computer

इतक्या ऍसिड बळीमधून फक्त लक्ष्मीवरतीच सिनेमा का ? जाणून घ्या !!

आज दीपिका पादुकोणच्या छपाक चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिका अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी अगरवालची भूमिका साकारत आहे. मेघना गुलजार चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे.

आपल्या देशात मुलींवर असे अॅसिड हल्ले वारंवार झालेले आहेत, मग लक्ष्मी अगरवालचीच कथा मोठ्या पडद्यावर साकारण्याचा मोह मेघना गुलजार सारख्या मोठ्या दिग्दर्शिकेला का झाला असावा असा प्रश्न पडतोच. याचं उत्तर लक्ष्मी अगरवालच्या आजवरच्या प्रवासात आहे. ती अॅसिड हल्ल्यानंतर हतबल झाली नाही तर तिने मोठा लढा दिला. तिची कहाणी आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देणारी ठरू शकते.

लक्ष्मी अगरवालचा जन्म दिल्लीतल्या एका मध्यमवर्गी कुटुंबात झाला होता. दिल्लीतल्या कोणत्याही साधारण घरात जे वातावरण असतं तशाच वातावरणात ती लहानाची मोठी झाली होती. तिचं आयुष्य बदललं ते २००५ साली. त्यावेळी ती अवघ्या १५ वर्षांची होती.

ती दिल्लीच्या खान बाजार भागातल्या एका पुस्तकाच्या दुकानात जात होती. तेव्हा तिच्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या एका माणसाने तिच्यावर अॅसिडने भरलेली बाटली फेकली. बाटलीतलं अॅसिड तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि शरीरावर सांडलं. तिची कातडी अक्षरशः जळाली.

तिच्यावर हल्ला करणाऱ्या माणसाचं नाव होतं गुड्डा उर्फ नाहीम खान. हा तिच्याच मैत्रिणीचा भाऊ होता. त्याने अवघ्या १५ वर्षाच्या लक्ष्मीला मागणी घातली होती. तिने नकार दिल्यावर त्याने हे घाणेरडं कृत्य केलं होतं.

अॅसिड हल्ला झाल्यानंतर तिला तातडीने राम मनोहर लोहिया हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. तिथे तिच्यावर ३ महिने उपचार करण्यात आले. या दरम्यान लक्ष्मीला आपला चेहरा कसा दिसतोय हे माहित नव्हतं. तिला जिथे ठेवण्यात आलं होतं तिथे आरसे नव्हते. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर तिने तिच्या चेहऱ्याची पहिली झलक ही पाण्यात बघितली होती. पण पाण्यात तिला फक्त पट्ट्यांनी झाकलेला चेहरा दिसला.

कालांतराने जेव्हा तिला तिचा चेहरा दाखवण्यात आला तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता. शस्त्रक्रियेनंतरही तिचे डोळे बेढब दिसत होते. हल्ल्यापासून जवळजवळ १० वर्षांपर्यंत ती वेगवेगळ्या सर्जरीज मधून गेली. हा संपूर्ण काळ तिच्यासाठी प्रचंड मानसिक धक्क्याचा होता, पण तिने आहे ती परिस्थिती मान्य करून स्वतःला सावरलं. एवढंच नाही तर तिने परिस्थितीशी दोन हात केले.

लक्ष्मीने याला जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कायद्याच्या पुढे उभं केलं. नाहीम खान आणि तिला मदत करणारा तरुण, सोबतच नाहीम खानची बहिण या सगळ्यांना शिक्षा झाली. यानंतरही लक्ष्मी स्वस्थ बसली नाही. तिने २७,००० सह्या गोळा करून अॅसिड विक्री थांबवण्याची मागणी केली. अॅसिड हल्ला झालेल्या पीडितांना न्याय मिळावा म्हणून तिने जनहित याचिका दाखल केली. अॅसिड हल्ल्याबद्दल फौजदारी कायद्यात आणि दंडसंहितेत तसा स्पष्ट उल्लेख, कायद्यात महत्वाच्या दुरुस्त्या आणि अॅसिड हल्ला पिडीतांसाठी विशेष कायदा करण्याची मागणी तिने केली. तिच्या प्रयत्नांना यश आलं आणि कोर्टाने २०१३ साली तसा कायदा आणला.

या कायद्याने बऱ्याच प्रमाणात अॅसिड विक्रीवर नियंत्रण आणलं गेलं. अॅसिड विकत घेताना ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलं. अॅसिड विकत घेणाऱ्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळू लागली.

लक्ष्मीने याचं श्रेय आपल्या वडिलांना दिलं आहे. त्यांनीच तिला जनहित याचिका दाखल करण्यास प्रोत्साहन दिलं होतं. या लढ्यात आणखी एका व्यक्तीचं नाव घेणं महत्वाचं आहे. तिचं नाव रुप. रूपा ही सुद्धा अॅसिड हल्ल्यातून बचावलेली तरुणी होती. लक्ष्मी आणि रूपा यांनी मिळून कायद्यापुढे आपल्या मागण्या ठेवल्या. पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून उपोषणही केलं.

मंडळी, लक्ष्मीला तिच्या कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. २०१४ साली तिला मिशेल ओबामा यांच्या हस्ते ‘इंटरनॅशल विमेन ऑफ करेज’ पुरस्कार मिळाला. त्याचवर्षी तिला NDTV तर्फे Indian of the Year घोषित करण्यात आलं.

मंडळी, कायदा पारित झाला असला तरी तिने लढा थांबवलेला नाही. २०१४ साली तिने ‘छाव फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेतर्फे ती अॅसिड हल्ला झालेल्या पीडितांना मदत करते.

मंडळी, अॅसिड हल्ला म्हणजे आयुष्य संपणे नव्हे हे लक्ष्मी अगरवालने दाखवून दिलं आहे. तिच्या आयुष्यावर आधारित सिनेमात या सगळ्या गोष्टी नेमक्या कशारीतीने दाखवण्यात येतील हे पाहण्यासारखं असेल.

सबस्क्राईब करा

* indicates required