computer

न्यूग्रेंज: इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षाही जुन्या असलेल्या जगातील सर्वात जुन्या स्मारकांपैकी एक !!

भारतात अनेक प्राचीन जागतिक वारसा लाभलेली पर्यटन स्थळे आहेत. अनेक गड, किल्ले, महाल, गुहा, लेणी तर अनेक वर्षे जुनी आहेत. ज्यांचे संवर्धन झाले आहे अश्या प्राचीन जागा किंवा स्मारकं पाहायला उत्सुकता सगळ्यांच्या मनात असतेच. पण तुम्हाला जगातील सर्वात जुने स्मारक माहिती आहे का?

न्यूग्रेंज हे जगातले सर्वांत जुन्या स्मारकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे इजिप्त येथील गिझाच्या पिरॅमिडपेक्षाही जुने आहे. बसला ना धक्का? पण हे खरे आहे.

आज या लेखाद्वारे भेट देऊयात आयर्लंडमधील जागतिक वारसा लाभलेले न्यूग्रेंज या स्मारकाला आणि पाहुयात इथले वैशिष्ट्य काय आहे.

आपल्या  महाराष्ट्रात जसे अजिंठा-वेरूळ लेणी आणि आताच कास पठार यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून समाविष्ट झाले आहे. तसेच न्यूग्रेंज हेही सर्वात प्राचीन जागतिक वारसा म्हणून यादीत आहे. जागतिक वारसा म्हणजे इतिहासातल्या या प्राचीन जागा जतन केल्या जाव्यात म्हणून करण्यात येणारे प्रयत्न. येणाऱ्या अनेक पिढ्या हे पाहू  शकतील,अभ्यास करू शकतील या कारणांमुळे त्यांचे संवर्धन केले जाते.

आयर्लंडच्या पूर्वेकडील प्राचीन बॉय्न व्हॅलीमध्ये आहे. न्यूग्रेंजचा भूतकाळ खणून काढला तर तो ५,२०० वर्ष जुना आहे. खरेतर हे एक थडगेच आहे.

न्यूग्रेंज हे सुमारे १ एकर जागेत बांधलेले एक अष्मयुगीन (नियोलिथिक) स्मारक आहे.  याचा आकार घुमटासारखा आहे. जो ८५ मीटर (२७९ फूट) व्यासाचा आणि १३ मीटर (४३ फूट) उंच आहे. न्यूग्रेंजभोवती ९७मोठे दगड आहेत ज्यांना केर्बस्टोन म्हणतात. त्यापैकी काही मेगालिथिक आर्टसह कोरलेले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनी न्यूग्रेंजला थडगं म्हणून वर्गीकरण केले आहे. परंतु हे फक्त थडगं नाही तर प्राचीन मंदिर म्हणून अधिक ओळखले जाते. तसेच हे एक ज्योतिषशास्त्रीय, धार्मिक महत्त्व असलेले एक स्थानही आहे.

हे पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. हे बांधायला साधारण ३० वर्ष लागली असावीत असे अभ्यासक म्हणतात. तिथल्या शेतकऱ्यांनी मिळून हे बांधलेलं आहे. तीनशे जणांनी  सुमारे २००,००० टन साहित्य वापरून हे उभे केले आहे. त्याकाळी धातू उपलब्ध नसल्याने सगळी अवजारे दगड, लाकूड व प्राण्यांच्या हाडापासून बनवली गेली होती.

१६९९ मध्ये न्यूग्रेंजचा नव्याने शोध लावला गेला. तिथल्या जमीनदार चार्ल्स कैंपबेल ला काही मोठ्या खडकांची गरज होती म्हणून त्याने त्याच्या मजुरांना दूरवर जाऊन मोठे दगड आणायला सांगितले. जेव्हा मजुरांनी इथले दगड हलवले तेव्हा इथले प्रवेशद्वार उघडले गेले. हा मोठा खडक प्रवेशद्वारावर बसवलेला आहे. तो २१ डिसेंबरला बाजूला केला जातो. १९ मीटर म्हणजे ६२ फूटाचा एक रस्ता याच्या एका चेंबरमध्ये जातो. या स्मारकाच्या पायथ्याभोवती ग्रॅनाइट आणि क्वातर्ज (quartz) प्रकारातील २९ दगड तटबंदीसाठी बसवलेले आहेत. तर प्रवेशाद्वारावर अतिशय सुंदर मेगालिथिक चिन्हे आणि स्वर्ल्स (swirls) ने सजवलेले आहे.

दरवर्षी येथे हिवाळ्यात सर्यकिरणांचा एक अद्भुत महोत्सव बघायला मिळतो. हे बघण्यासाठी अनेक पर्यटक इथे गर्दी करतात. बॉयने नदीच्या उत्तरेकडे न्युग्रेंज आहे. इथे जाताना पर्यटक पादचारी पुलावरून नदी ओलांडतात आणि न्यूग्रेंजला शटल बसने जातात. न्यूग्रेन्जला रस्त्याद्वारे म्हणजे स्वतःच्या गाडीने थेट प्रवेश दिला जात नाही.

सुर्यकिरणांचा सोहळा म्हणजे काय?

जसा जसा सूर्य वर येतो तसा प्रवेशद्वाराच्या छतावरून सूर्यकिरणे आतल्या कक्षात प्रवेश करतात. आणि तिथल्या जमिनीवरून परावर्तित होऊन आतल्या भागात सगळीकडे प्रकाशमान होतात. हा सोहळा १७ मिनिट चालतो. १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर रोजी पहाटेच्या वेळी सूर्यकिरण आत शिरून सगळे कक्ष प्रकाशमान करतात. २१ डिसेंबरच्या म्हणजे वर्षाचा सगळ्यात लहान दिवस असतो. त्या दिवशी हा सोहळा पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते.

१८८२ साली हे स्मारक प्राचीन स्मारक संरक्षण अधिनियमांतर्गत ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडच्या सरकारच्या देखरेखीखाली हस्तांतरित करण्यात आले. हे जगातील सर्वात प्रसिद्ध नियोलिथिक थडग्यांपैकी एक आहे.

असे म्हणतात की हे एक आयरिश राजासाठी बांधले गेले आहे. आयर्लंडच्या तूता डी दानन राजाच्या कारकिर्दीत हे स्मारक बांधले गेले. हे स्मारक आयर्लंडमध्ये सर्वाधिक भेट दिले जाणारे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी जवळपास २,००,००० पर्यटक इथे भेट देत असतात. लॉटरी पद्धतीने सोहळा बघू इच्छिणाऱ्यांची निवड केली जाते. जे निवडले जातात ते नशीबवान मानले जातात.

आर्कियो म्हणजे खगोलशास्त्री फ्रैंक प्रेंडरगैस्टनुसार इथले दगड हे कॅलेंडर प्रमाणे काम करतात. त्यावर पडणाऱ्या प्रतिबिंबानूसार दिवसाची वेळ, महिना, ऋतू ओळखले जाऊ शकते. खरच अशी प्राचीन स्मारके पाहिल्यावर किंवा त्यांच्याबद्दल वाचल्यावर थक्क व्हायला होते ना? फोटो पाहून तुम्हाला या सुंदर रचनेची कल्पना येईलच.

तुम्हीही भारतातल्या अश्या कुठल्या जागी जाऊन आला असाल तर नक्की कमेंटमधून सांगा. ही माहिती शेयर करायला विसरू नका. कारण चांगल्या माहितीचा बोभाटा तर व्हायलाच पाहिजे.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required