computer

शेअर बाजारातले 'थोरले बाजीराव'- चंद्रकांत संपत

शेअर बाजारातले पहिले 'थोरले बाजीराव' असे ज्यांना म्हणता येईल असे व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत संपत.आता ते आपल्यात नाहीत . २०१५ साली वृध्दापकाळाने त्यांचे निधन झाले. बोभाटाच्या या मालिकेतला पहिलाच लेख चंद्रकांत संपत यांच्यावर लिहायचे कारण असे की ते आता बाजारात नसलेल्या जुन्या पिढीचे आदर्श समजले जातात.

आता साहजिकच तुम्ही विचाराल की जुनी पिढी म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे की सध्याचे बाजारातले मोठे खेळाडू म्हणजे मोठी 'गेम' करणारे गुंतवणूकदार सर्व उच्चशिक्षित आहेत. चंद्रकांत संपत यांची पिढी मात्र लौकीकदृष्ट्या फारशी शिकलेली नव्हती. पण कदाचित त्यामुळेच त्यांचे आडाखे बांधण्याचे नैसर्गिक कौशल्य तीक्ष्ण होते. वर्तमानपत्र आणि कंपनीच्या अनधिकृत माध्यमातून मिळणार्‍या माहितीच्या भरवशावर या पिढीचे तर्क आधारीत असायचे.

त्यांची विचार करण्याची पध्दत कशी होती हे समजण्यासाठी एक प्रश्न आणि त्याचे उत्तर वाचूया. समजा कोणत्या कंपनीचे शेअर्स घ्यावे असा प्रश्न तुम्ही विचारला तर चंद्रकांत संपत यांचे उत्तर असायचे,

"एखाद्या मूर्खालाही ज्या कंपनीचा व्यवहार सहज समजेल अशाच कंपनीचे शेअर्स घ्या. कमीतकमी कर्ज - नियमित जमा होणारा नफा - कमी भांडवली खर्च आणि गुंतवलेल्या भांडवलावर जास्तीतजास्त उलाढाल करणार्‍याकंपनीचे शेअर्स घ्या."

आता हे वाक्य समजायला सोपे आहे, पण गुंतवणूक करताना ते अंमलात कसे आणायचे हे समजणे महत्वाचे आहे. आणखी एका उदाहरणातून हे समजून घेऊया!

आता हे वाक्य समजायला सोपे आहे, पण गुंतवणूक करताना ते अंमलात कसे आणायचे हे समजणे महत्वाचे आहे. आणखी एका उदाहरणातून हे समजून घेऊया!

आता Gillette कंपनीच्या ब्लेडस् म्हणजे फावडी दाढी करायला सगळेच वापरतात. Gillette चे नाव त्यावेळी इंडीया शेव्हींग प्रॉडक्ट असे होते. त्या काळात दाढी करायला 'सिंगल पीस ब्लेड' पाती वापरली जायची. उदाहरणार्थ - पनामा- इरॅस्मिक वगैरे. इंडीया शेव्हींग प्रॉडक्टने त्यावेळी पहिल्यांदा डबल -म्हणजे ट्वीन ब्लेड डिस्पोजेबल रेझर आणले. आपल्या भारतीय ग्राहकांची तेव्हाची मानसिकता डिस्पोजेबल रेझरला फॅड समजायची.अशा वेळी चंद्रकांत संपत यांनी जो विचार मांडला होता तो असा की, "भारतात सध्या फक्त १०% लोक डिस्पोजेबल रेझर वापरतात आणि बांगला देशात ३३% लोक डिस्पोजेबल रेझर वापरत आहेत. त्याखेरीज बांगला देशात दाढी वाढवणार्‍यांची संख्या जास्त आहे आणि भारतात दाढी वाढवणार्‍यांची संख्या कमी आहे. जर आपल्याकडे ३३% लोकांनी डिस्पोजेबल रेझर वापरले तर कंपनीची उलाढाल १५,००० कोटी होईल आणि नफा २,००० कोटी असेल. म्हणजेच या समभागाची किंमत २७,००० रुपयांपर्यंत पोहचलीच पाहिजे."

आता प्रश्न असा उभा राहतो की खरोखरच या समभागाचा भाव २७,००० रुपये झाला का?
नाही. बाजारात तसे घडत नाही. जर भाव या पातळीला पोहचला तर लिक्विडिटी म्हणजे तरलता आणि व्हॉल्यूम म्हणजे बाजारात होणारी उलाढाल कमी होते म्हणून बोनस - राइट्स- डिव्हीडंड-स्प्लिट्स अशा विविध मार्गानी शेअरचा भाव काबूत ठेवला जातो. पण चंद्रकांत संपत यांचे विचार ज्यांना समजले त्यांनी तेव्हा इंडीया शेव्हींग प्रॉडक्टचे शेअर विकत घेतले आणि भरपूर नफा कमावला!!

या मालिकेचा उद्देश अशी नेमकी उदाहरण घेऊन मनोरंजन करणे असा नाही. म्हणून चंद्रकांत संपत यांची स्ट्रॅटेजी काय होती ते नेमके समजून घेऊ या.
१. मोजक्या आठ ते दहा चांगल्या कंपन्यांचेच समभाग म्हणजे शेअर्स विकत घ्या.
२. हे समभाग जेव्हा बाजार कोसळला असेल तेव्हाच घ्या.
३. जमा केलेले समभाग साधारण १० वर्षे विकायचे नाहीत अशा तयारीने घ्या.
४. नवनव्या कल्पना बाजारात आणणार्‍या कंपन्यांकडे लक्ष ठेवा.
५. सरकारी धोरणात होणार्‍या बदलावर बारीक लक्ष ठेवा.
 

चंद्रकांत संपत यांनी या विचारांचा नेहेमीच पाठपुरावा केला. सत्तरीच्या दशकात Foreign Exchange Regulation Act (FERA) या कायद्यात बदल झाले. या बदलानुसार परदेशी कंपन्यांना त्यांचे 'होल्डींग' म्हणजे हातात असलेल्या समभागाची संख्या कमी करणे भाग पडले. या कंपन्यांची खरी किंमत लक्षात घेऊन चंद्रकांत संपत यांनी परदेशी कंपन्यांचे शेअर स्वस्त भावात विकत घेतले. त्यानंतरच्या काळात वर्तमानपत्रात जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा शेअरचे भाव भडकले.
त्यांनी जमा केलेल्या शेअरची यादी सोबत देतो आहे ती वाचली तर त्यांनी किती नफा कमावला असेल याची वाचकांना कल्पना येईल.

१ युनिलिव्हर (तेव्हाची हिंदुस्तान लिव्हर)
२ प्रॉक्टर अँड गँबल (तेव्हाची रिचर्डसन हिंदुस्तान)
३ नेस्ले
४ कोलगेट
५ जीलेट (इंडीया शेव्हींग प्रॉडक्ट)

आता चंद्रकांत संपत यांचे विचार मार्गदर्शन म्हणून सध्याच्या काळात आहेत तसे आपल्याला घेता येतील का याचाही विचार करू या.
१. मोजक्या आठ ते दहा चांगल्या कंपन्यांचेच समभाग विकत घ्या. (होय . हा विचार आजही उपयुक्त आहे.)
२. हे समभाग जेव्हा बाजार कोसळला असेल तेव्हाच घ्या. ( होय. उदाहरणार्थ मार्च २०२० साली करोनाच्या भीतीच्या लाटेत बाजार पडला होता.आज बरोबर दीड वर्षाने त्याच शेअरचे भाव काय आहेत ते बघा)
३. जमा केलेले समभाग साधारण १० वर्षे विकायचे नाहीत अशा तयारीने घ्या.(नाही. टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे कंपन्या वेगाने नफा आणि नुकसान दोन्ही वेगाने करू शकतील. गुंतवणूकीचा काळ आता ३ वर्षे असावा).
४. गुंतवणूकीवर दरवर्षी २५% परतावा मिळत असेल तरच गुंतवणूक यशस्वी झाली असे समजा.( २५% परताव्याचा नियम आता १५% असावा)
५. नवनव्या कल्पना बाजारात आणणार्‍या कंपन्यांकडे लक्ष ठेवा. (होय)
६. सरकारी धोरणात होणार्‍या बदलावर बारीक लक्ष ठेवा.(होय)

सध्याचे अनेक 'मार्केट स्टार' चंद्रकांत संपत यांच्याच तालमीत तयार झाले आहेत, त्यांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे 'डीमार्ट'चे राधाकिशन दमाणी!!
चंद्रकांत संपत आरोग्याबद्दलही फारच जागरुक होते. मानसिक आरोग्यासाठी ते गीतापठण करायचे. शारिरीक आरोग्यासाठी अनेक वर्षे ते जॉगींग करायचे. जर आरोग्य साथ देत नसेल तर गुंतवणूकीचे फायदे तुम्ही कसे बघणार? हा त्यांचा सिध्दांत होता. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्यांनी स्वतःला जाणीवपूर्वक बाजारापासून दूर ठेवले होते.

वाचकांनो, या मालिकेतीला हा पहिलाच लेख आहे. या मालिकेतून कोणत्याही टिप्स आम्ही देणार नाही. गुंतवणूक करणार्‍यांना विचार करायला शिकवणे हा या मालिकेचा उद्देश आहे. हा लेख वाचून कसा वाटला? तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते जरूर आम्हाला सांगा!

सबस्क्राईब करा

* indicates required