computer

सावधान !! थोड्याच दिवसात आपली लोकसंख्या चीनपेक्षा जास्त असेल का ??

कालपरवाच आलेल्या एका वृत्तानुसार २०२५ या वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या कदाचित चीनपेक्षाही जास्त असेल. युनायटेड नेशनच्या  इकॉनॉमिक अँड सोशल अफेअर्स खात्याच्या माहितीप्रमाणे गेल्यावर्षी भारताची लोकसंख्या१३८ कोटी म्हणजे चीनपेक्षा १.५%  कमी होती. यावर्षी ०४ मार्चला आपली लोकसंख्या १४१,५६,५३, ८२१ म्हणजे एकशे एक्केचाळीस कोटी छप्पन लाख त्रेपन्न हजार आठशे एकवीसचा आकडा पार करून गेली आहे.आपली वाढती लोकसंख्या बरीच वर्षे आपल्या विकासाच्या मार्गावरचा मोठा अडथळा होता. गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या सामाजिक जागृतीमुळे सर्वांनी कुटुंब नियोजनाचा मार्ग स्वीकारला आहे. कुटुंबनियोजन हा आता बाऊ करण्याचा विषय राह्यला नाही. पण एकेकाळी या विषयावर बोलणे देखील असभ्यपणाचे लक्षण समजले जायचे. आज आपण बघू या कुटुंबनियोजनाच्या इतिहासाचे काही महत्वाचे टप्पे!

१. रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्याच्या ' समाजस्वास्थ्य' या मासिकातून १९२७ सालापासून प्रथम कुटुंबनियोजनाचा प्रसार करायला सुरुवात केली. जर योग्य साधने वापरली तर वाढत्या लोकसंख्येला आळा बसेल, नको असलेले गर्भारपण आणि गर्भपात यातून स्त्रियांची सुटका होईल, पुरेशा उत्पन्नाअभावी कुटुंबाची होणारी फरपट थांबेल या हेतूने त्यांनी हा प्रसार केला. केवळ प्रसारच केला असे नव्हे आपल्या विचारांची प्रामाणिकता दर्शवण्यासाठी त्यांनी आणि त्यांची पत्नी मालती यांनी अपत्य होऊ दिले नाही. पण तो काळ फारच वेगळा होता. कुटुंब नियोजन या विषयाला सामाजिक विरोध होता. 'समाजस्वास्थ्या'चे अंक चोरून वाचले जायचे. पण रघुनाथ धोंडो कर्वे यांनी त्यांचा प्रचार थांबवला नाही. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रियासतकार सरदेसाई, रँग्लर परांजपे, मामा वरेरकर या सर्व विचारवंतांनी त्यांच्या विचारांची पाठराखण केली. पण त्यांचे विचार प्रत्य्क्षात येण्यास बरीच दशके जावी लागली.

२. सरकारने कुटुंबनियोजनाचा पुरस्कार करून प्रचार करावा असे र.धों. कर्वे यांचे मत होते. पण या विचाराला समाजाच्या सर्व स्तरातून तेव्हा विरोध करण्यात आला. कुटुंबनियोजनाची साधने वापरून नियोजन करणे या संकल्पनेला महात्मा गांधींचा विरोध होता. त्यांच्या मते स्वतःवर म्हणजे स्वतःच्या कामेच्छेवर ताबा मिळवणे हाच एकमेव मार्ग होता. त्यांच्या मते "कृत्रिम साधने वापरणे म्हणजे अनैतिकतेला अधिमूल्य देण्यासारखे आहे. स्त्री आणि पुरुष त्यामुळे बेपर्वा होतील. सामाजिक बंधने आणि त्यांचा आदर लयाला जाईल. समाज अशक्त आणि नैराश्यग्रस्त होईल. रोगापेक्षा हा उपाय वाईट आहे." ब्रह्मचर्याचा अवलंब करून कुटुंबनियोजन करणे हा योग्य मार्ग आहे असे महात्माजींचे मत असल्याने हा विषय बरीच वर्षे मागे पडला. त्यांच्या अनुयायांपैकी जयप्रकाश नारायण यांनी तो मार्ग स्वीकारून ब्रह्मचर्याचे पालन केले. सर्वसामान्य जनतेला हे शक्य नसल्याने भारताची लोकसंख्या वाढतच राहिली. ज्याला पोलिटिकल विल किंवा राजकीय इच्छाशक्ती असे म्हणतात त्याचा पूर्ण अभाव असल्याने हा कार्यक्रम स्वीकारण्यात बरीच वर्षे वाया गेली.

३.१९५१ साली भारत सरकारने राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. विकसनशिल देशांमध्ये कुटुंबनियोजनाला सरकारमान्य धोरण म्हणून राबवणारा भारत हा पहिला देश होता. १९५१ ते १९७९ या काळात कुटुंब नियोजन हा पंचवार्षिक योजनेचा भाग होता. सुरुवात 'सेफ प्रिरीयड' या कल्पनेपासून झाली. सेफ पिरीयड म्हणजे प्रजनन होण्याची शक्यता कमी शक्यता असलेले दिवस! परंतु हा प्रकार तसा 'अंदाजपंचे' असल्याने नियोजन फसायचे. हळूहळू कृत्रिम साधने म्हणजे निरोध, तांबी यांचा वापर सुरु झाला. तांबी म्हणजे कॉपर-टी ला त्याकाळात लूप म्हटले जायचे. शास्त्रीय भाषेत त्याला इन्ट्रायुटेरीन डिव्हाइस किंवा आय.यु.डी या नावाने ओळखले जाते. थर्मोप्लास्टीकचा वापर करून बनवलेल्या या साधनाला Lippes Loop म्हटले जायचे. सुरुवातीच्या 'लूप' मुळे बर्‍याच वेळा ओटीपोटात जंतूसंसंर्ग व्हायचा. या संसर्गाला केवल लूपच जबाबदार होते असे नाही. मासिक धर्माच्यावेळी वारंवार वापरली जाणारी फडकी पण जंतूसंसर्गाला जबाबदार असायची. पण एकंदरीत जंतूसंसर्गामुळे होणारा त्रास महिलांनाच सोसावा लागायचा. त्यामुळे महिलांच्या मनातही आय.यु.डी बद्दल नकारात्मक भूमिका तयार झाली.पण १९७६ नंतर कॉपर-टी या साधनाचा वापर सुरु झाला. लूपपेक्षा कॉपर-टी वापरायला सुटसुटीत आणि सुरक्षित होती.

४ याच दरम्यान पुरुषांनी वापरण्यासाठी सुटसुटीत असे साधन म्हणजे 'कंडोम'चा वापर सुरु झाला होता. सरकारपुढे समस्या अशी होती की कंडोम बनवण्याचे कारखाने तेव्हा भारतात नव्हते. ब्रिटिशांच्या काळातही कंडोम उपलब्ध होते, पण त्यांची सरासरी किंमत तेव्हा चार आणे होती (म्हणजे आताचे १० रुपये) त्यामुळे नियमित वापरासाठी स्वस्त कंडोम मिळवणे हा एकच उपाय होता. त्यासाठी सरकारने ४० कोटी कंडोम अमेरिका-जपान-कोरीयातून मागवून घेतले आणि स्वस्त दरात म्हणजे पाच पैशांत विकायला सुरुवात केली. अशा पध्दतीने भारतात 'निरोध' चा जन्म झाला. सुरुवातीला निरोध या नावाऐवजी 'कामराज' या नावाने हे कंडोम बाजारात आणले जाणार होते. पण त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष यांचेच नाव के. कामराज होते त्यामुळे 'निरोध' हेच नाव पक्के करण्यात आले. त्यानंतर १९६६ साली एका जपानी कंपनीसोबत करार करून भारतात 'हिंदुस्थान लॅटेक्स' या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि निरोधचे उत्पादन भारतात सुरु झाले.

५ साठीच्या दशकात सरकारनेही बर्थकंट्रोल हा विषय अत्यंत शिस्तीत राबवल्याने समाजाच्या तळागाळापर्यंत कुटुंब नियोजनाचा संदेश पोहचला. सरकारी प्रसिध्दी माध्यमांनीही हा कार्यक्रम सफल होण्यात महत्वाचा हातभार लावला. भिंतींवर लाल त्रिकोणाच्या जाहिराती लावणे, घरोघरी जाऊन प्रचार करणे आणि सिनेमाच्या माध्यमातून प्रचार करणे हे त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्याखेरीज कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणार्‍याला आणि त्याला उद्युक्त करणार्‍या मध्यस्थाला काही रक्कम रोख किंवा भांडी-गृहोपयोगी भेटवस्तू देणे असेही अनेक उपक्रम राबवण्यात आले. !

६ महाराष्ट्रात या दरम्यान 'प्रपंच' नावाचा चित्रपट आला. या चित्रपटाची कथा ग. दि. माडगूळकर यांची होती. एक गरीब जोडपे आणि त्यांच्या सहा मुलांची ही कथा होती. कुटुंब नियोजनाचा अप्रत्यक्ष प्रचार असलेला हा चित्रपट गावागावात सरकारी खर्चाने दाखवण्यात आला. या चित्रपटातले "विठ्ठला तू वेडा कुंभार", "पोटापुरता पसा पाहिजे", "आला वसंत देही" ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. या सिनेमाची प्रेरणा देवानंदच्या 'एक के बाद एक' या चित्रपटावरून मिळाली असे म्हटले जाते. त्या चित्रपटातही हाच कथाविषय होता. पण देवानंदचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर आदळला. 'प्रपंच'ने मात्र महाराष्ट्रात सरकारी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरपूर हातभार लावला. सरकारी पातळीवर हे प्रयत्न चालू असताना परदेशात या विषयावर महत्वाच्या घडामोडी घडत होत्या. आज आपण अमेरीकेला एक प्रगत देश म्हणून ओळखतो, पण त्या काळात अमेरीकेतही फॅमिली प्लॅनिंग हा ज्वलंत विषय होता. ही संकल्पना मांडणार्‍या अनेकांना त्यावेळी तुरुंगात पण टाकण्यात आले होते. 


आजच्या भागात आता आपण थांबू या. पुढच्या भागात  ओरल काँट्रासेप्टीव्ह आणि एमटीपीच्या कायद्याबद्दल आपण वाचू या

सबस्क्राईब करा

* indicates required