computer

१२व्या वर्षी पहिला गेम आणि १४व्या वर्षीच जगभरातल्या प्रतिष्ठितांच्या यादीत जाऊन बसलेला केसी जॉर्डन! काय आहे याची गोष्ट?

तुम्ही एक निरीक्षण केलंय का? आजकालची लहान मुलं खरोखर खेळण्यांपेक्षा मोबाईलसोबत जास्त वेळ खेळतात. अगदी दोन वर्षाच्या लहान बाळांनाही मोबाईल दिला की ती रडायची थांबतात. चार पाच वर्षाची मुलं तर सहज मोबाईल वापरू शकतात. आज आम्ही जी बातमी घेऊन आलो आहोत ती अशाच एका मुलाची आहे. 

त्याला तुमच्या माझ्या सारखंच गेम खेळायला आवडायचं. पण त्याही पुढे जाऊन त्याला हे गेम्स कसे बनतात ह्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. आणि ह्याच उत्सुकतेपोटी त्याने अवघ्या नवव्या वर्षात स्वतःचा एक मोबाईल गेम तयार केला. जॉर्डन केसि असं त्याच नाव. लहान वयात गेम बनवणारा जॉर्डन डेन्मार्क मधील सर्वात लहान प्रोग्रामर आहे.

तर हे सर्व झालं कसं?

जॉर्डन आयर्लंडमधील वॉटरफोर्ड येथे आपल्या आई वडिलांसोबत राहतो. परिस्थिती अगदीच बेताची असलेल्या घरी त्याचा जन्म झाला. त्याच्या आई वडिलांनी कसाबसा एक कॉम्पुटर त्याच्यासाठी विकत घेतला होता. जॉर्डन सतत कॉम्प्युटरवर काहीतरी करत बसलेला असायचा. बाकी मुलांसारखं गेम वगैरे खेळत असावा असंच त्यांना वाटायचं. पण वस्तुस्थिती अगदीच वेगळी होती.

जॉर्डन नऊ वर्षाचा होता तेव्हापासून त्याला कॉम्पुटरवर गेम्स खेळण्याची आवड निर्माण झाली होती. जे गेम्स तो कॉम्पुटरवर खेळायचा त्या गेम्स विषयी त्याने ब्लॉग लिहायला सुरुवात केली. त्याच्या ब्लॉगला प्रतिसादही चांगला मिळू लागला होता. तेव्हाच त्याच्या डोक्यात स्वतःचा गेम बनवायच्या कल्पनेने जन्म घेतला होता. त्याच्या आई वडिलांना मात्र आपल्या या हुशार मुलाच्या हुषारीची अजिबात माहिती नव्हती.

जॉर्डन मात्र आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी शिकण्यात, समजून घेण्यात व्यस्त होता. ते म्हणतात ना 'आवड असेल तर सवड मिळतेच.' अगदी तसंच झालं. त्याने प्रोग्रामिंगचे एक पुस्तक विकत घेतले. हे पुस्तक घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. परीक्षेत चांगले गुण मिळाले तर पैसे देऊ असे त्याच्या पालकांनी कबूल केले होते. मग काय जॉर्डनने खूप मेहनत घेऊन परीक्षेत चांगले गुण मिळवले. त्या पैश्यातून त्याने प्रोग्रामिंगचे एक पुस्तक विकत घेतले.

अशाप्रकारे युट्यूब वरील व्हिडीओ आणि पुस्तकाच्या मदतीने तो स्वतः कोडींग शिकू लागला. तो नऊ वर्षाचा होता तेव्हाच त्याने क्लब पेंग्विन सारख्या ऑनलाइन गेम्सच्या वेबसाइट्स बनवायला सुरुवात केली होती. जेव्हा तो ११ वर्षाचा होता तेव्हा युट्यूबवर आयर्लंडमधील सर्वाधिक Subscriber असलेला, कमी वयातील तो पहिला व्हिडिओ ब्लॉगर बनला होता.

२०१२ मध्ये त्याने आपला पहिला गेम लॉंच केला. त्या गेमचे नाव होते 'एलियन बॉल'. आयफोन साठी गेम बनवण्याचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. ह्या गेमसाठी लिहाव्या लागणाऱ्या माहितीमध्ये आपण १२ वर्षाचे आहोत हे त्याने नमूद केले होते. 

इतक्या लहान वयाच्या मुलाने हा गेम बनविला आहे ह्या गोष्टीने कंपनीचे प्रामुख्याने लक्ष वेधले. त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. त्याने तयार केलेला गेम चांगला होता पण त्यात थोडे बदल करणे गरजेचे होते. कंपनीने तसे बदल करून हा गेम अँपल स्टोर मध्ये समाविष्ट केला. आणि काय आश्चर्य, हा गेम लोकांना खूपच आवडला. त्यात इतक्या लहान वयाच्या मुलाने गेम बनवला हे एक कौतुक वेगळेच होते. केसी इतक्यावरच थांबला नाही त्यानंतर त्याने अनेक अँप्स, गेम्स बनवले. ज्यात एलियन बॉल ह्या गेमच्या सिक्वल गेम्सचाही समावेश होता. 

लोकांना त्याचे गेम्स आवडतच होते. आणि आता त्याची स्वतःची कंपनी सुरु करण्याची वेळ आली होती. जानेवारी २०१२ मध्ये त्यांनी 'केसी गेम्स' ह्या कंपनीची सुरुवात केली. वयाने लहान असल्या कारणाने त्याला त्याच्या आई वडिलांना पार्टनर करावे लागले होते.

आता जॉर्डन एक प्रोग्रामर, उद्योजक आणि स्वतंत्र गेम स्टुडिओचा संस्थापक आहे. त्याच्या केसी गेम्स ह्या कंपनीने ग्रीनबॉय टच, सेव्ह द डे, फूड वल्ड असे काही गेम्स बनवले आहेत. 
१३ वर्षाचा असल्यापासून जॉर्डन शाळा आणि स्वतःची कंपनी सांभाळणे अशी दोन्ही कामे करत होता. मग ह्या सर्व धावपळीमध्ये त्याची शाळा बऱ्याचवेळा चुकायची. शाळेत बाई हजेरी घेण्यासाठी, परीक्षेचे निकाल, विद्यार्थ्यांची माहिती आणि इतर बऱ्याच कामासाठी वहीचा वापर करायच्या. एकदा त्यांची ती वहीच हरवली. केसी ने ह्यावर उपाय म्हणून TeachWare हे अँप बनवले. ह्या अँपमध्ये सर्व विद्यार्थी आणि त्यांची सर्व माहिती सुरक्षित आणि एका जागी ठेवण्यास बरीच मोठी मदत झाली.

जॉर्डनची कंपनी केसी गेम्सने आयर्लंडमधील मुलांना कोडिंग शिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी बरेच प्रकल्प तयार केले आहेत. 

किड्स टेक अवॉर्ड्स त्यापैकीच एक. मार्च २०१२ मध्ये, केसीने मुलांसाठी Technical Awards ची घोषणा केली. हे पुरस्कार देण्यामागचा हेतू खूपच आधुनिक असा होता. लहान मुलांच्या कल्पनेला गेमिंग, वेबसाइट्स, ब्लॉग्स इ. गोष्टीमधून कोडींग शिकण्यास प्रोत्साहन मिळावे असे त्याचे मत होते.

जॉर्डनला जगभरातील प्रतिष्ठित परिषदांमध्ये बोलण्यात येते. लहान वयात इतकं मोठं यश मिळवणाऱ्या जॉर्डनच्या केसी गेम्स ह्या कंपनीला इतर बऱ्याच मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी पाठिंबा दिला आहे. त्याच्या आईवडिलांना एकेकाळी वाटायचे की त्यांचा मुलगा फक्त कॉम्पुटरवर गेम खेळण्यात वेळ घालवतो. तेच आज अभिमानाने आपल्या मुलाचे कौतुक करतात. आजकालच्या मुलांसाठी जॉर्डनने मिळवलेले हे यश नक्कीच आदर्शवत आहे.

मित्रांनो ह्या लहानग्या प्रोग्रामरची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

 

लेखिका: स्नेहल बंडगर

सबस्क्राईब करा

* indicates required