होम-फूडच्या व्यवसायात उतरलेल्या उद्योजकांनी आधी हे महत्त्वाचे मुद्दे वाचायलाच हवेत !!
E=E हा फॉर्म्युला तुम्ही कुठे वाचला आहे का? वाचला नसणारच. कारण तो आमच्या 'बोभाटा'च्या लेखकांनी शोधून काढलेला खास फॉर्म्युला आहे. आता आमचा फॉर्म्युला आम्हीच समजावून सांगायला हवा नाही का?
एकूण गणित आहे ते असे:
तुमच्या डाव्या बाजूचा E म्हणजे सध्या समाजाला मिळणारे Earning म्हणजेच आवक-कमाई उत्पन्न!! त्यानंतरचा E आहे Eatingचा म्हणजे खाण्याचा!! कोवीड असो वा नसो, पोट तर खायला मागतच राहणार. म्हणून सगळ्यात भरभराटीचा व्यवसाय म्हणजे खाद्य व्यवसाय असं सांगण्याचा या फॉर्म्युलाचा उद्देश आहे. आता तुम्ही म्हणाल की "ह्यॅ ! हे सांगायला बोभाटाचा लेखक कशाला हवाय? हा व्यवसाय तर आम्ही घरबसल्या गेले ६ महिने करतोय!!"
अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. सुरुवातीचे लॉकडाऊनचे काही दिवस घरी गप्प बसल्यावर अनेकांनी हा घरच्या अन्नाचा म्हणजे होम फूडचा व्यवसाय सुरु केला. सध्या हा व्यवसाय इतका जोरात चालतो आहे की बर्याच लोकांनी त्यांच्या मूळ व्यवसायाला रामराम ठोकण्याचा विचार केला आहे. अशा नव्यानव्या उद्योजकांना एक विशेष प्रश्न विचारायचा आहे. तो असा की "तुम्ही होम-फूडच्या व्यवसायाचे FSSAI कायद्याअंतर्गत नोंदणीकरण केले आहे का?" तुमचं उत्तर नकारार्थी असेल तर एक सूचना- तुम्ही घरी बनवलेले अन्न- नाश्ता -पेयं विकत असलात तरी तुम्हाला FSSAI रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. या नोंदणीशिवाय तुम्ही व्यवसाय करत असलात आणि तुमच्या अन्नाच्या दर्जाविषयी कोणीही तक्रार केली तर दंड ते कारावास अशी शिक्षा तुम्हाला लागू होते. आजच्या आमच्या लेखात नेमके हे काय आहे, कसे करायचे, खर्च किती येतो अशा अनेक प्रश्नांची चर्चा आपण करणार आहोत.
आधी जाणून घेऊ या की (FSSAI) म्हणजे काय?
२००६ साली संसदेत पारीत झालेल्या The Food Safety and Standards म्हणजे अन्न सुरक्षा अणि मानांकन या कायद्याद्वारे स्थापित झालेली संस्था म्हणजे The Food Safety and Standards Authority of India. भारतीय खाद्य संरक्षण एवं मानक प्राधिकरण असे या संस्थेचे सरकारी नाव आहे. ग्राहकांना योग्य दर्जाचे अन्न पुरवले जाते आहे अथवा नाही यावर लक्ष ठेवणारी सरकारी संस्था असे सोप्या शब्दात FSSAI चे वर्णन करता येईल. घरी बनवलेले अन्नपदार्थ, हॉटेलमध्ये दिले जाणारे अन्नपदार्थ, फक्त व्यापारी किचनद्वारे पुरवठा केले जाणारे अन्न, औषधाची दुकाने, डेअरी अशा अनेक व्यवसायांना या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी करावी लागते आणि स्टेट आणि सेंट्रल असे परवाने घ्यावे लागतात. आजचा आपला विषय फक्त घरी तयार केलेल्या अन्नाबाबत आहे म्हणून आपण त्यासाठी आवश्यक त्याच प्रश्नांची उत्तरे हाताळू. यापुढे लेखात FSSAI चाउल्लेख 'एफसाय' असा केला आहे.
प्रश्न १. मी /आम्ही घरी बनवलेले अन्नपदार्थ विकतो त्यासाठी काय करावे लागेल ?
FSSAIच्या अंतर्गत उद्योजकाला फूड बिझनेस ऑपरेटर असे संबोधन आहे. तुम्ही अन्न घरी बनवत असाल तर तुमचे वर्गीकरण 'पेटी फूड बिझीनेस ऑपरेटर' असे केले जाते.
प्रश्न २. 'पेटी फूड बिझीनेस ऑपरेटर' ची व्याख्या काय आहे ?
अन्नपदार्थ विकण्याचा छोटा व्यवसाय करणारा ज्यामध्ये वार्षिक उलाढाल १२ लाखाच्यावर नसेल त्याला पेटी फूड बिझिनेस ऑपरेटर म्हणतात. या वर्गीकरणात गाडीवर विक्री करणारे, फिरस्ती विक्री करणारे, प्रदर्शनात विक्री करणारे, घरून विक्री करणारे, यांचा समावेश होतो. थोडक्यात कोपर्यावरचा पाणीपुरीवाला, फिरत फिरत इडली विकणारा- घरी बनवलेले डबे विकणारा सगळ्यांचा समावेश त्यात होतो.
प्रश्न ३ - अशा पध्दतीने दिवसभरात किती अन्न बनवून विकावे याचे काय नियम आहेत?
एकूण उत्पादन दिवसाला १०० किलो /लिटरच्यावर नसावे. म्हणजे तुम्ही तयार भाज्या -चिकन मटन विकत असाल तर १०० किलो आणि द्रवपदार्थ म्हणजे सरबते, लस्सी असे विकत असाल तर १०० लिटर अशी मर्यादा आहे. दूध विकत असाल तर त्यावर ५०० लिटरची मर्यादा आहे. मटणासाठी दोन बकरे आणि चिकनसाठी जास्तीतजास्त १० कोंबड्या अशी मर्यादा आहे.
प्रश्न ४. माझ्या छोट्या व्यवसायाला परवाना लागतो की नोंदणी पुरेशी आहे ?
वर उल्लेख केलेल्या छोट्या व्यवसायासाठी नोंदणीकरण करणे आवश्यक आहे. या नोंदणीकरणाचे १० आकडी प्रमाण पत्र -क्युआरएस कोड - फोटो सह मिळते. त्याची मागणी झाल्यास ते सहज दाखवता आले पाहिजे.
प्रश्न ५. आणि व्यवसाय वाढला तर?
व्यवसाय वाढण्यासाठीच करावा हे सत्य आहे. पण व्यवसाय वाढला तर तुमचे वर्गीकरण बदलते आणि परवाना म्हणजे लायसन्स घ्यावे लागते. ही प्रक्रिया सोपी आहे. पण आजचा विषय मर्यादित असल्याने अधिक माहिती या लेखात दिलेली नाही.
प्रश्न ६. हे नोंदणीकरण कसे करायचे?
रजिस्ट्रेशन अथवा नोंदणीकरण ऑनलाइन करता येते. त्यासाठी एफसायच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. फूड सेफ्टी ऑफीसर किंवा डेझिग्नेटेड ऑफीसर हे प्रमाणपत्र देतात. त्यासाठी आवश्यक ते कागदपत्र असे आहेत:
शेड्यूल-१ प्रमाणे अर्ज -ऑनलाइन उपलब्ध आहे.
वार्षिक फी रुपये १००/-
पत्ता दर्शवणारा पुरावा- कोणतेहि सरकारी कागदपत्र उदा. व्होटर आय कार्ड
अर्ज करणार्याचा फोटो -स्कॅन करून टाकायचा.
१४ आकडी नोंदणी परमाणपत्र घरी सहज दिसेल असे ठेवावे.
प्रश्न ७. हे ऑनलाइन काम मला करता येत नसेल तर काय करावे?
एफसायने तुमच्या मदतीसाठी FSM फूड सेफ्टी मित्र आणि डिजीटल मित्र यांची नेमणूक केली आहे. त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेले आहे.
प्रश्न ८. सध्या देऊळ बंद आहेत. पण आमच्या देवळात प्रसाद वाटप होते त्यासाठी देवळाला परवाना लागतो का?
होय, लंगर भंडारा, किंवा इतर प्रकारचा प्रसाद देवळाच्या मुदपाकखान्यात बनवून वाटप करण्यासाठी परवान्याची गरज आहे .
प्रश्न ९. माझा मुलगा /मुलगी फूड ट्रक किंवा क्लाऊड किचन सुरु करतो आहे त्याला कोणती परवानगी लागेल?
या दोन्ही व्यवसायांसाठी लायसन्स घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पण ऑनलाइन अर्ज करता येतो.
प्रश्न १०. महिला गृह उद्योग / महिला बचत गट - सहकारी सोसायटी यांच्यासाठी आम्ही /माझा घरी अन्नपदार्थ बनवण्याचा व्यवसाय आहे. मला परवानगी/नोंदणी आवश्यक आहे का ?
'एफसाय'च्या 03-01/2012/Enf-I/FSSAI dated 21st Jan 2015 आदेशानुसार संस्थेचे नोंदणीकरण आवश्यक आहे. वैयक्तिक नोंदणीची गरज नाही.
प्रश्न ११. एफसायची ऑनलाइन मदत कोणत्या इतर माध्यमातून मिळते? 'एफसाय'ची हेल्पलाइन टोल फ्री म्हणजे नि:शुल्क आहे Helpline (Toll Free) 1800112100. एफसायचे अॅप आहे. त्याखेरीज व्हॉट्सॅप, ट्वीटर, फेसबुक पेज याद्वारे सहज संपर्क करता येतो मित्रहो, हे सगळे साधे
प्रश्न ११. एफसायची ऑनलाइन मदत कोणत्या इतर माध्यमातून मिळते?
'एफसाय'ची हेल्पलाइन टोल फ्री म्हणजे नि:शुल्क आहे Helpline (Toll Free) 1800112100. एफसायचे अॅप आहे. त्याखेरीज व्हॉट्सॅप, ट्वीटर, फेसबुक पेज याद्वारे सहज संपर्क करता येतो
मित्रहो, हे सगळे साधे सरळ सोपे मार्ग आहेत. जर तुम्ही या व्यवसायात असाल तर नक्की नोंदणी करा. या लेखाच्या मर्यादेमुळे अनेक इतर प्रश्न हाताळणे शक्य माही. उदाहरणार्थ मोठ्या व्यवसायासाठी अन्न पदार्थांचे वर्गीकरण २६४ प्रकारचे आहे. तुमच्या सोयीसाठी हिंदी/इंग्रजी या दोन्ही भाषांत असलेल्या या https://www.fssai.gov.in/ संकेतस्थळाचा वापर करा.
हो, आणि नोंदणी झाली की खाऊचा डब्बा 'बोभाटा'ला पाठवायला विसरू नका.