भारताच्या भूभागावर जपानचीही सत्ता होती ??
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमुळे ‘अंदमान-निकोबार बेटे’ हे आपल्या सर्वांच्याच स्मृतीत आहेत. भारतातील आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्य सैनिकांना तसेच इतर कैद्यांना आपल्या देशापासून दूर या बेटावर डांबून ठेवत. त्यामुळे अंदमान म्हटलं की लोकांमध्ये त्याकाळात दहशत होती. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे बेट स्वतंत्र भारतात सामील झाले.
संपूर्ण भारतावर ब्रिटीश राजवट असताना अंदमान आणि निकोबार हे एकमेव असे द्वीप आहे जिथे जपानने राज्य केलं होतं. सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या ‘आझाद हिंद सैन्याला मदत केल्याबद्दल आपल्या मनात जपानबद्दल चांगली ‘इमेज’ आहे. पण गुलामी ब्रिटीशांची असो वा जपान्यांची, ती क्रूरच होती याची साक्ष आजही अंदमान – निकोबार देत आहे.
२३ मार्च १९४२ : जपानने केलेला हल्ला
जागतिक युध्द १९३९ ते १९४५ पर्यंत चाललं. १९४१ साली जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला करून या युद्धात उडी घेतली. यानंतर २३ मार्च १९४२ रोजी, जेव्हा युद्ध आपल्या शिखरावर होते, त्यावेळी जपानने अंदमानवर हल्ला करून ब्रिटिशांना तिथून उधळून लावले आणि तिथं आपली सत्ता स्थापन केली. यावेळी जे युद्ध कैदी हाती लागले त्यांची रवानगी सिंगापूरला करण्यात आली.
ब्रिटीश गेले आणि जपानी आले, पण परिस्थिती ‘जैसे थी’ तशीच राहिली. जपानी राजवटीत स्थानिक लोकांना सक्त मजुरी करायला लागली, काहींना ब्रिटिशांचे हेर असल्याच्या आरोपावरून पकडण्यात आले आणि तुरुंगात त्यांच्यावर असंख्य अत्याचार झाले. तसेच तिथल्या स्त्रियांवर बलात्कार सारखे प्रसंग ओढवले. कुपोषण, महायुद्धाच्या दरम्यान झालेले बॉम्ब हल्ले, महामारी, या सर्वांमध्ये हजारो लोक मारले गेले. १९४४ साली हांफ्रीगंज येथे ४४ लोकांना एक साथ गोळ्या घालण्यात आल्या. त्यांनतर त्या ४४ लोकांना एकाच खड्ड्यात कोंबून पुरण्यात आल्याचे इतिहासात नमूद आहे.
या दरम्यान ‘सुभाष चंद्र बोस’ १९४३ मध्ये अंदमान यथे आले, पोर्ट ब्लेअर येथे त्यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला, अंदमान आणि निकोबार चं नाव ‘शहीद द्वीप’ आणि ‘स्वराज द्वीप’ ठेवलं. ही संधी साधून तिथल्या जनतेने त्यांच्यावरच्या अत्याचारांबद्दल सुभाष चंद्र यांना सांगितलं पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं जातं. यामुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांच्याबद्दल राग वाढत गेला.
(माहिती स्रोत)
सप्टेंबर १९४५ साली महायुद्धाच्या समाप्तीनंतर ऑक्टोबर महिन्यात अंदमान पुन्हा ब्रिटिशांच्या हाती लागले आणि जपानला माघार घ्यावी लागली. ३ वर्षांच्या जपानी राजवटीच्या खुणा आजही आपण पोर्ट ब्लेअरच्या भागात दिसून येतात. युद्धात बॉम्ब हल्ल्यापासून वाचण्यासाठी तिथे बंकर तयार करण्यात आले होते. हे बंकर आपण आजही अंदमान मध्ये पाहू शकतो.