वाचा १५ ऑगस्ट, १९४७ ची जगभरातल्या वर्तमानपत्रांची पहिली पानं !!
दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा कधीही न मावळणारा सूर्य आता पश्चिमेकडे झुकला होता. भारताचं स्वातंत्र्य आता दूर नव्हतं. संपूर्ण जगाचं लक्ष या महत्वपूर्ण घटनेकडे लागलं होतं. अखेर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याच्या बदल्यात देशाचे तुकडे झाले. फाळणीमुळे घडलेल्या दंगली आणि अत्याचाराने या आनंदाला गालबोट लागलं.
भारताच्या इतिहासासोबत जागतिक इतिहासाच्या पातळीवर या अत्यंत महत्वपूर्ण घटना होत्या. जगाने या घटनांकडे कशा पद्धतीने बघितलं हे बघणं आजच्या दिवशी महत्वाचं ठरेल.
चला तर आज पाहूयात जगातील प्रमुख वृत्तपत्रांनी भारताच्या स्वातंत्र्याचं कोणत्या शब्दात वर्णन केलं...
१. दि न्युयॉर्क टाईम्स
भारतीय उपखंडात दोन देशांची निर्मिती झाल्याचा आनंद आणि फाळणीचे दुःख दोन्हींना महत्व देणारी बातमी न्यूयॉर्क टाईम्सने पहिल्या पानावर छापली होती. सोबत भारतीय उपखंडाचा एक मोठा नकाशा पण छापण्यात आला होता. त्याचवेळी ज्या भारतातील संस्थानिकांनी त्यांचे भारतातील स्थान काय असेल याचा विचार केला नव्हता, त्या दोन काश्मीर आणि हैद्राबाद संस्थानांना पांढऱ्या रंगात रंगवण्यात आले होते.
२. दि वॉशिंग्टन पोस्ट
स्वातंत्र्याचा जल्लोष, आनंदाचे वर्णन करणारी मोठी बातमी वॉशिंग्टन पोस्टने छापली होतीच, सोबत जवाहरलाल नेहरू यांच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणाचाही त्यात उल्लेख होता. “दोन स्वतंत्र देशांचा पहिला अध्याय पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. पण त्याला रक्तपात, मृत्यू आणि दहशतीचे गालबोट लागले.” असाही उल्लेख वॉशिंग्टन पोस्टच्या लेखात होता.
३. दि शिकागो ट्रिब्युन
या वर्तमानपत्राने लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गवर्नर जनरल असण्याच्या बातमीला जास्त महत्व दिलं होतं. फाळणीनंतर उफाळलेल्या रक्तपाताचा उल्लेख करताना शिकागो ट्रिब्युनने भारताचा उल्लेख हिंदू इंडिया असा केला होता तर पाकिस्तानचा उल्लेख मुस्लीम पाकिस्तान असा केला होता.
४. दि आयरिश टाईम्स
आयर्लंड हे ब्रिटिश अधिपत्यापासून स्वातंत्र्य मिळालेल्या पहिल्या काही राष्ट्रांपैकी एक होते. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या बातमीवर त्यांनी विशेष महत्व दिलं होतं. त्यांची हेडलाईन होती “India celebrates as Britain hands over control.”
५. दि डेली टेलिग्राफ
दि डेली टेलिग्राफ या ब्रिटिश वर्तमानपत्राने लखनौच्या संस्थानाच्या कार्यालयावरचा युनियन जॅक दाखवत असे म्हटले की १८५७ ला उभारण्यात आलेला युनियन जॅक आज पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेस खाली उतरवण्यात आला.
मंडळी, हे तर झालं जागतिक वृत्तपत्रांचं. आता पाहूयात प्रादेशिक वृत्तपत्रांनी या दिवसाचं वर्णन कसं केलं होतं.
१. सकाळ (मराठी)
सकाळ वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 'अपूर्व रक्तहीन क्रांती' या शब्दात स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६१५ कैद्यांना येरवडा मधून बंधमुक्त करण्यात आलं होतं, ती बातमीसुद्धा इथं दिली गेली होती.
२. हिंदुस्तान (हिंदी)
हिंदुस्तान वृत्तपत्राने त्यांच्या पहिल्या पानावर म्हटलं होतं - 'शतकांच्या गुलामगिरीनंतर भारतात स्वातंत्र्याची पहाट उजाडली आहे.' खाली कोपऱ्यात नेहरूंचे उद्गार देखिल छापले होते - "जबतक जनता की आँखों में एक भी आंसू की बूंद होगी, हमारा कम पूरा नहीं होगा."
३. गुजरात समाचार (गुजराती)
गुजरात समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ‘शतकाच्या दास्यत्वानंतर मिळालेले स्वातंत्र्य’ हे वाक्य छापण्यात आलं होतं.
४. हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी)
'ब्रिटिश राजवटीचा अंत' या शब्दात हिंदुस्तान टाईम्सने या दिवसाची बातमी दिली होती. सोबतच नेहरू आणि राजेंद्रप्रसाद यांचा फोटो पहिल्या पानावर झळकला होता.
५. दि इंडिया टाईम्स
टाईम्स ऑफ इंडियानं या दिवसाला 'भारताच्या स्वातंत्र्याचा जन्म' असं म्हटलं आहे. आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे मुंबईमध्ये (त्यावेळचा बॉम्बे) जल्लोषाचं वातावरण असल्याची बातमी आपण पाहू शकतो. सोबतच लॉर्ड माउंटबॅटन यांच्या कराची भेटीचा वृत्तांतसुद्धा दिला आहे.
मंडळी, या वृत्तपत्रातल्या बातम्या म्हणजे भारतीय इतिहासाचा दस्तऐवजच म्हणता येईल. बोभाटातर्फे सर्व वाचकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आणखी वाचा :