...असा झाला वडापावचा जन्म !!
मुंबईतून आलेल्या अनेक यशस्वी माणसांच्या तोंडी एक वाक्य हमखास ऐकायला मिळतं. ते म्हणजे ‘मी वडापाव खाऊन दिवस काढलेत’. आजही गरिबांचा ‘बर्गर’ म्हणून वडापाव कडे बघितलं जातं. आत बटाट्याची भाजी, वरून बेसनचा लेप आणि मध्यभागातून कापलेला एक पाव हे एवढं खाल्लं की पुढच्या कित्येक तासांची भूक मिटते. मुंबईचा हा वडापाव मुंबई एवढाच फेमस आहे. मंडळी आज आम्ही एका अशा माणसाशी तुमची ओळख करून देणार आहोत ज्याने या मुंबईच्या वडापावला जन्म दिला. या व्यक्तीच्या सुपीक डोक्यातून आजचा वडापाव तयार झालेला आहे.
चला तर जाणून घेऊ, कोण आहे हा माणूस?
१९६६ साली जन्माला आलेला पहिला वडापाव !
दादर स्टेशनजवळच्या एका चाळीमध्ये राहणाऱ्या अशोक वैद्य यांनी आपलं वडे आणि पोहे विकण्याचं दुकान १९६०च्या दरम्यान सुरु केलं. आसपासच्या दुकानातही असेच काही खाण्याचे पदार्थ मिळत होते. १९६६ च्या दरम्यान अशोक वैद्य यांना एक आयडिया सुचली. ही आयडिया एकदम साधी सोप्पी होती. एका पाव आणि त्याच्या मध्यभागी बटाट्यापासून तयार केलेल्या वड्याला ठेवायचं, एवढंच !! बटाटा आणि वडा यांची ही जोडी काहीच दिवसात एवढी गाजली की इतरांनी त्याची कॉपी करायला सुरुवात केली. इथूनच मुंबईत वडापावचा जन्म झाला जो पुढची अनेक वर्ष मुंबईकरांच्या आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळणार होता.
१९९८ साली अशोक वैद्य निवर्तले. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा नरेंद्र आणि त्यांचे कुटुंबीय मिळून हा वारसा पुढे नेत आहेत. वडापावचा जन्माचं ठिकाण आजही अगदी तसंच आहे, जसं १९६६ साली होतं. अशोक यांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीने शिक्षणाबरोबर दुकानही सांभाळलं.
चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण हे जसं आपल्याला माहित असतं, तसंच वडापाव बनवणारा पहिला माणूस कोण हे देखील माहित असलं पाहिजे. बरोबर ना मंडळी ?