शॉर्टफॉर्म ते अमेरिकेच्या निवडणूकीपर्यंत OK च्या जन्मप्रवासाची गोष्ट माहित आहे?
इंग्रजी येत नसलं तरी ओके आणि सॉरी हे दोन शब्द तरी नक्कीच सगळ्यांना माहित असतात. हे दोन्ही शब्द आता आपल्या रोजच्या वापरात इतके आले आहेत की ते आपल्या भाषेतले शब्द नाहीत असंही वाटत नाही. तुम्हांला आठवत असेल तर Ok Jaanu नावाचा सिनेमाही काही वर्षांपूर्वी येऊन गेला होता. आजच्या काळात हा शब्द आपण सहज वापरतो पण तो मागच्या फक्त २०० वर्षांत तयार झाला आहे यावर तुमचा विश्वास बसेल का? म्हणजे इंग्रजी डिक्शनरीसाठी हा शब्द तसा नवीनच. मग कुठून आला हा शब्द, त्याचा जन्म कसा झाला आणि तो प्रत्येकाच्या तोंडी कसा आला? चला तर जाणून घेऊया.
मोठ्या शब्दांचं लघुरुप करण्याच हा ट्रेंड निदान २०० वर्षं जुना आहे. १८०० च्या काळात असं एक फॅडच जन्मलं होतं. अगदी अचूक सांगायचं झालं तर १८३० सालात अमेरिकेतल्या बॉस्टन येथील उच्चपदस्थ तरुणांनी याची सुरुवात केली. सांकेतिक भाषेत बोलावं तसे लोक रोजच्या संभाषणात पण संक्षिप्त शब्द वापरू लागले. म्हणजे समजा “oll (all) wright,” म्हणायचं असेल तर “OW” म्हटलं जायचं. अगदी आजच्या सारखा प्रकार होता. होताहोता यातली काही लघुरुपं मागे पडली आणि काही मात्र टिकून राह्यली.
या टिकून राहिलेल्यांमध्ये एक शब्द चांगलाच टिकून राहिला आणि त्याचा प्रसार जगभर झाला. हा शब्द म्हणजे OK. ‘Oll Korrect’ या दोन शब्दाचं हे संक्षिप्त रूप. Oll Korrect म्हणजे आजचं All Correct. जुन्या इंग्रजीत हे वाक्य Oll Korrect असं लिहिलं जायचं.
'ओके'चा प्रसार कसा झाला ?
१८०० च्या दशकात अमेरिकेत ‘सगळं सुरळीत आहे’ किंवा ‘सर्व ठीक आहे’ या अर्थाने Oll Korrect हा शब्द मोठ्याप्रमाणात वापरला जात होता. मोठ्या शब्दांना संक्षिप्त करण्याच्या लाटेत लोकांनी Oll Korrect ला पण छोटं रूप दिलं. इतर संक्षिप्त शब्दांच्या मानाने मात्र O.K तेजीत पसरला. बॉस्टनच्या ‘बॉस्टन मॉर्निंग या प्रमुख वृत्तपत्राने’ आपल्या २३ मार्च १८३९ सालच्या पुरवणीत हा शब्द आपल्या एका लेखात वापरला होता. असं म्हणतात तिथून O.K चा अधिकृतपणे मुख्यप्रवाहात प्रवेश झाला. लवकरच बॉस्टन मॉर्निंगचं अनुकरण करत इतर वृत्तपत्रांनी हा शब्द वापरायला सुरुवात केली. तिथून पुढे Oll Korrect जाऊन O.K. हे संक्षिप्त रूप रुळलं.
पण O.K च्या प्रसाराचा इतिहास एवढाच मर्यादित नाही. O.K शब्दांच्या मध्ये जो पूर्णविराम आहे तो जाऊन OK हा स्वतंत्र शब्द म्हणून स्थापित व्हायला अजून बराच काळ होता. O.K ची प्रसिद्धी बघून अमेरिकेचे आठवे राष्ट्रपती मार्टिन वॅन बुरेन यांनी आपल्या प्रसारातील मुख्य आकर्षण म्हणून O.K शब्द वापरला. मार्टिन वॅन बुरेन हे अमेरिकेच्या किंडरहुक भागातले होते. त्यांच्यासाठी O.K चा अर्थ होता Old Kinderhook. एका अर्थी मार्टिन वॅन बुरेन आहेत म्हणजे सगळं काही सुरळीत आहे. कल्पना तर चांगली होती पण ती मार्टिन वॅन बुरेन यांच्याच अंगाशी आली. विरोधकांनी या शब्दाला धरूनच त्यांचं हसं केलं. परिणामी मार्टिन वॅन बुरेन हरले आणि त्यांना राष्ट्रपतीपदाची दुसरी टर्म मिळाली नाही. मात्र या धामधुमीच्या काळात O.K चांगलाच पसरला.
O.Kच्या प्रसारातील दुसरा टप्पा आला टेलिग्राफ मशिनच्या निर्मिती नंतर. पुढे वाचण्यापूर्वी टेलिग्राफचा फोटो पाहून घ्या.
टेलिग्राफ मशिनच्या माध्यमातून लहानसहान मेसेज पाठवता यायचे. हे करण्यासाठी symbolic codes वापरले जायचे. यासाठी मशीनवरचं बटन एका विशिष्ट पद्धतीने दबावं लागायचं. उदाहरणार्थ, एक डॉट आणि एक डॅश म्हणजे A अक्षर, एक डॅश आणि ३ डॉट्स म्हणजे B.
तर, आता आपल्या विषयाकडे वळूया. टेलिग्राफ मशीन आल्यावर OK प्रसिद्ध झाला कारण हा दोन अक्षरी शब्द टाईप करण्यास सहज सोपा होता आणि इतर शब्दांसोबत जो गोंधळ व्हायचा तोही होत नव्हता. टेलिग्राफवर OK टाईप करण्यासाठी दोन डॉट आणि डॅश डॉट डॅश अशा रीतीने बटन दाबण्यात यायचं.
OK च्या प्रसिद्धीचं सर्वात चांगलं उदाहरण अमेरिकेत १८६५ साली छापलेल्या टेलिग्राफच्या नियम पुस्तिकेत सापडतं. या पुस्तकात दिलेला एक नियम पहा: “ज्या ऑफिसला संदेश पाठवला आहे त्या बाजूने OK आल्याखेरीज तो संदेश प्रसारित झाल्याचं गृहीत धरू नये.”
काही अभ्यासकांच्या मते OK चा लोकांच्या रोजच्या भाषेत सहज शिरकाव झाला, त्यामागे OK मधलं K अक्षर जबाबदार असण्याची शक्यता आहे. ८०-९० च्या दशकात पाश्चात्य देशांमध्ये जाहिरातीत K अक्षराला प्रचंड प्रसिद्ध होती. याचं कारण असं की K ने लक्ष वेधलं जातं, इंग्रजीत K ने सुरु होणारे शब्द कमी आहेत इत्यादी. कारण काही असो पण लोकांना आकर्षित करण्यासाठी बऱ्याच उद्योजकांनी आपल्या व्यवसायाचं नाव ठरवताना त्यात K असेल याची मुद्दाम खबरदारी घेतली. जर शब्द C पासून सुरु होणारा असेल तरी C च्या जागी K लिहिलं जायचं. आपल्याकडेही नावात K असल्यास सिनेमे चालतात या श्रद्धेपोटी सिनेमांची नावे K वरून ठेवलेली आहेत.
हा सगळा OK चा इतिहास इंटरनेट नसलेल्या काळात हरवला होता. काही वृत्तपत्रांनी त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी चुकीची माहिती शोधून काढली. जसे की काहींच्या मते अमेरिकेतील मूळ रहिवासी असलेल्या Choctaw जमातीच्या Okeh शब्दावरून Ok जन्मला. Okeh चा अर्थ होतो ‘म्हणून हे असे आहे’.
तर वाचकहो, आज हा सगळा इतिहास उपलब्ध आहे. OK च्या निमित्ताने एका पद्धतीने भाषेचाच अभ्यास होऊ शकतो.
तुम्हाला हा लेख कसा वाटला? आम्हाला नक्की कळवा!!