भाग १ : गँग्ज ऑफ पालणपूर: बँकांना ७००० कोटींचा चुना लावून भारताबाहेर पळून गेलेला जतीन मेहता!!
येत्या २ सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी चॅनेलवर “Bad Boy Billionaires: India” ही डॉक्युमेंटरी रिलीज होणार आहे. ही डॉक्युमेंटरी भारतातल्या चार घोटाळेबाजांवर आधारलेली आहे. हे चार घोटाळेबाज म्हणजे 'किंगफिशर' मल्ल्या, 'सहाराश्री' सुब्रता रॉय, 'सत्यम' राजू आणि 'हिरो हिरालाल' नीरव मोदी!
ही डॉक्युमेंटरी रिलीज होण्यापूर्वीच दिल्लीच्या कोर्टात नीरव मोदीच्या मामाने नेटफ्लिक्सच्या विरोधात एक हरकत दाखल केली. आता हे मामाश्री म्हणजे मेहुल चोक्सी! हे गृहस्थ पण सध्या देशाबाहेर पळून गेलेले आहेत. त्यांचा आग्रह होता की माझ्याबद्दल या डॉक्युमेंटरीत काहीतरी आहे म्हणून आधी मला ते दाखवा. पण कोर्टाने या हरकतीला फेटाळून लावल्यामुळे प्रेक्षकांना डॉक्युमेंटरी वेळीच बघायला मिळेलच. पण या घोटाळेबाजांच्या यादीत एका आद्य घोटाळेबाजाचे नावच दिसत नाही. तो घोटाळेबाज म्हणजे विनसम डायमंड - सु-राज डायमंड आणि अशा अनेक डायमंड कंपन्यांचा मालक जतीन मेहता!
भारतातल्या बँकांना ७००० कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेला जतीन मेहता!
तो कुठे पळून गेला हे माहिती असूनही सीबीआय ज्याला भारतात आणण्यासाठी आजही असमर्थ ठरली आहे तो जतीन मेहता!
इंटरपोलने रेड कॉर्नर -ब्ल्यू कॉर्नर नोटीसा लावूनही हाती न लागलेला जतीन मेहता!
मुकेश अंबानींच्या बहीणीच्या मुलीचा मोठा दीर म्हणजे जतीन मेहता!
उद्योगपती गौतम अदाणीच्या पुतणीशी ज्याच्या मुलाचं लग्न झालंय तो जतीन मेहता!
तर अशा या घोटाळेबहाद्दूराचं नाव खरं म्हणजे आधी घ्यायला हवं होतं, पण ते अजून तरी न दिसल्याने आम्हीच या आद्य घोटाळेबाजाची कथा तुम्हाला उलगडून सांगणार आहोत. पण जतीन मेहताविषयी आणखी जाणून घेण्याआधी भारतातला हिरे बाजार आणि त्याचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन जाणून घेऊ या!
शाळेत शिकलेलं रसायनशास्त्र आठवत असेल, तर कोळसा म्हणजे कार्बन आणि हिरा म्हणजे पण कार्बनच! कोळशाच्या खाणींवर आधारीत चित्रपट गँग्ज ऑफ वासेपूरही तुम्हाला आठवतच असेल. तसाच हिर्यांवर आधारीत चित्रपट बनवायचा म्हटला तर त्याला 'गँग्ज ऑफ पालणपूर' हे नाव द्यावं लागेल. फरक इतकाच असेल की 'गँग्ज ऑफ पालनपूर'च्या कथेत रक्ताचा एकही थेंब सांडलेला तुम्हाला दिसणार नाही.
पालणपूर हे गुजराथमधील एक छोटे गाव आहे. या गावातील बहुसंख्य वस्ती जैन धर्मीयांची आहे. भारतातील हिर्यांचा बहुतांश व्यापार या पालणपूरी जैनांच्या हातात आहे. शतकानुशतके या लोकांनी हिर्यांचा व्यापार सांभाळला आहे. धार्मिक बंधनामुळे हा समाज कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेला नाही. अत्यंत काटकसरी स्वभावामुळे त्यांच्याकडे भांडवलाची कमतरता नाही. मुंबईत स्थायिक झालेला हा समाज बरीच वर्षे अतिशय 'लो प्रोफाईल' म्हणजे पैशाचा झगमगाट न करता व्यवसायातच गुंतलेला होता.
हिर्याचे अॅसॉर्टमेंट आणि पैलू पाडणे (घिसाई) यावर त्यांची मोनोपली म्हणजेच एकाधिकार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ही परिस्थिती बदलली. बर्याचशा कुटुंबातील एकतरी सदस्य मुंबई सोडून अँटवर्प म्हणजे बेल्जीयमच्या आंतराष्ट्रीय बाजारात गेला. हिरे आफ्रिकेच्या खाणीत मिळत असले तरी त्या खाणींची मालकी डी बीअर्स सारख्या युरोपीयन कंपन्यांकडे असल्याने हिर्यांचा बाजार अँटवर्पला-बेल्जियमलाआहे. अँटवर्पला गेलेल्या पालणपूरीयांनी त्या बाजारात कच्चे हिरे विकत घेऊन भारतात घिसाईला पाठवायला सुरुवात केली. इथे पैलू पाडून झाले की तेच हिरे पुन्हा विक्रीसाठी अँटवर्पला पाठवले जायचे. उत्कृष्ट दर्जा आणि प्रामाणिकपणा या दोन गुणांवर ही बाजारपेठ त्यांनी काबीज केली.
इकडे भारतात याच वेळी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. डॉलरचे उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारने एक्स्पोर्ट म्हणजेच निर्यात वाढवण्यास अनेक सवलती दिल्या. पालणपूरीयांचा हिर्याचा व्यापार १०० टक्के एक्स्पोर्ट झाल्याने आयकरावर सूट मिळायला लागली. कच्चे हिरे आणून तेच परदेशी पाठवल्यावर कस्टम ड्यूटी तर माफ झालीच आणि सोबत एक्स्पोर्टचे इतर फायदेही मिळायला सुरुवात झाली. पुढच्या चाळीस वर्षांत हा पालणपूरी समाज अति-अति श्रीमंत वर्गात मोडायला लागला. आधीच सांगीतल्याप्रमाणे निर्व्यसनी आणि काटकसरी असल्याने 'हिरा म्हणजे पालणपूरी जैन' हे समीकरण तयार झाले.
अशा चोख व्यवहाराचा वारसा मिळाल्याने मुंबई आणि आंतरराष्ट्रीय बँकामध्ये हिर्याच्या पालणपूरी व्यापार्यांना खास पत होती. नंतरच्या काळात सिप्झ म्हणजे मुंबईत सांताक्रूझ एक्स्पोर्ट प्रोसेसींग झोनमध्ये हिर्यांना पैलू पाडणे, हिर्यांचे दागिने बनवून ते परदेशी पाठवणे हा उद्योग जोरात सुरु झाला. मुंबईप्रमाणेच सुरत हे दुसरे व्यापारी क्षेत्रही जोरात सुरु झाले. आंतरराष्ट्रीय व्यवसाय करण्यासाठी त्यावेळी एबीएन अॅम्रो नावाची बँक होती. ही बँक या व्यापार्यांना भरपूर कर्ज, माल पाठवला की लगेच क्रेडीट अशा सुविधा द्यायची. त्या बँकेची प्रगती बघून स्थानिक सरकारी बँकांनी पण या व्यापार्यांना कर्ज, लेटर ऑफ क्रेडीट, पॅकींग क्रेडीट द्यायला सुरुवात केली. पण हिर्यांच्या व्यापारात नवे पाऊल टाकले असल्याने त्यांच्या क्रेडीट लिमिट अपुर्या पडायच्या. बँकांची आपसातली स्पर्धा पण दिवसेंदिवस वाढत गेली. हळूहळू पालणपूरी म्हणजे पैसे बुडत नाहीत हे समजल्यावर बँकाचा 'ड्यू डिलीजन्स' ढिला पडत गेला. हा सर्व काळ नव्या आर्थिक क्षमतांच्या उदयाचा होता. हिरे व्यापारी अजूनही त्यांच्या पारंपारिक व्यवस्थेनेच व्यवहार करत होते.
जतीन मेहताने मात्र नव्याने उदयास आलेला शेअर बाजार- डायमंड मार्केटचा फारसा अनुभव नसलेल्या सरकारी बँका आणि पालणपूरी असल्याचा वारसा या तीन गोष्टींचा पुरेपूर फायदा घेऊन कामाला सुरुवात केली होती.
हे सगळे नेमके कसे केले हे समजण्यासाठी बँकेच्या दोन संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
आधी 'बुलीयन बँक' म्हणजे काय ते समजून घेऊया. बुलीयन या वर्गवारीत सोने चांदी आणि प्लॅटीनम या महागड्या धातूंचा समावेश होतो. भारतातली सोन्याची मागणी लक्षात घेता बुलीयन बँका भारतात मुख्यत्वे सोने विकण्याचे काम करतात. भारतात खाणीतून मिळणारे सोने मागणीच्या प्रमाणात नगण्य आहे. त्यामुळे परदेशातून सोने विकत घेण्यासाठी स्टेट बँकेसारख्या इतर काही राष्ट्रीयकृत बँका ज्वेलरी एक्सपोर्ट करणार्या कंपन्यांना कर्ज देत असतात. या कर्जासाठी योग्य तारणही घेण्यात येते. याखेरीज एम.एम.टी. सी. सारख्या सार्वजनीक क्षेत्रातील कंपन्या पण बुलीयन बँकेसारखे काम करतात.
बर्याचशा परदेशी बँकाही बुलीयन बँक म्हणून काम करतात. यात बँक ऑफ नोव्हा स्कॉटीया, स्टँडर्ड चार्टर्ड बँक अशा अनेक बँका आहेत. या बँका सोन्याचे दर अधिक चांगले देतात, त्यांचे इतर चार्जेस कमी असतात या कारणाने भारतीय व्यापारी त्यांच्याकडून सोने विकत घेतात. या बँका सोने उधारीवर देतात.पण या परदेशी बँका प्रत्यक्ष तारण घेण्यास राजी नसतात. कारण जर एखाद्या कंपनीने वेळेवर पैशाचा भरणा नाही केला तर वसुली करणे त्यांना परवडत नाही. त्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे भारतातील कंपनी किंवा व्यापारी त्यांच्या भारतीय बँकांकडून गॅरंटी घेऊन परदेशी बँकांना देते.. या गॅरंटीला 'स्टँड बाय लेटर ऑफ क्रेडीट'- SBLC-असे म्हटले जाते.
आता एक प्रश्न असा आहे की भारतीय बँका SBLC का देतात?
भारतीय बँका कंपन्यांना दोन प्रकारच्या सुविधा देतात. एक म्हणजे फंड बेस्ड : म्हणजे थेट दिले जाणारे कर्ज. दुसरी सुविधा म्हणजे 'नॉन फंड बेस्ड'. दुसर्या प्रकारात प्रत्यक्ष पुंजी न गुंतवता बँकेतर्फे शाश्वतीचे वचन दिले जाते. या व्यवहारातही बॅ़केला भरपूर चार्जेस मिळतात म्हणून ही सुविधा मोठ्या प्रमाणात दिली जाते.
आता 'बँक कन्सॉर्शीयम' ही दुसरी एक संकल्पना समजून घेऊया.
समजा एखाद्या कंपनीला एखाद्या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज आहे. त्या कंपनीचे खाते ज्या बँकेत आहे ती बँक कंपनीला कर्ज देऊ शकते, पण नेहेमीच्या मर्यादेपेक्षा जास्त पैशाची गरज असेल तर ती बँक इतर बॅकांना सोबत घेऊन कर्ज देते. या प्रस्तावात कंपनीचे खाते ज्या बँकेत आहे ती बँक म्हणजे लीड बँक म्हणून जास्तीतजास्त वाटा उचलते. बाकीच्या बँका त्यांच्या बजेटप्रमाणे वाटा उचलतात.
तर अशा या पारंपारीक पध्दतीने चालत असलेल्या हिर्यांच्या व्यापारात जतीन मेहताला प्रवेश मिळवण्याची खटपट करावी लागली नाही. कारण त्या वेळी काही शहा आणि मोदींचा अपवाद वगळता सगळा बाजारच मेहतांच्या हातात होता. बी.अरुणकुमार (अरुणकुमार मेहता), जयम (मधू मेहता), रोझी ब्लू (दिलीप मेहता) जेमबेल (रश्मि मेहता), ब्यूटीफुल डायमंड्स (किशोर मेहता), आणि सु-राज डायमंड्स (जतीन मेहता) या बाजारातल्या अग्रगण्य कंपन्या होत्या. मुंबईत प्रसाद चेंबर्स - पंचरत्न या दोन इमारतीतून या कंपन्या लंडन, अँटवर्प आणि इस्राएल मधील कंपन्यांना टक्कर देत होत्या. एकेकाळी आंतराष्ट्रीय बाजार ज्यू व्यापार्यांच्या हातात होता. पण आता तो पालणपूरीयांच्या हातात आला होता.
कमी फक्त एकच होती, ती म्हणजे या बाजाराला एका नव्या ओळखीची गरज होती. ती उणीव जतीन मेहताने भरून काढली. जतीन मेहता नव्या पिढीचा चेहेरा म्हणून ओळखला जायचा. एका सुप्रसिध्द आंतरराष्ट्रिय तज्ञाच्या मते यशस्वी डायमेंटेअर म्हणजे हिर्याचा व्यापारी होण्यासाठी माणूस एकाच वेळी चांगला बँकर असावा, चांगला प्रॉडक्शन मॅनेजर हवा, चांगला मार्केटींग करणारा असावा, सोबत माणूस वाचण्याची कला त्याला अवगत असायला हवी. जतीन मेहता या सर्व गुणांनी संपन्न होता. त्याला या फॅमिली बिझनेस संकल्पनेपलीकडे जाऊन हिर्यांचा व्यापार कंपनी बिझनेस बनवायचा होता. आणि यातूनच सु-राज डायमंड कंपनीचा जन्म झाला.
(क्रमशः)
भाग २ : गँग्ज ऑफ पालणपूर: बँकांना ७००० कोटींचा चुना लावून भारताबाहेर पळून गेलेला जतीन मेहता!!