भारताचं नौदल मजबूत करणारी 'सायलेंट किलर' पाणबुडी....'INS करंज'बद्दल या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या !!
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजचा खूप दिवस खूप महत्त्वाचा आणि अभिमानाचा ठरणार आहे.आज नौदलाच्या ताफ्यात एक पाणबुडी नव्याने दाखल झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही पाणबुडी शत्रूला नेस्तनाबूत करायला खूप उपयोगी ठरणार आहे. INS करंज असे त्या पाणबुडीचे नाव असून ती सायलेंट किलर म्हणून ओळखली जाते. म्हणजे शत्रूला कोणताही थांगपत्ता लागू न देता त्यांच्यावर अनपेक्षितपणे हल्ला करणे. मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार करंज पानबुडीला युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं आहे. आज पाहुयात काय आहेत या पाणबुडीची वैशिष्ट्ये.
ही पाणबुडी स्कॉर्पियन वर्गातली आहे. INS करंज पाणबुडी ही तब्बल २२० फूट लांब आहे. तिचे वजन १५६५ टन इतके आहे. उंची सुमारे ४० फूट तर खोली १९ फूट इतकी आहे. जास्त काळ प्रवासासाठी आयएनएस करंजमध्ये ३६० बॅटरी सेल आहेत. प्रत्येक सेलचे वजन जवळजवळ ७०० ग्राम इतके आहे. या बॅटरीमुळे INS करंज १२००० किमी चा प्रवास करू शकते. यात दोन १२५० किलोवॅट डिझेल इंजिन सुद्धा आहेत. म्हणजे इलेक्ट्रिक तसेच डिझेलवरही पाणबुडी चालू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे फ्रान्सकडून घेण्यात आलेले मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर. या मोटरमूळे पाणबुडीचा कसलाही आवाज पाण्याबाहेर येत नाही. या मोटरमुळे ती कसलाही आवाज न करता अचानक शत्रूवर हल्ला करू शकते. यामुळेच करंजला सायलंट किलर नाव मिळाले आहे.
Scorpene-class submarine INS Karanj commissioned into Indian Navy in Mumbai, in presence of Chief of Naval Staff Admiral Karambir Singh and Admiral (Retired) VS Shekhawat pic.twitter.com/8Sk520fhzR
— ANI (@ANI) March 10, 2021
या पाणबुडीचे अजून एक खूप महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वापरण्यात आलेले स्टील्थ तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा उपयोग असा की, ही पाणबुडी शत्रूच्या रडारमध्ये येत नाही. त्यामुळे रडारच्या नजेरत न आल्यामुळे ही पाणबुडी कुठे आहे याचा पत्ता शत्रूला लागणार नाही. त्यांना चकवून या पाणबुडीच्या माध्यमातून कधीही मोठा विध्वंस घडवून आणता येऊ शकतो.
यापूर्वी स्कॉर्पियन वर्गातील INS कलवरी आणि INS खंडेरी या दोन पाणबुड्या नौदलात दाखल झाल्या आहेत. आता चौथी पाणबुडीची चाचणीही सुरू आहे. एकूण ७२ जहाज आणि पाणबुड्या नौदलात नव्याने सामिल होत आहेत. यामुळे भारताची ताकद समुद्रावरही वाढणार आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचा धोका बघता भारतासाठी INS करंज ही महत्त्वाची पाणबुडी ठरणार आहे, यात शंका नाही !!
लेखिका: शीतल दरंदळे