गेल्या २०० वर्षांत माणसाने अंटार्क्टिका, तिथले सील, व्हेल यांचा आणि परिणामी पर्यावरणाचा ऱ्हास कसा केला याच्या काही नोंदी..
आपल्याकडे जागतिक पर्यावरण दिन आला की मोठ्या प्रमाणात पर्यावरणवाद्यांचे किंवा निसर्गमित्रांचे लेख छापले जातात किंवा बातम्यांमध्ये दाखवले जातात. माणूस कसा निसर्गाचा ऱ्हास करतोय हे वाचून त्यादिवशी आपण वाचून हळहळ व्यक्त करतो आणि नंतर विसरून जातो. मनुष्य प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा? तर स्वतःचा स्वार्थ पाहण्याची व फायदा करून घेण्याची त्याच्याकडे असलेली उपजत बुद्धीमत्ता.
आता हेच बघा, अंटार्क्टिक महाद्वीप शोधून काढायची बुद्धी ही माणसाचीच आणि नंतर त्या सुंदर महाद्वीपाचा ऱ्हास करण्याची बुद्धी ही त्याचीच. २०० वर्षांपूर्वी, १७ नोव्हेंबर १८२० रोजी कनेक्टिकट जहाजाचा कॅप्टन नथॅनियल पामरने अंटार्क्टिक महाद्वीप शोधून काढला. त्यानंतरच्या दोन दशकांत तिथे अनेक प्रकारे प्रगती झाली. व्यावसायिक,शास्त्रीय संशोधन झाले. तिथल्या नैसर्गिक स्रोताचे संवर्धन न करता त्यांना वापरून आर्थिक फायदा कसा होईल यासाठी अनेक देशांत चढाओढ सुरू झाली. त्यासाठी प्रगत देश आपापला हक्क सांगू लागले. आजच्या लेखात आपण मानवाने पर्यावरणाचा कसा ऱ्हास केला याबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
आज आंतरराष्ट्रीय अंटार्क्टिक तह प्रणालीद्वारे या भागावर राज्य केले जाते. हा करार सर्व “मानवजातीच्या” हितासाठी आहे असा दावा केला जातो. अंटार्क्टिक कराराअंतर्गत सध्या खाणीवर बंदी आहे आणि सीलिंग आणि व्हेलिंगचे दिवस संपले आहेत, तरीही अंटार्क्टिकाच्या सागरी सजीव स्त्रोतांचा आजपर्यंत उपयोग होत आहे.
जगात बऱ्याच ठिकाणी १८ व्या आणि १९ व्या शतकात सीलची फर कपड्यांसाठी वापरली जात होती. १९ व्या शतकात ही फर किंवा लोकर चीन आणि युरोपमधल्या व्यापाराचा एक महत्त्वाचा भाग होता. बहुतेक अमेरिका आणि ब्रिटनमधून होणाऱ्या व्यापाराखातर अंटार्क्टिकच्या किनारपट्टीवर फरसाठी सील ठार मारले गेले. सीलची फर खूप टिकाऊ तर होतीच आणि गुणवत्ताही उत्तम होती. आर्थिक दृष्ट्या हे प्रकरण खूप फायदेशीर होते. त्यामुळे १८३३ पूर्वी अंटार्क्टिक आणि उप-अंटार्क्टिकमध्ये कमीतकमी ७०,००,००० फर असलेले सील ठार झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात तिथला नैसर्गिक स्रोत मारला जातोय याची गणती ही कोणी केली नव्हती. एक ब्रिटिश निसर्गवादी जेम्स एट्स यांनी अंटार्क्टिक द्वीपकल्पात फर सील गमावल्याबद्दल दु: ख व्यक्त केले. पण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले.
१८२९च्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या ब्लबरसाठी हत्तींच्या देखील मोठ्या प्रमाणात शिकारी करण्यात आल्या. या ब्लबरचे तेलामध्ये रूपांतर केले जाऊ शकते. हत्तींना समुद्रकिनाऱ्यांकडे ओढून नेणे, हृदयावर दोरखंड बांधणे, किंवा नंतर कवटीवर गोळी घालणे, त्यांचे रक्त काढून टाकणे आणि त्यांचे ब्लबर काढणे अशी भयंकर पद्धत अवलंबली जात असे.
अशा प्रकारे १९व्या शतकाच्या सुरवातील इतक्या मोठ्या प्रमाणात प्राणी मारले जाऊ लागले की एका सीलरने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही समुद्राकाठी पडलेल्या कच्च्या आणि मांसासारख्या मृत वस्तू तिथे तश्याच सोडल्या. पक्षांनी काही दिवसांतच मांस खाऊन फक्त सांगाडा ठेवला. तिथे सांगाड्याचा ढीग साठला होता."
(सीलची फर)
सील फर प्रमाणेच व्हेलिंग म्हणजे व्हेल्सची शिकारही ही खूप मोठया प्रमाणात केली गेली. या शिकारींमध्ये इतका आर्थिक फायदा होत होता की अनेक देशांतल्या कंपन्या यात उतरत होत्या. सर्वात प्रथम नॉर्वेजियन आणि ब्रिटिश कंपन्या या व्यवहारात आल्या, नंतर जर्मनी, रशिया, नेदरलँड्स आणि जपानमधील इतर लोक सामील झाले. १९ व्या शतकात व्हेलिंग दक्षिण महासागरात घडले होते. १९व्या शतकात व्हेलचे तेल प्रामुख्याने दिवा इंधनासाठी वापरले जात असे. परंतु १९१० नंतर तेलासाठी औद्योगिक वंगण व खाद्य चरबी यांसारखे या तेलाचे आणखी नवीन उपयोग आढळले.
युनिलिव्हरसारख्या कंपन्यांना व्हेलिंग अत्यंत फायदेशीर ठले. या कंपन्या व्हेलच्या तेलाने तयार केलेल्या मार्गरीन बनवत असत. आजही रशियासारख्या देशात व्हेलिंग केली जाते, पण आता अनेक कडक नियम पाळले जातात.
१९२५मध्ये व्हेलिंग इतक्या प्रमाणात केली जायची की तिथे जाऊन आलेल्या एका प्रत्यक्षदर्शी निरीक्षकाने सांगितले की तिथले पाणी पूर्णपणे रक्ताच्या थारोळ्याप्रमाणे लालेलाल झाले होते आणि शिकारीमुळे तिथे दुर्गंध ही येत होता. " ज्या नितळ पाण्यात व्हेल मासे पोहतात, त्यांचे प्रजनन होते ते पाणी अशा प्रकारे गढूळले असेल, तर काय घडले असेल याची कल्पना करणंच पुष्कळ आहे."
१९४६मध्ये व्हेलच्या संरक्षणासाठी काही आंतरराष्ट्रीय प्रयत्न केले गेले. त्यावर्षी तयार करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्हेलिंग कमिशनचे उद्दीष्ट व्हेल साठ्यांच्या योग्य संवर्धनाची तरतूद करणे आणि अशा प्रकारे व्हेलिंग उद्योगाचा सुव्यवस्थित विकास करणे शक्य करणे हे होते.
(व्हेलचे तेल)
पण, १९६०च्या दशकात व्हेलबद्दलच्या लोकांचा दृष्टीकोन बदलू लागला. पर्यावरणवाद्यांनी तोवर संशोधन केले होते की व्हेल हे अत्यंत बुद्धिमान आणि मिळूनमिसळून राहणारे प्राणी आहेत. ते समुद्राच्या खोल पाण्यात गातात. १९६० च्या अंतापर्यंत बऱ्याच राष्ट्रांनी अंटार्क्टिकमध्ये व्हेलची शिकार करणे थांबविले. तसेच व्हेल उत्पादनांना स्वस्त पर्याय असल्यामुळेही ते अधिक सोपेही झाले.
या सगळ्याचा उपयोग सील यांची शिकार कमी होण्यातही झाला. काही देशांनी व्हेल व सीलच्या शिकारींवर अंटार्क्टिकामध्ये पूर्ण बंदी आणली. विकसित झालेल्या सांस्कृतिक भावनांचे मिश्रण आणि प्लास्टिक सारख्या इतर साहित्यांची बदलती उपलब्धता यामुळे सीलिंग ही फार वेगाने घटली.
१९७०च्या दशकात क्रिल आणि टूथफिशला मासे हे दोन मासेही शिकार करण्यासाठी मिळू लागले. त्यांचा उपयोग प्राण्यांसाठी खाद्य (Animal feed) म्हणून केला जाऊ लागला. क्रिटासियन नावाच्या लहान कोळंबीसारखे, क्रिल, पौष्टिक पूरक मासे देखील पाळीव प्राण्यांच्या खाद्यासाठी वापरले गेले. नॉर्वे, चीन, दक्षिण कोरिया आणि चिली हे देश मोठ्या प्रमाणावर यांची शिकार करत. चिली सी बास म्हणून विकली जाणारी टूथफिश जगभरातील मेनूवर आहे.
परंतु १९८२पासून एक सकारात्मक बदल घडून आला. अंटार्क्टिक मरीन लिव्हिंग रिसोर्सेस संवर्धन आयोगाने संपूर्ण परिसंस्था टिकवून ठेवण्याच्या महत्त्वाच्या उद्दीष्टाने या मत्स्यव्यवसायांचे व्यवस्थापन केले आहे. त्यातून नवीन शोध लागला आणि असे दिसून आले की व्हेल, सील, पक्षी आणि इतर मासे क्रिलवर अवलंबून असतात, त्यामुळे ते अंटार्क्टिक सागरी पर्यावरणात आवश्यक आहेत . त्या अनुषंगाने त्यांचेही संवर्धन करणे महत्वाचे आहे.
(क्रिल मासा)
अंटार्क्टिकमध्ये सध्या क्रिल आणि टूथफिश दोन्ही भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. पण समुद्रातला बर्फ कमी झाल्याने भक्ष आणि भक्षक ही जैव साखळी तुटली आहे, परिणामी स्थलांतराचे प्रमाण वाढते आहे. साहजिकच या भौगोलीक भागात असणार्या प्राण्यांच्या संख्येवर परिणाम झाला आहे. सोबत हवामानातील घडणार्या बदलाचाही परिणाम होतो आहे. ऐतिहासिकदृष्ट्या आणि सध्याच्याही अंटार्क्टिकाच्या जगण्याच्या स्रोतांकडून केवळ थोड्या लोकांनी जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. जरी आता टिकाऊ शिकार करणे शक्य झाले आहे, तरीही हवामानातील बदल अंटार्क्टिकच्या पर्यावरणाच्या स्थिरतेत वेगाने बदल घडवून आणत आहेत.
(टूथफिश मासा)
कितीही नवीन नियम केले, करार केले गेले, जागरूकता ही होत आहे तरीही अंटार्क्टिकाच्या समृद्ध सागरी जीवनाचे आजही शोषण होत आहे. इतक्या सुंदर महाद्वीपामध्ये बर्फाचे वेगाने घटणारे प्रमाण ही चिंतेचा विषय झाला आहे. तिथले प्राणी, पक्षी, मासे यांवरही हवामान बदलाचा परिणाम होत आहे. आता वेळ आहे तो वाचवण्याची. तिथल्या सजीव स्रोतांपासून बनणाऱ्या उत्पादनांना न वापरण्याची. बहुतेक हकांना त्यांची उत्पादनांची नावे माहित नसतात किंवा ते उत्पादन कशापासून निर्माण केले आहे याची माहिती नसते.
म्हणून प्रमुख पर्यावरणीय मोहिमेद्वारे अंटार्क्टिकाच्या जीवांविषयी जागरूकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता गरज आहे डोळे उघडे ठेऊन सजगतेने या परिस्थितीकडे बघण्याची आणि हा नैसर्गिक ऱ्हास कसा थांबवता येईल याची जागरूकता निर्माण होण्याची. व्हेल आणि सीलची लोकसंख्या आता बऱ्यापैकी मर्यादित आहे, ती शून्यावर जाईल अशी परिस्थिती न निर्माण करता ती कशी वाढेल हेच महत्वाचे असणार आहे.. तरच पुढच्या पिढ्यांना आपण हा नैर्सगिक वारसा आनंदाने पोहोचवू शकतो..
लेखिका: शीतल अजय दरंदळे