सर्वात मजबूत आणि टिकाऊ कुलूपं तयार करणारे शहर...वाचा दिंडीगुल लॉक्सबद्दल!!
घराला सुरक्षित करण्यासाठी कुलूपं ही सगळ्यात महत्त्वाची असतात. घराबाहेर पडताना दाराला कुलूप घालणं आणि दोन वेळा ते ओढून बघणं ही सवय अगदी सगळ्यांनाच असते. आता 'लॅच लॉक्स'चा जमाना आहे पण पारंपरिक कुलूपं आणि किल्ली घरात नाही असं होत नाही. अगदी बॅगेला लावणारे छोटेसे कुलूप ते मोठमोठ्या दारांना लागणारे मोठे टाळे असो कुलूप आणि किल्लीला पर्याय नाही. वर्षांनुवर्षे टिकणारी पितळी कुलूपं किंवा लोखंडी कुलूपं इतकी मजबूत असतात की एकदा लावलं की निर्धास्त! 'गोदरेज कंपनीचं 'नवताल' हे कुलूपाचं आयकॉन समजलं जातं. कुलूपं बनतात कशी, कुठे बनवली जातात? असं विचारलं तर पहिलं उत्तर येतं 'अलीगढ'मध्ये ! अगदी बरोबर आहे. संपूर्ण भारतात अलीगढची कुलूपं वापरली जातात. पण अलीगढची कुलूपं ही कोणीही बनवू शकतो. तो एक 'आम' आयटम आहे. पण भारतात 'खास' कुलूपांची अशी एक खास 'लॉक सिटी' पण आहे, हे तुम्हाला माहिती आहे काय? चला, आज करूयात या 'लॉक सिटी'ची सफर.
तामिळनाडूच्या दिंडीगुल शहराला 'लॉक सिटी' म्हणून ओळखले जाते. दिंडीगुलची कुलूपे आकर्षक डिझाइन आणि सर्वोत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखली जातात. २०१९ मध्ये दिंडीगुल कुलूपांना जीआय टॅग दिले गेले आहे. असे टॅग मिळणारे हे भारतातले पहिलेच कुलूप आहे. दिंडीगुल कुलूपांचा उपयोग रेल्वे, कारागृह, कोषागार, धरणे, गोदामे व महत्त्वाची कार्यालये तसेच मंदिरे व धार्मिक संस्थांसाठी केला जातो. असे म्हणतात याची किल्ली हरवली तर ही कुलूपं उघडताच येत नाहीत. मोठ्या हत्याराने तोडल्याशिवाय ही उघडत नाहीत.
दिंडीगुल कुलूपांचा इतिहासही रंजक आहे. दिंडीगुलच्या ४०० वर्षे जुन्या मलाई कोट्टाई या किल्ल्याच्या दरवाजावर याच प्रकारचे कुलूप आहे. तिथल्या जुन्या ऐतिहासिक वास्तूवर हेच कुलूप आढळून येते. हे कुलूप हाताने बनवले जाते. हाताने तयार केलेले दिडीगुल कुलूप सर्वात सुरक्षित मानले जाते. विशेष म्हणजे कुलूप बनवण्याची पद्धत फक्त मालक आणि कारागिरांनाच माहिती असते. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या कुलूपांना बनावटी किल्लीने उघडता येत नाही.
दिंडीगुल मध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले लोह म्हणजे लोखंड हेसुद्धा इथे कुलूपांचा उद्योगाला चालना देण्यास कारणीभूत आहे. हा उद्योग प्रथम शंकरलिंगचारी ब्रदर्स यांनी १९३०मध्ये सुरू केला होता. त्या दशकात आंब्याच्या आकाराचे लॉक (मांगा पोट्टू), ड्रॉवर लॉक आणि स्क्वेअर लॉक बनविण्यात यायचे. त्यात काही कुलूपाना उघडताना सुमधुर किणकिण ऐकू यायची, काही कुलूपं किल्ली विशिष्ट पद्धतीने फिरवल्यासच उघडतात. बर्याच कुलूपांना दोन किल्ल्या असतात. एक किल्ली बंद करण्यासाठी तर दुसरी कुलूप उघडण्यासाठी. ही सर्व कुलूपं हाताने बनवलेली आहेत. नव्या परिभाषेत सांगायचं तर 'दिंडीगुल लॉक्स' डिझायनर कुलूप आहे.
ही कुलूपे बनविण्याकरिता लागणारा कच्चा माल म्हणजे लोखंडी पत्रे, पितळ पत्रे, कोऱ्या चाव्या, आणि रॉड. उत्तर प्रदेशातील अलिगड व तिरुपूर व मदुराई येथुन पत्रे, लीव्हर आणि किल्ल्या येतात. त्यानंतर कारागीर कौशल्याने मोल्डिंग, वेल्डिंग करून प्रत्येक कुलूप बनवतात. यातली बरीचशी कुलूपं लोह, पितळ किंवा स्टीलची आहेत. सर्वात लहान कुलूप तयार होण्यास सुमारे तीन तास लागतात, तर सर्वात मोठे कुलूप बनवण्यासाठी काही आठवडेही लागू शकतात. कुलपाचे वजन काही ग्रॅम पासून दोन किलोपर्यंत असते. या कुलूपांची निर्मिती नागल नगर, नल्लापट्टी, कुडाई पाराईपट्टी, यागपानपट्टी आणि कमलापट्टी या भागांत केली जाते.
ही कुलूपं मशीन वर बनणाऱ्या कुलूपांपेक्षा खूप महाग आहेत. तसेच ही बनवण्यासाठी खूप कष्ट आणि वेळ लागतो त्यामुळे आता कारागीर कमी आहेत. एका नोंदीनुसार १९८०च्या दशकात यामध्ये १८०० हून अधिक कारागीर काम करत होते, पण आता त्यांची संख्या शंभराहूनही कमी झाली आहे.
दिंडीगुल कुलूपांची मागणी खूप आहे पण ती पूर्ण करण्यासाठी कुमक कमी पडत आहे. भारतातल्या या कारागिरीला नवसंजीवनी द्यायची गरज आहे. येत्या काळात ही मिळेल की ही हाताने बनवलेली कुलूपं फक्त इतिहास बनून राहतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लेखिका: शीतल दरंदळे