाले असे की नेमक्या खऱ्या गोष्टी लोकांना माहीत नाहीत. दरवर्षी वीज पडून कितीतरी लोकांना आपला जीव गमवावा लागतो. म्हणून आज आम्ही वीजांपासून बचावासाठी काय उपाय योजले पाहिजे ते सांगत आहोत.
गावाकडे विजा कडाडायला सुरुवात झाली की लोखंडी पहार अंगणात आणून टाकतात. म्हणजे वीज पडली तरी ती लोखंडावर पडेल आणि घर सुरक्षित राहील. शहरांत आणि उंच बिल्डिंगवर लाईटनिंग रॉड किंवा लाईटनिंग कंडक्टर्स बसवले जातात. यांचं दुसरं टोक जमिनीत गेलेलं असतं. याचाही उपयोग पडलेली वीज आकर्षित करुन भोवताल सुरक्षित ठवण्यासाठीच असतो. पण याव्यतिरिक्त आपण वीजांपासून वाचण्यासाठी काय करु शकतो?
वीज पडण्याआधी वीजा कडाडायला सुरुवात होते. आपल्याला कळून चुकते की आता वीज पडण्याची शक्यता आहे. नेमकी हीच वेळ असते सावध होण्याची. अशावेळी बाहेर फिरणे धोकादायक ठरू शकते. म्हणून शक्य तितक्या लवकर आसरा शोधायला हवा. तो आसराही चांगला आहे याची खात्री करून घ्यायला हवी. एखाद्या टपरीखाली थांबण्याला आसरा शोधला असं म्हणता येणार नाही.
वीजा कडाडत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करायला हवीत. दरवाजा-खिडक्या बंद करा व त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखा. बऱ्याच वेळा झाडाखाली उभ्या असलेल्या शेतकऱ्यांवर वीज पडल्याची उदाहरणं पाहण्यात आहेत.
वीज कडाडत असताना झाडाखाली उभं राहू नये. याखेरीज जर घरातला टीव्ही अँटेनावर चालत असेल, तो बंद ठेवणंच योग्य आहे.
अनेकदा होते काय, एकापेक्षा जास्त लोक असले की वीजा कडाडत असताना ते भीतीने जवळजवळ उभे राहतात किंवा एकमेकांचा हात हातात धरून उभे राहतात. तर हे धोकादायक आहे. उलट अशावेळी अंतर राखायला हवे. छत्री किंवा रॉड जर जवळ असेल तर त्यांना दूर फेकून द्या कारण त्यांच्यावर वीज पडण्याची शक्यता जास्त असते.
मोबाईलच्या टॉवरपासून अशा परिस्थितीत दूरच रहायला हवे. टॉवरभोवती असणे जीवघेणे ठरू शकते. कानाचा त्रास असलेल्यांनी वीज कडाडत असतील तर कानावर रुमाल बांधून घ्यावा. जेणेकरून वीजेच्या आवाजाने कानांना नुकसान होणार नाही.
वीज कशी तयार होते?
आकाशात ढगांच्या टक्करीदरम्यान घर्षण होते आणि त्यातून इलेक्ट्रोस्टॅटिक चार्ज तयार होतो. हा चार्ज आकाशाकडून जमिनीकडे वेगात येतो. या दरम्यान आपल्याला जोराचा आवाज ऐकू येतो व वीजेचा लखलखता प्रकाश दिसतो. याच पूर्ण प्रक्रियेला वीज पडणे असे म्हणतात.
पायाळू माणसाला विजेचा धोका अधिक असतो असा एक समज आहे. शंकर पाटलांची वळीव कथा आठवत असेलच. पण तसं काही नाही, अनेक समजुतींपैकी हाही एक समजच आहे म्हणा आणि सोडून द्या.
जाताजाता एक गंमतीची गोष्ट. आपलं मुंबईतलं व्हिक्टोरिया म्हणजेच सध्याचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस १८५३मध्ये म्हणजे साधारण १७० वर्षांपूर्वी बांधण्यात आलं. त्यावर एक पुतळा होता. हा पुतळा वीज पडल्याने पडला. आता तिथे जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला एक पुतळा आहे. हा पुतळा जुन्या वास्तुकलेसोबत मेळ खातोय पण गंमत म्हणजे हा पुतळा लाईटनिंग ॲऱेस्टर म्हणजे वीज आकर्षित करुन घेऊन टर्मिनसची इमारत वाचवण्यासाठी बसवला आहे.
तर मंडळी,काही गोष्टींवर मानवाचा अजून पुरेपूर ताबा नाहीय. पावसाळ्यातल्या वीजा ही त्यातलीच एक गोष्ट आहे. तेव्हा अप्रिय घटना टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण थोडी सावधगिरी बाळगायलाच हवी. नाही का?