computer

'पर्सनल लोन' घेताय? पण कर्ज घेण्याआधी योजनेतले धोके जाणून घेतले आहेत का?

गेले सहा महिने आपण सगळेच आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलो आहोत. काही नोकरदारांचे पगार कमी झालेत तर काहींच्या नोकर्‍या गेल्या आहेत. काहींचे व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत. एकूणच पैशाची चणचण अधिकच जाणवायला लागली आहे.

अशा वेळी तुम्हाला फोन आला, " सर, मै अमित, इंडियन कमर्शिअल बँक से बात कर रहा हूं, क्या आपको इस समय लोन की जरूरत है" तर तुम्ही काय कराल?

येत्या सहा महिन्याच्या गरजा डोळ्यासमोर उभ्या राहून, आताच लोन घेतलेले बरे या विचाराने तुम्ही संभाषण चालूच ठेवाल, नाही का? आता कर्ज म्हणजे व्याजाची विचारणा आधीच केलेली बरी या उद्देशाने तुमचा उत्स्फूर्त प्रश्न असेल, "ब्याज कितना है आपके लोनका?"

"सर, आपके लिये मै खास फिक्स रेटवाली लोन स्किम बताता हूं."

आता इथे तुमच्या आयुष्यातले 'कर्ज' नावाचे नाटक सुरु झाले असे समजा.अमितचा फोन म्हणजे त्यातला पहिला प्रवेश!

आता या संभाषणात काय खास आहे असे वाटेल. पण ही खास 'फिक्स रेटवाली लोन स्किम' म्हणजे एक खास ट्रॅप आहे हे अडकल्यावरच कळेल. म्हणूनच आज आपण कर्ज घेण्याच्या योजनेतले खाचखळगे जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी फिक्स्ड रेट आणि फ्लोटींग रेट या दोन्हीत काय फरक आहे ते जाणून घ्या.

रिझर्व्ह बँकेच्या पत धोरणाप्रमाणे व्याजाचे दर कमी जास्त होत असतात. पत धोरणात जाहिर केलेल्या दराप्रमाणे बँकेचा कर्जावर व्याज आकारण्याचा दर अवलंबून असतो. या दराला एमसीएलआर (Marginal Cost of Fund Based Lending Rate)असे म्हटले जाते. जर तुम्ही कर्ज फ्लोटींग रेटने घेतले असेल तर नव्या एमसीएलआर प्रमाणे तुमचा कर्जाचा मासिक हप्ता बदलत राहील.

या उलट जर तुम्ही फिक्स्ड रेटने कर्ज घेतले असेल तर 'एमसीएलआर' कसाही बदलला तरी तुमचा मासिक परतफेडीचा हप्ता आहे तसाच राहील.

आता तुम्हाला ज्या अमितने फोन केला आहे, तो तर म्हणतो आहे खास फिक्स्ड रेटवाली स्किम है? तर या स्किममध्ये जे 'खास' आहे त्याचा फायदा अमितला म्हणजे त्याच्या बॅकेला आहे, तुम्हांला नाही हे आता समजून घेऊ या!

कर्ज घेतल्यावर तुम्ही नियमित मासिक हप्ता भरणारच नाही का? हा हप्ता भरल्यानंतर दर महिन्याला तुमच्या कर्जाची रक्कम कमी होणार. पण फिक्स्ड रेटवाल्या कर्जात एकदा मासिक हप्ता पक्का झाला की तो कर्जाची मुदत संपेपर्यंत बदलत नाही. याचाच अर्थ घटत जाणार्‍या कर्जाच्या रकमेचा फायदा तुम्हाला मिळत नाही. आता हेच उदाहरण आपण व्याजाच्या दराचा आकडा गृहीत धरून समजून घेऊया!

समजा फिक्स्ड इंटरेस्ट रेट ९ टक्के आहे, तर प्रत्यक्षात तो १५.७ % इतका असतो. फक्त दर महिन्याचा हप्ता (इ.एम.आय) एकसारखा असल्याने त्याची झळ जाणवत नाही. थोडक्यात ९% फक्त तोंडदेखला दर असतो, प्रत्यक्षात तो १५.७% असतो. हे जर अमितने तुम्हाला सांगितले, तर तुम्ही कर्जच घेणार नाही म्हणून 'आपके लिये खास फिक्स्डवाली स्कीम'चा देखावा केला जातो.

आता 'कर्ज' नाटकाचा दुसरा प्रवेश आणि नव्या पात्राचे नाव 'प्रिया'

आता या कर्जाच्या अटी तुम्ही मान्य केल्यात तर काही दिवसातच तुम्हाला 'प्रिया'चा फोन येतो. "सर, आपका लोन पास हो गया है, अभी आपको सिर्फ प्रोसेसींग फी देनी आहे." आता २% प्रोसेसींग फी गृहीत धरली आणि फिक्स्ड रेट ९% आहे असे धरले तर प्रत्यक्षात पहिल्या वर्षी १६.६ % व्याजाचा दर गळ्यात पडतो.

आता अडलेला माणूस ते पण मान्य करतो.

पुढच्या प्रवेशात एक नवे पात्र येते 'सुनील'

तुम्हाला कर्ज मान्य झाल्याचा मेसेज येतो आणि थोड्याच वेळात 'सुनील' फोन करतो. "सर आपका लोन मंजूर हो गया है." आता हे ऐकल्यावर कर्ज घेणार्‍याचा जीव भांड्यात पडतो. पण... पण... सुनीलचे पुढचे वाक्य ऐकल्यावर छातीतली धडधड वाढते.

"सर, ये लोन के पहले दो इ.एम.आय. आपको अ‍ॅडव्हान्स में देने है ताकि आपका अगले दो महिनोका प्लॅनिंग खराब नहीं हो. हम आपके कर्जेकी रकमसे दो इ.एम.आय.काटके बाकी रकम जमा कर देते है."

थोडक्यात, ताबडतोब काहीच पैसे भरायचे नाहीत हे लक्षात आल्यावर व्याजाच्या गणिताकडे पुन्हा दुर्लक्ष होतं. आता असं बघा, तुम्ही ५ लाखांचं कर्ज घेतलं तर इ.एम.आय. साधारण २४,००० रुपयाच्या आसपास असेल. दोन इ.एम.आय. म्हणजे ४८,००० रुपये झाले. ते कर्जातून वळते करून ४,५२,००० रुपये खात्यात जमा होतील. पण व्याज मात्र ५,००,००० वरच भरावे लागेल. पुन्हा एकदा व्याजाचा प्रत्यक्ष दर वाढून १८% पर्यंत पोहचेल.

म्हणजेच अमितची ९% ची खास स्कीम प्रत्यक्षात १८% पर्यंत पोहचते. यानंतर कागदपत्रं शक्य तितक्या लवकर सही करण्यासाठी पाठवायाची सूचना येते.

आतापर्यंत तुम्ही जे वाचले ते ९% सांगून प्रत्यक्षात १८% व्याज ग़ळ्यात मारण्याचा 'कर्ज' या नाटकाचा मध्यंतर झाला.

मध्यंतरानंतर दुसरा अंक सुरु होतो, कर्जाचा अर्ज आणि कायदेशीर करार सही करण्याचा!

या प्रवेशात जे पात्र येतं त्याला नाव नसतं. या पात्राला प्रचंड घाई झालेली असते. तो काही बोलत नाही. अर्जावर फुल्या मारत जातो आणि तुम्ही सह्या करत राहता! सही करता करता जे प्रश्न विचाराल ते प्रश्न त्याला ऐकूच येत नाही असा भास होत असतो. एखादा प्रश्न चारदा विचारला तर "मैं तो सिर्फ डॉक्युमेंट बॉय हूं, बाकी बँकसे पूछ लेना बाद में.' असं उत्तर देतो.

या गडबडीत सह्या घेऊन तो पसार होतो आणि बारीक बारीक अक्षरात लिहिलेल्या कर्जाच्या अटी तुम्ही वाचलेल्या पण नसतात. काहीतरी गडबड आहे असं दोन दिवस वाटतं, पण तिसर्‍या दिवशी कर्जाची रक्कम खात्यात जमा होते आणि ९% छापाचं पण प्रत्यक्षात कितीतरी अधिक व्याजाचं कर्ज घेऊन तुम्ही मोकळे झाला असता.

आता तुम्ही म्हणाल की नाटक म्हणण्यासारखं काय आहे यामध्ये ?

अमित, प्रिया, सुनिल ही सगळी कॉल सेंटरच्या लोकांची खोटी नावं असतात.

कर्जाच्या पहिल्या कॉलपासून प्रत्येक वेळी वेगळीच व्यक्ती फोन करते. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारण्याचे विसरून जाता.

जर तुम्ही प्रश्न विचारलेच, तर बोलता बोलता सहज दिशाभूल केली जाते.

कागदपत्रं शक्य तितक्या घाईत सही करून घेतले जातात.

थोडक्यात विचार करायला वेळ न देणे ही या नाटकाची थीम असते.

आता त्याचा तोटा कसा ते एका उदाहरणातून समजून घेऊ या!

समजा, कर्ज घेऊन सहा महिने झाले आणि तुमच्या हातात अचानक काही पैसे आले तर साहजिकच कर्जफेड हा तुमचा विचार असेल. पण कर्ज परतफेड गेल्यावर समजते की तुम्ही कर्ज वेळेआधी फेडले तर तुम्हाला अमुक टक्के रक्कम 'फोरक्लोजिंग् चार्ज ' म्हणून भरावी लागणार आहे. तुम्ही वाद घातला तर तुम्ही घाईघाईत सही केलेल्या डॉक्युमेंटची कॉपी दाखवली जाते. विषय संपला!

बर्‍याच वेळा या दुसर्‍या अंकात एक 'इन्शुरन्स'वाला प्रवेश पण असतो. या प्रवेशात अगदी छोट्या, एकच वेळ भरण्याच्या म्हणजे सिंगल प्रिमियमचा विमा तुम्हाला विकण्याचा प्रयत्न केला जातो. "सर, आपने लोन लिया है लेकीन कल कुछ... आप समझते है ना सर.... आज के दिन किसके लाइफ का भरोसा है?" असे डायलॉग या प्रवेशात असतात.

त्यात चूकही काही नाही. असा विमा घेणे हा प्लॅनिंगचा भाग असू शकतो. पण काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत त्या अशा!

१. हा विमा मृत्यूच्या वेळी कर्जाची जी रक्कम शिल्लक असेल तितकाच असतो, म्हणजे 'रिड्यूसींग सम' चा असतो.

२. जर वेळेआधी कर्जफेड केली तर या विम्याचे संरक्षण नाहीसे होते.

परंतु लक्षात घ्या हे सगळे कायदेशीर चौकटीत राहूनच केले जाते. त्यामुळे एकदा कर्ज घेतल्यावर तक्रार करायला काही मार्गच शिल्लक नसतो. याखेरीजही कर्जाच्या नावाखाली लूटमार करण्याचे अनेक प्रयत्न केले जातात, पण तो आपल्या लेखाचा विषय नाही.

आज सांगायचे असे आहे की कर्जाची गरज असेल तर जरूर घ्या, पण कोणत्याही 'खास' स्कीमला बळी पडू नका!!

सबस्क्राईब करा

* indicates required