नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनं जाहीर झाली आहेत...कोणकोण आहे यादीत पाहून घ्या !!
जगात सर्वोच्च बहुमान असलेलं पारितोषिक म्हणजे नोबेल पारितोषिक मानले जाते. दरवर्षी उत्सुकता असते की यावर्षी हे पारितोषिक कोणाला दिले जाणार आहे? दरवर्षी ऑक्टोबरमध्ये पुरस्कार जाहीर केला जातो. हा सर्वात महत्वाचा पुरस्कार मानला जातो. स्वीडनमधील शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार पहिल्यांदा १९०१ साली देण्यात आला होता. संबंधित क्षेत्रात गेल्या एका वर्षात मानवतेच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो.
आल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेलं विशिष्ट पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. पुरस्कार मिळवलेल्या विजेत्यांना व्यक्त व्हायला एक भाषणही करावं लागतं. ते काय बोलतात याकडेही जगाचं लक्ष असतं. नॉर्वेजियन नोबेल इन्स्टीट्यूटचं मुख्यालय असलेल्या ओस्लो येथून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते.
एखाद्या वर्षी नोबेल कमिटीला समजा वाटले की विशिष्ट पुरस्कारासाठी कोणीच पात्र नाही तर कमिटी तसं जाहीर करते त्यानंतर त्या पुरस्काराची रक्कम पुढील वर्षासाठी राखून ठेवली जाते.नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार नामांकन मिळालेल्यांची यादी पुढील ५० वर्षं प्रकाशित करता येऊ शकत नाही. परंतु जे नामांकन देतात ते सदस्य सांगू शकतात.
२०२१ साठी चे नॉमिनेशन साठी अर्ज करण्याची मुदत रविवारी संपली आहे. यावर्षी कोणाला नामांकन आहे ते पाहूया..
२०२१ च्या पुरस्कारांसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळालं आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात या दोन्ही देशांसोबत केलेल्या ऐतिहासिक शांतता करारामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलं आहे.
इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) आणि अबू धाबीचे (UAE) प्रमुख मोहम्मद बिन जायद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांनाही शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
(बेंजामिन नेतन्याहू)
नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित झालेल्यांमध्ये रशियाच्या अलेक्सी नवलनी (Alexei Navalny) आणि ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) यांचाही समावेश आहे. ग्रेटा थनबर्ग यांना हवामान बदलामुळे येणाऱ्या संकटाकडे लक्ष वेधल्याबद्दल निवडण्यात आले. त्यांची Fridays for Future या संस्थेच्या कामाचेही खूप कौतुक झाले आहे. अलेक्सी नवलनी यांनी रशियामध्ये लोकशाही स्थापनेसाठी लढा दिला. त्यांनी हे प्रयत्न शांततेने केले म्हणून या प्रयत्नांसाठी नामांकन देण्यात आले आहे.
बेलारूसचे (Belarusian ) कार्यकर्ते सिविटलाना शिखानोस्काया (Sviatlana Tsikhanouskaya), मारिया कोलेस्निकोवा (Maria Kolesnikova) आणि वेरोनिका त्सपकोलो (Veronika Tsepkalo) यांना निष्पक्ष निवडणूकीसाठी शांततेने दिलेल्या लढ्यासाठी नामांकन देण्यात आले आहे.
(अलेक्सी नवलनी आणि ग्रेटा थनबर्ग)
हंगेरीच्या हेलसिंकी समितीतर्फे जेट क्रिस्टेनसेन (Jette Christensen) यांना मानवाधिकार आणि आययूस्टीया(IUSTITIA) यांची हक्कांची बाजू मांडण्यासाठी नामांकन देण्यात आले आहे. त्यासोबतच माजी चार्ली हेब्डो वेबसाईटचे पत्रकार झिनेब अल रहझोई यांनाही नामांकन देण्यात आले आहे.
अमीनातो हैदर यांचेही या यादीत नामांकन आहे. पश्चिमी सहाराचा स्वातंत्र्य लढा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि आंतरराष्ट्रीय स्काऊट चळवळ यासाठी शांततेने केलेल्या मोहिमेसाठी अमीनातो हैदर यांचे नाव देण्यात आले आहे.
(अमीनातो हैदर)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, बालशिक्षणासाठी काम करणारी मलाला युसूफजाई, संयुक्त राष्ट्र आणि त्यांचे सचिव कोफी अन्नान आणि मदर तेरेसा यांना आतापर्यंत नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला आहे. २०२१ मध्ये हा पुरस्कार कोणाला मिळतो हे ऑक्टोबरमध्ये कळेल.
पण तोपर्यंत ही उत्सुकता कायम राहील हे नक्की.
लेखिका: शीतल दरंदळे