आषाढ महिन्याची प्रतिपदा - कालिदास दिन
संस्कृत साहित्यामध्ये महाकवि कालिदास हे ‘कविकुलगुरू’ या उपाधीने ओळखले जातात. संस्कृत साहित्यात कालिदासांच्या प्रतिभेची उत्तुंगता अलङ्घ्य समजली जाते आणि म्हणूनच त्यांचा कविकुळाचे गुरू अर्थात कविकुलगुरू असा उल्लेख करतात.
असं म्हणतात की माळव्यातील उज्जैन नगरीचा राजा भोज यांच्या पदरी तत्कालीन मानवी नवरत्नांचं भाण्डार होतं. त्यातील एक होते राजकवि कालिदास. संस्कृत साहित्यातील प्रचलित परंपरेनुसार कालिदासांनी आपल्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही पण साहित्यकृतींमधून कालनिश्चिती करण्याच्या पद्धतीनुसार आणि त्यांच्या विषयी इतरत्र उपलब्ध उल्लेखांद्वारे त्यांचा काळ साधारणतः इ.स. पहिलं शतक मानतात.
कवीने स्वतःबद्दल काहीच न सांगितल्याने कालिदासांसंबंधी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत नि त्या त्यांच्या गुणांना साजेशाच आहेत.
कालिदासांबद्दल पुढील श्लोक प्रसिद्ध आहे.
पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे
कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः|
अद्यापि तत्तुल्यकवेरभावात्
अनामिका सार्थवती बभूव||
अर्थ - पूर्वी कवींची गणना करत असताना कालिदासांना करंगळीवर पहिले म्हणून गणले गेले. त्यांच्या तोडीचा दुसरा कवी न सापडल्यामुळेच करंगळीशेजारच्या बोटाने स्वतःचं ‘अनामिका’ हे नाव सार्थ केलं.
कालिदासांनी ‘रघुवंशम्’ आणि ‘कुमारसंभवम्’ ही महाकाव्ये, ‘मेघदूतम्’ आणि ‘ऋतुसंहारम्’ ही खण्डकाव्ये आणि ‘अभिज्ज्ञानशाकुन्तलम्’, ‘विक्रमोर्वशीयम्’ आणि ‘मालविकाग्निमित्रम्’ ही नाटके लिहिली.
कालिदासांनी आपल्या साहित्यात उपमा अलंकाराच्या प्रयोगाला आपला हातखंडा बनवला होता. उपमेच्या माध्यमातूनच त्यांच्या प्रतिभेची झेप आपण सहज पाहू शकतो. रघुवंशात दिलीप-इन्दुमतिंच्या लग्नप्रसंगी इन्दुमतिला दिलेली ज्वाळेची दीपशीखेची उपमा लोकांना इतकी भावली की त्यांनी कालिदासांनाच ‘दीपशिखाकालिदास’ असं संबोधन दिलं.
कालिदासांच्या ‘मेघदूतम्’ या खण्डकाव्यात त्यांनी आषाढातील पहिल्या दिवशी यक्षाने पाहिलेल्या क्रीडा करणा-या अजस्र, मत्त हत्तीसारख्या आकाराच्या पावसाळी ढगाचे वर्णन केले आहे. मेघदूतामध्ये, आपल्या पत्नीच्या विरहाने व्याकूळ झालेल्या यक्षाने या मेघगजालाच आपला दूत बनवून स्वतःची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी आपल्या पत्नीकडे धाडलेला आहे. ही कल्पना संस्कृत साहित्यात पुढे इतकी वाखाणली गेली की यात वर्णन केलेला आषाढाचा पहिला दिवस हा ‘कालिदास दिन’ म्हणूनच साजरा होऊ लागला.
आजच्या आषाढ शुद्ध प्रतिपदेला, आषाढाच्या पहिल्या दिवशी, कविकुलगुरू कालिदासांना आमचा मानाचा मुजरा!