computer

बॅबिलॉनच्या स्त्री रसायनशास्त्रज्ञाने तयार केलेल्या अत्तरापासून ते अल्कोहोल मिश्रित परफ्युमपर्यंत...हा आहे अत्तराचा इतिहास!!

सुगंध मन प्रसन्न करतो तसे अनेक आठवणीही जाग्या करतो. देवघरात लावलेल्या अगरबत्तीपासून मंदिरातील धुपाऱ्यापर्यंत आणि धार्मिक सोहळ्यातील अत्तराच्या शिडकाव्यापासून ते पार्टीतील परफ्युमपर्यंत सुगंध नेहमीच आपल्याला सकारात्मक आठवणींशी जोडून ठेवतो. हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी असा सगळ्याच धर्मात सुंगंधाला विशेष महत्त्व आहे. देव आणि भक्त यांना जोडण्यासाठी हा सुगंध विशेष कार्य करतो, अशी मान्यता जवळपास सर्वच धर्मात आढळते.

सर्वच प्रदेशात, संस्कृतीत आणि धर्मात असे पवित्रस्थान मिळवणाऱ्या या सुगंधी अत्तराचा प्रवास कुठून सुरु झाला असेल? जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की वाचा.

शेतीसाठी जंगले जाळताना यातील अनेक वनस्पती जाळल्यानंतरही सुगंध पसरवत राहतात याचा शोध लागला असला तरी त्या वनस्पतीपासून अत्तर कसे बनवायचे याचा शोध मात्र उशीरच लागला. अत्तर किंवा परफ्युमचा पहिला वापर कुठून सुरु झाला याबद्दल अनेक मतांतरे आहेत. तरीही काही अभ्यासक मात्र बॅबिलॉन संस्कृतीतील एका स्त्री रसायनशास्त्रज्ञाला याचे श्रेय देतात. मेसोपोटेमियातील त्या स्त्रीचे नाव होते ताप्पुती. ताप्पुतीने सर्वात आधी तेल आणि सुगंधी फुले यांच्या मिश्रणातून पहिले अत्तर बनवले, असे मानले जाते. तापुत्ती ही बॅबिलॉन संस्कृतीतील एक प्रभावी व्यक्ति होती. मेसोपोटेमिया संस्कृतीतील शिलालेख सापडले त्यावरही तापुत्तीच्या नावाचा उल्लेख आढळतो. ती मेसोपोटेमियाच्या राजघराण्यातील दासींची प्रमुख होती. फुलांमधून सुगंधी अर्क कसा काढून घ्यायचा याचे प्राथमिक तंत्र तिनेच शोधले. तिच्यानंतर अनेकानी या तंत्रात आपापल्या पद्धतीने भर घातली. म्हणूनच अत्तराची शोधकर्ती म्हणून हे श्रेय तिलाच दिले जाते.

भारतातही इ. स. पूर्व ३५०० ते १३०० पर्यंत म्हणजे सिंधू संस्कृतीच्या काळात अत्तर बनवले जात होते. यासाठी नैसर्गिक सुगंध देणाऱ्या वस्तू म्हणजे फुले, वनस्पती, कस्तुरी यांचा वापर केला जात असे. याचा उपयोग सौंदर्यवृद्धी आणि औषधी अशा दोन्ही प्रकारे केला जात असे. आयुर्वेदातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या ग्रंथांतही अत्तर बनवण्याची प्रक्रिया उद्धृत केली आहे. याशिवाय बृहदसंहिता या ग्रंथातही सुगंधी द्रव्य बनवण्याचे काही संदर्भ मिळतात.

मध्ययुगीन काळात विशेषत: मुघल काळात तर भारतात अत्तराला चांगलाच भाव आला होता. सातव्या शतकात राजा हर्षवर्धनच्या काळात राजधानी कनौजमध्ये अत्तराची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जायची. हैदराबाद शहरात तर आजही अत्तर निर्मितीच्या खाणाखुणा आढळतात. निजामाच्या काळात हे शहर विविध प्रकारच्या अत्तरांसाठीच प्रसिद्ध होते.

(मुघलकालीन अत्तराची कुपी)

इटालियन पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते अत्तराचा इतिहास ताम्रयुगाइतका जुना आहे. इ. स. पूर्व ४००० मध्ये सायप्रस बेटावर अत्तर निर्मिती करणारा एका कारखानाच होता. ४००० चौ. किमी परिसरात हा कारखाना उभारला होता असे येथील उत्खननावरून दिसून येते. अत्तराच्या व्यापारात त्याकाळी सायप्रस अग्रणी स्थानावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सायप्रस बेटावर पुरातत्वशास्त्रज्ञांना दहा प्रकारचे सुगंधी अत्तर निर्मिती केली जात होती याचे पुरावे सापडले आहेत. यासाठी दालचिनी, तमालपत्र, मोठी बडीशेप, हीना, लवेंडर, अशा वनस्पतीच्या रसाचा यासाठी वापर केला जाई. सायप्रस बेटावरील लोकांनी अत्तर बनवण्याचे हे तंत्र इजिप्शियन लोकांकडून शिकले असावे असा या अभ्यासकांचा अंदाज आहे.

४००० वर्षापूर्वी इजिप्तमधील उच्चवर्गीय लोकांना अत्तर वापरण्याचा छंद होता. उंची अत्तर हे त्याकाळी स्टेट्स सिम्बॉल मानले जायचे. यासाठी इजिप्शियन लोक आफ्रिकेतून सुगंधी सामान मागवत असत. त्याकाळी इजिप्त आणि आफ्रिकेदरम्यान चंदनाच्या लाकडाचा व्यापारही चालत असे. इजिप्तमध्ये धार्मिक कार्यक्रमापासून ते दैनंदिन जीवनातही अत्तराचा वापर केला जात होता. वेगवेगळ्या प्रसंगी वापरायचे अत्तरही वेगवेगळ्या प्रकारचे होते. मृतकासोबत समान दफन करण्याची इजिप्तची जी प्रथा होती त्यानुसार अनेक उच्चवर्गीय लोकांच्या मृतदेहासोबत त्यांचे आवडते अत्तरही दफन केल्याचे आढळून आले आहे. इजिप्त संस्कृतीत नेफेत्रम नावाच्या सुगंधाच्या देवतेची पूजा केली जात असे. इजिप्त संस्कृतीतील राजे आणि अमीर-उमराव यांच्यासाठी अत्तर हा रोजच्या दिनचर्येचा भाग होता. आपल्या सभोवतीचे वातावरण सुगंधी आणि पवित्र ठेवण्यासाठी ते याचा वापर करत.

 

इजिप्तच्या शाही घराण्याच्या भिंतीवर कोरण्यात आलेल्या चित्रात लिलीपासून अत्तर बनवण्याची प्रक्रियाही चितारण्यात आली आहे. यावरून अत्तर हा त्यांच्या जीवनाचा किती अविभाज्य घटक होता हे लक्षात येते.

९ व्या शतकात पॅरीस मधील लेखक अल-किंडीने लिहिलेल्या ‘दि बुक ऑफ परफू’ या पुस्तकातही अत्तर बनवण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यात आले आहे. या पुस्तकात अत्तर बनवण्याच्या आधुनिक पद्धतीचा उल्लेख आढळतो.

पर्शियन राजांनाही अत्तराचा चांगलाच छंद होता. पर्शियन चित्रकलेचे काही नमुने तुम्ही पहिले असतील तर तुमच्या हे लक्षात येईल की, यातील प्रत्येक राजासोबत कोणत्या ना कोणत्या प्रकारचे फूल किंवा अत्तराची बाटली रेखाटण्यात आली आहे. पर्शियन लोकांचा अत्तराच्या व्यापारात मोठा दबदबा होता. पूर्वी अत्तरासाठी मुलभूत घटक म्हणून तेलाचा वापर केला जात असे. तेलाऐवजी अत्तरासाठी अल्कोहोलचा वापर करण्याचे तंत्र पर्शियन लोकांनीच शोधले असे मानले जाते. म्हणजेच आधुनिक पद्धतीचा सेंट बनवण्याचे श्रेय पर्शियन लोकांनाच दिले पाहिजे.

रोम आणि ग्रीकमध्येही पूर्वीच्या काळी अत्तराचे बरेच प्रकार अस्तित्वात होते. हे सगळे प्रकार कसे बनवले जायचे याचे वर्णन करणारी कितीतरी पुस्तके तिथे आजही उपलब्ध आहेत. रोम आणि ग्रीकमध्ये जुन्या काळी अत्तर बनविणाऱ्या कारागिरांनी जाणीवपूर्वक ही सगळीप्रक्रिया लिखित स्वरुपात जतन करून ठेवली आहे.

पूर्वीच्या काळी चीनमध्येही खोलीतील वातावरण शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी काही सुगंधी औषधी वनस्पतींची धुरी करण्याची पद्धत प्रचलित होती. चीनमध्ये सुई आणि सांग राजवटीच्या काळात अत्तर निर्मितीचा व्यवसाय जोरात सुरु होता. यासाठी लागणाऱ्या सामानाचा व्यापार सिल्क रुटवरून होत असे.

मध्ययुरोपमध्ये इस १२ ते १६ व्या शतकापर्यंत लोक आपल्या सोबत एक पोमँडर ठेवत असत. पोमँडर म्हणजे सुगंधी अत्तर भरलेली गोल कुपी. त्याकाळी हा पोमँडर कपड्यांच्या आतही ठेवला जाई. एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट झाल्यानंतर आनंद दर्शवण्यासाठी हे लोक एकमेकांना आपल्या पोमँडरमधील अत्तर लावत असत. आजूबाजूच्या वातावरणातील दुर्गंधीमुळे आजारी पडण्याची शक्यता असते असा समज त्याकाळी प्रचलित होता. सुगंधी वातावरण निरोगी राहण्यास मदत करते असा विश्वास असल्याने आपल्या आजूबाजूला नेहमीच सुगंध राहिला पाहिजे म्हणून मध्ययुगीन युरोपातील लोक आपल्यासोबत कायमच हा पोमँडर ठेवत असत.

युरोपचा राजा क्रुसेडस अरब युद्धावरून परत आल्यानंतरच युरोपात या प्रथेने जन्म घेतला. त्यामुळे युरोप आणि पश्चिमी देशात अत्तराचा प्रसार अरब देशांकडून झाला असावा असाही एक अंदाज आहे. फ्रांसमध्ये ११९० पासूनच अत्तराचा व्यापार सुरु झाला होता. फ्रांसचा सम्राट नेपोलियन तर एका महिन्यात अत्तराच्या ५० बाटल्या वापरत असे असे म्हटले जाते. इंग्लडची राणी पहिली एलिझाबेथ हिला देखील गुलाब आणि कस्तुरीचे अत्तर वापरण्याची हौस होती. फक्त कपड्यांवर फवारण्यासाठीच नाहीतर अंघोळीच्या पाण्यातही अत्तराचे थेंब टाकले जायचे. आजच्या स्पाप्रमाणे त्याकाळीही सुगंधी वनस्पतींचा वापर करून शरीर आणि मन ताजेतवाने ठेवले जात असे.

अशाप्रकारे एकामागून एक सर्वच देशांनी आणि तिथल्या उच्चवर्गीय लोकांनी अत्तराचा अत्यंत प्रेमाने स्वीकार केल्याचे दिसते. गरिबांना मात्र ही चैन त्याकाळी तरी परवडणारी नव्हती.

जगाला सुगंधी करणाऱ्या अत्तराबद्दल काही रंजक गोष्टी तुम्हालाही माहिती असतील तर त्या आमच्याशी जरूर शेअर करा.

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required