computer

कपुरथळ्याच्या जगतसिंग महाराजांचे रंगीत चाळे म्हणजे स्वैराचाराचा कळसच होता !

१५ व्या शतकाच्या अखेरीस वास्को-दि-गामाने भारतात पाऊल ठेवले. त्यानंतर फ्रेंच, डच, ब्रिटीश वसाहतवाद्यांनी भारतात आपले बस्तान बसवले. या व्यापारी वसाहतींमध्ये अनेक तरुण अधिकारी भारत स्थाईक झाले. या अधिकाऱ्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी अशी होती की भारतामध्ये त्यांच्याशी लग्न करणार कोण ?

काही वर्षांनी ही समस्या दूर करण्यासाठी गोव्याच्या पोर्तुगीज वसाहतीत केवळ विवाहोत्सुक तरुणींना एका बोटीने पोर्तुगालहून आणण्यात आले. हे सर्व तरुण अधिकारी पैशांनी गब्बर होते आणि येणाऱ्या मुली अशाच तरुणांच्या शोधात होत्या. या सर्व मुलींची हळूहळू तिथे लग्न पण झाली. पुढच्या काही वर्षात भारतातल्या तरुण अधिकाऱ्यांशी लग्न करण्याची फॅशनच युरोपात आली. अशा विवाहेच्छूक तरुणींना युरोपात फिशिंग फ्लीट म्हणून हिणवले जायचे, तर भारतात येऊन सुद्धा ज्यांची लग्न जमली नाहीत त्यांना युरोप मध्ये परत गेल्यावर ‘रिटर्नड एम्प्टीस’ या नावाने हिणवले जायचे.

थोड्याच दिवसात भारतात जायचे आणि एखाद्या ‘ब्राऊन प्रिन्स’ला गटवून श्रीमंत व्हायचे ही नवीन फॅशन जगभरात पसरली. ब्रिटिशांना अर्थातच असे विवाहबाह्य संबंध मान्य नव्हते. याची दोन करणं होती ती अशी की ब्रिटीश स्वतःला श्रेष्ठ समजायचे आणि दुसरे कारण असे की या विवाहबाह्यसंबंधातून अनेक खटले उभे राहायला लागले. परिणामी हे झमेले सांभाळताना ब्रिटीशांची तारांबळ उडाली होती. भारतीयांच्या दृष्टीने हे एक मोठं नुकसान होतं. या बायका इंग्लंडला रवाना होताना संस्थानिकांच्या खजिन्यावर डल्ला मारून जायच्या. यामधून पुढे खटले उभे राहू नयेत म्हणून युरोपियन बायकांच्या विशेषतः इंग्रजी बायकांच्या हक्काची पायमल्ली होऊ नये म्हणू ब्रिटिशांनी १८७४ साली एक कायदा आणला ज्याचे नाव होते ‘मॅरेड वूमन्स प्रॉपर्टी’ कायदा. (जो आजही अस्तित्वात आहे.)

१८५७ ते १९४७ या दरम्यान भारताचा ६० टक्के भाग ब्रिटीश इंडिया होता. उरलेला ४० टक्के भारत ब्रिटीश साम्राज्याचा मांडलिक होता पण अधिपत्य राजा-महाराजांचेच होते. १८५७ चा धडा समोर असल्यामुळे या राजा-महाराजांच्या चाळ्यांना आवर घालणे ब्रिटीश टाळायचे. काहीवेळा ते त्यांच्या पथ्यावर देखील पडायचे. गोऱ्या कातडीचा शौक असलेले हे सगळे राजे वर्षातला बहुतांश काळ युरोपातच घालवायचे. याखेरीज या संस्थानिकांचे व्यक्तिमत्व पण दुहेरी असायचे. ब्रिटिशांसमोर ते ब्रिटीश व्हायचे तर वयक्तिक आयुष्यात ते पुरेपूर पारंपारिक भारतीय असायचे.

या राजा-महाराजांच्या रंगरलीयांचा जो नमुना आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत तो वाचून तुम्ही पण कपाळावरच हात माराल.

पंजाब ते कराची हा समृद्ध भूभाग त्याकाळी ४ मोठ्या संस्थानिकांमध्ये वाटला गेला होता. कराची, जिंद, पतियाळा, कपुरथळा यापैकी कपुरथळ्याच्या महाराजा जगतसिंग यांना युरोपात फ्रँकोफाईल म्हणून ओळखले जायचे. फ्रँको फाईल म्हणजे फ्रेंच तरुणींची आसक्ती असलेला महाराजा. या महाराजांच्या मते भारतीय बायकांमध्ये ‘ती मजा’ नव्हती आणि फ्रान्स मधल्या बायांमध्ये ‘ती मजा’ होती. जर फ्रेंच रखेलीसोबत येऊ दिले तरच मी भारतात येईन नाहीतर मी युरोप मध्येच राहीन असे त्यांनी ब्रिटीश सरकारला सांगितले होते. १९२४ साली मॅडम सेरेट या फ्रेंच मुलीबरोबर (येण्याजाण्याच्या खर्चासकट) त्यांचे भारतात आगमन झाले. थोड्याच दिवसात कपुरथळ्याच्या एका अलिशान महालात तिची स्थापना पण करण्यात आली. ही एक बाई असती तर इतिहासात एखाद पान लिहून हा विषय संपला असता पण सेरेट गेली आणि हेन्रीएट सेरुरीयर ही दूसरी मड्डम भारतात आली.  तिच्या स्वागतासाठी कपुरथळ्याहून मिस्टर अँड मिसेस बॅरन यांना मुंबईत पाठवण्यात आले.

ब्रिटीश इमिग्रेशन खात्याने सुरुवातीला तिला भारतात येण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला पण बॅरन समोर त्यांचा नाईलाज झाला. बॅरनने सेरुरीयरला मुंबईच्या ताजमहाल हॉटेल मध्ये ठेवून ६ आठवडे होत आहेत नाहीत तेव्हा मॅडम लेमा पाषा या फ्रेंच सुंदरीचे आगमन भारतात झाले आणि तिची रवानगी पण ताजमहाल हॉटेल मध्ये करण्यात आली. यावेळी बॅरनच्या ऐवजी जरमणी दास या सहाय्यकाची नेमणूक करण्यात आली. अशारितीने फ्रेंच स्त्रिया कपुरथळ्याला येतजात राहिल्या. कालांतराने त्यांनी अॅनिता दिलगाडो या स्पॅनिश सुंदरीशी लग्न पण केलं.

हे असले सगळे चाळे किती महाग होते याचे उदाहरण द्यायचे झाले तर जर्मन पेलीग्रेनो ही फ्रेंच युवती महाराजांची ‘सेवा’ करण्यास तयार झाली तेव्हा महराजांनी तिला आणण्यासाठी पिएनओ कंपनीचे संपूर्ण जहाजच बुक करून टाकले. मुंबईला पोहोचल्यानंतर पतियाळा पर्यंत त्या एकट्या बाईंसाठी एक खास रेल्वेगाडी सोडण्यात आली आणि कपुरथळ्याच्या महालात तिची रवानगी झाली.

या सगळ्या बायका नशीब कमवायलाच भारतात आल्यामुळे जाताना खजिन्यावर डल्ला मारून जायच्या, पण या राजा-महाराजांना त्याची काही पडली नव्हती. याचे उदाहरण बघूया.

कपुरथळ्याच्या ज्या महाराज जगतसिंग यांना आपला स्टॅमिना दाखवण्याची इतकी हौस होती की त्यासाठी बाईकडे जाण्यापूर्वी गुरुग्रंथ साहेबाचे विशेष प्रार्थना हे महाराज करायचे. अशाच एका संध्याकाळी मॅडम सेरेट बरोबर यथासांग इच्छापूर्ती झाल्यावर महाराजांनी हिऱ्यांचा एक अमूल्य हार जो त्याकाळी १० लाखांचा होता तो नजर केला. त्यानंतर ते बाहेर पडण्याची वाट बघणाऱ्या नोकर हुजऱ्यांवर चांदीच्या नाण्यांचा वर्षाव केला.

ही राजा-महाराजांची थेरं १९७० सालपर्यंत चालू राहिली पण १९७० साली आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संस्थानिकांचे तनखे बंद केल्यावर असे प्रकार कमी घडायला लागले. आज सांगितलेला कपुरथळ्याच्या जगतसिंग यांचा किस्सा हा केवळ एकंच नमुना होता. लिहायला गेलं तर अशी शेकडो प्रकरणं वाचून वाचकालाच लाज वाटेल.

अभिमानाची गोष्ट अशी की महाराष्ट्रात देखील अनेक छोटीमोठी संस्थाने होती, पण अशा रंगीत चाळ्यांची उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ नाहीत.

पुढच्यावेळेस आपण वाचूया काश्मीरचे महाराज हरीसिंग यांच्या ‘मिस्टर A केस’बद्दल !!

हा लेख आवडला असेल तर जास्तीतजास्त शेअर करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required