दत्त दिगंबर दैवत माझे आणि अशी अनेक दत्तगीते अजरामर करणारे आर. एन. पराडकर होते तरी कोण?
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/paradkar.jpg?itok=YsXeUt6J)
ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा घरोघरी सकाळ व्हायची ती आकाशवाणीच्या 'मंगलप्रभात' कार्यक्रमाने! गुरुवारचा मंगलप्रभात कार्यक्रम म्हणजे त्यात 'दत्त दिगंबर दैवत माझे' हे दत्तगुरुंवरचे गाणे हवेच. या गीताचे गायक आर. एन. पराडकर यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे. आर.एन.पराडकर या नावाखेरीज त्यांच्याबद्दल कोणतीच माहिती आजपर्यंत उपलब्ध नव्हती. अगदी आर. एन. म्हणजे नक्की काय नाव होते याचा शोधही आजपर्यंत कोणीही घेतलेला नाही. आर.एन.पराडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष लेख देणारे 'बोभाटा' हे एकमेव माध्यम आहे.
दत्त दिगंबर दैवत माझे. या गाण्याने पराडकरांच्या आयुष्याचं सोनं झालं. हे गाणं आणि आर. एन. पराडकर, दोन्ही गोष्टी अभिन्न आहेत. किंबहुना दत्ताची गाणी म्हणावी ती पराडकरांनीच असं त्यानंतर ठरून गेलं. त्यांची सहज आठवावी अशी इतर गाणी म्हणजे,
१. मज भेटूनी जा हो दत्तगुरू अवधूता.
२. आज मी दत्तगुरू पाहिले
३. दत्तगुरू सुखधाम
४. श्रीपादश्रीवल्लभ दिगंबरा
५. जयजय दत्तराज माऊली
६. माझी देवपूजा पाय तुझे गुरुराया
आणि अर्थातच सोबत पारंपारिक दत्ताची आरती!
एक काळ असा होता की गुरुवारी पराडकरांचं दत्तगुरू गीत लागलं नाही तर ते ऐकल्याखेरीज गुरुवारचा उपवास न सोडणारे लोकही होते. अगदी अलीकडे म्हणजे २०२० च्या मार्च-एप्रिलच्या सुमारास रवीमुकुल यांचा फोन मला आला की त्यांचे मराठी गीतांच्या कोषाचे काम संपत आले आहे, परंतु आर. एन. पराडकर यांच्याबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही. तेथून या शोधाची सुरुवात झाली.
पहिला प्रश्न आला तो असा की, "आर. एन. पराडकर मधील आर. एन. म्हणजे काय नाव असेल?" दुसरी गोष्ट म्हणजे दत्तगुरूंची गाणी म्हणजे आर. एन. पराडकर असं समीकरण तयार झालेलं असलं तरी त्यांची इतरही गाणी असतील, त्याचाही शोध घेणे आवश्यक आहे. ह्यावेळी ग. का. रायकर यांनी संपादित केलेला ‘गोड गोड भावगीते’ हा अतिदुर्मिळ संग्रह हाताशी आला. त्यात गायक वसंत आजगावकर यांनी लिहिलेली नोंद मिळाली. या नोंदीनुसार पराडकर ऑल इंडिया रेडीओवरती स्टाफ आर्टिस्ट होते. हैद्राबाद, औरंगाबाद, बडोदा, मुंबई, केंद्रांवरून त्यांचे कार्यक्रम होत असत. भावगीतांसोबत शास्त्रीय संगीत व ठुमरी सुद्धा ते गात असत. कवी राजा बढे यांच्या रेडीओवर प्रसारित झालेल्या ऑपेरांचे म्हणजे वसंतोत्सव आणि सीताविरहचे संगीतदिग्दर्शन पण त्यांनी केले होते. ‘पायाची दासी’ व ‘बाईल वेडा’ या चित्रपटात त्यांनी प्लेबॅक पण दिला होता. याखेरीज इतर अनेक भावगीते त्यांनी गायली. अर्थातच हा काळ दत्तगाणी म्हणण्यापूर्वीचा असावा. अशारीतीने त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीची माहिती तर मिळालीच, पण मूळ प्रश्न अनुत्तरीतच राहिला. तो म्हणजे आर. एन. म्हणजे काय?
त्यांचे समकालीन सुप्रसिद्ध गायक गोविंद पोवळे यांच्याशी संपर्क साधून बघितला, पण त्यांनाही आर. एन. म्हणजे नक्की काय हे माहिती नव्हते. ते म्हणाले पराडकरांचा नेहमी आग्रह असायचा की त्यांना आर. एन. म्हणूनच हाक मारा. त्यानंतर मी सगळ्या पराडकर नावाच्या कुटुंबांकडे चौकशी करायला सरुवात केली. परंतु आम्ही त्या पराडकरांपैकी नाही असेच उत्तर मिळत गेले. अखेर दीपा साठे नावाची गायिका पराडकरांची गाणी म्हणते असे शुभदा पराडकर म्हणाल्या.
दीपा साठे यांच्याशी संपर्क केल्यावर त्या म्हणाल्या माझे वडील, आता जे ७५ वर्षांचे आहेत ते आर. एन. पराडकर यांचे सख्खे पुतणे. यानंतर श्रीपाद पराडकर यांच्याशी मी फोनवर संपर्क साधला आणि पहिला प्रश्न विचारला की आधी आर. एन. म्हणजे काय ते सांगा. श्रीपाद पराडकर म्हणाले त्यांचं संपूर्ण नाव ‘रघुनाथ नारायण पराडकर’. त्यांचे वडील नारायण पराडकर मुंबईतील झावबावाडीतील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते. त्यामुळे आर. एन. पराडकरांचं बालपण कथाकीर्तन ऐकण्यात गेलं. पंडित भास्करबुवा बखले यांनी त्यांना शिष्य म्हणून शिकवायची तयारी दर्शवली. नंतरच्या काळात भास्करबुवांचं अचानक निधन झालं आणि आर. एन. पराडकरांचं प्राथमिक शिक्षण नरहरी गोखले यांच्याकडे झालं.
दत्तगुरूंच्या गाण्यासोबत त्यांची इतर गाजलेली गाणी म्हणजे ‘नको वाजवू श्रीहरी मुरली’ आणि ‘ध्यास हा जीवाला पंढरीसी जाऊ’. बरीचशी गाणी रेडीओवर म्हटली असल्याने ती बहुतेक आकाशवाणीच्या संग्रहात असावीत. त्यांच्या कार्यक्रमात एका गवळणीची नेहमी फर्माईश व्हायची. ती गवळण म्हणजे ‘गवळणींनो जाऊ नका बाजारी’. परंतु या गाण्याची रेकॉर्ड निघाली नाही.
रघुनाथ नारायण पराडकर उर्फ ‘आर. एन. पराडकर’ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज दत्तजयंतीच्या निमित्ताने ही आठवण बोभाटाच्या माध्यमातून सांगताना मला म्हणजे रवी प्रकाश कुलकर्णीला एक विशेष आनंद होत आहे. प्रस्तुत लेख मुळात अनेक पानांचा होता. परंतु बोभाटाच्या वाचकांसाठी या लेखाची लांबी कमी ठेवण्यात आली आहे.
दुर्दैवाने आर एन पराडकर यांचे फोटो उपलब्ध नाहीत. आम्हाला सापडलेला फोटो काहीसा असा आहे.