computer

सोशल मिडिया नसलेल्या काळात एका कांद्याने वाचवला होता महिलेचा जीव ?? वाचा हा अज्ञात किस्सा !!

आज पोलिस असो किंवा परराष्ट्र मंत्रालय एका ट्विटने तुमच्या पर्यंत मदत पोहोचते. रेल्वे प्रशासनही आता याच वेगाने काम करत आहे. आपल्याला फक्त ट्विट मधून आपली समस्या मांडून त्या त्या विभागाला tag करावं लागतं. एवढं केलं की मदत आली म्हणूनच समजा.  

मंडळी, हे झालं आजच्या सोशल मिडीयाच्या काळातलं, पण ज्या काळी सोशल मिडियाच काय साधा फोनपण नसायचा त्याकाळी इमर्जन्सीच्या वेळी मदत कशी मिळत असेल ? याचा एक अंदाज येण्यासाठी आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत. 

या गोष्टीतील पात्र फार मजेशीर आहेत. शंतनू दासगुप्ता नावाचे इस्रो शास्त्रज्ञ, त्यांची वृद्ध आई, रेल्वे व्यवस्थापक, टीटी, लाईनमन, वर्तमानपत्र आणि एक कांदा. हो कांदा !!! 

 

गोष्ट सुरु होते मी १९९३ साली. शंतनू त्यांच्या ७८ वर्षीय आई सोबत त्रिवेंद्रम ते नागपूर रेल्वे प्रवास करत होते. प्रवासाच्या सुरुवातीला सगळं काही ठिकठाक होतं, पण रेल्वेने आंध्रप्रदेश मध्ये प्रवेश केल्यानंतर शंतनू यांच्या आईंना अस्वस्थ वाटू लागलं. परिस्थिती बिघडल्यानंतर शंतनू यांनी TTE आणि रेल्वेतील व्यवस्थापकांना मदतीला बोलावलं.

TTE आणि व्यवस्थापकांनी त्यांना पूर्ण मदत देऊ केली. पण शेवटी त्यांच्याकडे पुढचं स्टेशन येई पर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. संपर्काचं साधन नसल्याने मदतही मागवता येत नव्हती. 

याखेरीज आणखी एक समस्या होतीच. पुढच्या स्टेशन पर्यंत पोहोचल्यावरही मदत यायला वेळ लागू शकत होता. या गोष्टीने रेल्वे व्यवस्थापकांना विचारात पाडलं. इथेच खरी अक्कल हुशारी कामी आली. व्यवस्थापक हे स्वतः वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले होते. त्यांनी लगेचच एक वर्तमानपत्र घेतलं, त्याच्या एका पानावर रुग्णाचं वय, रोगाची लक्षणं, रुग्णाची मेडिकल हिस्ट्री आणि सोबतच बोगी नंबर आणि आसन क्रमांक अशी माहिती एकत्र लिहून काढली. यानंतर ते रेल्वेच्या स्वयंपाक घरात गेले, तिथून त्यांनी एक कांदा घेतला. या कांद्यावर लिहिलेला कागद गुंडाळला.
 

मग व्यवस्थापकांनी पुढचं रेल्वे क्रॉसिंग यायची वाट बघितली. क्रॉसिंग आल्यानंतर त्यांनी लाईनमन ला हाक मारून कांदा त्याच्या दिशेने फेकला.

लाईनमनने कागदावर लिहिलेली माहिती वाचली आणि तो फोनकडे धावला. त्याने पुढच्या स्टेशन व्यवस्थापकांना ही माहिती सांगितली.

मंडळी, हे सगळं घडत असताना शंतनू यांच्या वृद्ध आईंना उलट्यांचा त्रास सुरु झाला होता. शंतनू स्वतः गोंधळलेले होते. व्यवस्थापकांनी केलेल्या या त्यांना कामाचा अर्थच लागत नव्हता.  

पण गाडी जशी पुढच्या स्टेशनवर म्हणजे विजयवाडा स्टेशनवर पोहोचली तेव्हा सगळा खुलासा झाला. गाडी पोहोचण्यापूर्वीच सगळी वैद्यकीय मदत हजार होती. तातडीने आईंना हॉस्पिटल मध्ये हालवण्यात आलं. लवकरच त्या बऱ्या झाल्या. शंतनू यांनी या कामगिरीसाठी रेल्वे विभागाचं भरभरून कौतुक केलं.

तर मंडळी, कसा वाटला हा किस्सा ? रेल्वे प्रशासनाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण एवढं असूनही या घटनेला प्रसिद्धी मिळाली नाही हे दुर्दैवच.

 

माहिती स्रोत

सबस्क्राईब करा

* indicates required