computer

ताजमहाल कदाचित बुऱ्हाणपूरमध्ये असता आणि आतली कबरही दुसऱ्याच राणीची असू शकली असती? काय आहे हे गौडबंगाल?

(प्रातिनिधिक फोटो)

हजारो वर्षांची समृध्द संस्कृती लाभलेल्या आपल्या देशात दर दहा कोसांवर जुन्या इतिहासाचे अवशेष बघायला मिळतात. काही ठिकाणं ऐतिहासिक वारशाच्या निमित्ताने 'टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन' या सदरात मोडतात. साहजिकच सुट्टीत फिरायला जायचं म्हटलं की तयार होणाऱ्या याद्यांमध्ये त्यांची नावं येतात. पण अशीही काही गावं अशी आहेत की ज्यांचं नाव या खास यादीत येत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातलं बुर्‍हाणपूर (किंवा बर्‍हानपूर असंही म्हणतात).

एकेकाळी या शहराला दक्षिणेकडे नेणारा दरवाजा असंही म्हटलं जायचं. मोगलांच्या खानदेश सल्तनतीचा भाग असलेल्या या शहराचं महत्व एकेकाळी इतकं वाढलं होतं की मोगलांचा आग्रा दरबार एकेकाळी या शहरात हलवला गेला होता. १६०१ साली अकबराने खानदेश जिंकल्यावर या शहराचं महत्व वाढतच गेलं. व्यापार वाढत गेला. मुळात हा भाग धनधान्याने श्रीमंत होताच. त्यात मोगल साम्राज्याची दक्षिणेकडील राजधानी म्हणावं असं महत्व या शहराला मिळालं.
 

हे झालं राज्य कारभाराच्या दृष्टीने. पण मोगल बादशहांच्या अनेक प्रेमप्रकरणांचा वारसा पण या शहराला मिळाला आहे. एरवी अत्यंत क्रूर आणि अरसिक समजला जाणारा औंरंगजेब १६३६ साली इथे आल्यावर हिराबाई नावाच्या नर्तिकेच्या प्रेमात इथेच आकंठ बुडाला होता. पण हिराबाई अल्पायुषी ठरली. तिच्या मृत्यूनंतर औरंगजेब  दु:खाने व्याकुळ झाला. त्यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या मूळ स्वभावावर गेला. पण हे सगळे नंतर.. त्या आधीचा बुऱ्हाणपूरचा इतिहास शाहजहानची पत्नी मुमताज महल आणि शाहजहानची दुसरी प्रेमिका गुलआरा यांच्या सोबत जोडला गेला आहे. प्रेमाचे प्रतिक म्हणून आपल्याला ज्ञात असलेला ताजमहाल कदाचित इथे बुऱ्हाणपूरलाच उभारला गेला असता! हे सगळं समजून घेण्यासाठी थोडा इतिहासाचा धांडोळा घ्यावा लागेल. 

(दानियल)

अकबराने बुर्‍हाणपूर जिंकल्यावर त्याचा कारभार त्याचा धाकटा मुलगा दानियलच्या हातात सोपवला. अकबराचा मोठा मुलगा राजपुत्र सलीमने (अनारकलीचा सलीम ) बंडखोरी केली. साहजिकच दानियलचे महत्व वाढले.  पण राज्यकारभार हाकणे त्याच्या स्वभावातच नव्हते. दानियल अत्यंत मद्यपी होता. त्याने बुर्‍हाणपूरजवळ आहूखाना नावाची एक हवेली बांधली. याच हवेलीत व्यसनात बुडून त्याचा अंत झाला. 'आहूखाना' हे नाव आता लक्षात ठेवा कारण कहाणीच्या पुढच्या भागात त्याचे फार महत्व आहे. याच दरम्यान अकबराचा मृत्यू झाला आणि राजपुत्र सलीम ' जहांगीर' नावाने सत्तारुढ झाला. 

(जहांगीर)

१६१७ साली त्याचा जहांगीर सलीमचा मुलगा राजपुत्र खुर्रमकडे बर्‍हाणपूरचा ताबा देण्यात आला. राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्याने त्याचा मोठा भाऊ खुस्रोला संपवले. नंतरच्या काळात खुर्रमने पित्याविरुध्द बंड केले आणि बुर्‍हाणपूरची मालकी खुर्रमचा भाऊ परवेझकडे आली. परवेझही दारूच्या व्यसनात बुडालेला होता. थोड्याच दिवसांत त्याचाही अंत झाला आणि खुर्रम पुन्हा बर्‍हाणपूरचा सर्वेसर्वा झाला. १६२७ साली जहांगीरच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्य खुर्रमच्या हातात आले. खुर्रम ' शहाजहान या नावाने मोगल सम्राट झाला. 

(शहाजहान )

१६३० साली उत्तरेत बंडखोरी झाली तेव्हा मोगलांचा कारभार याच शहरातून चालायचा. हा काळ फारच कठीण होता. उत्तरेत बंडखोरी तर बुर्‍हाणपूरात सतत दोन वर्षं दुष्काळ पडला होता. १६३२ साली शहाजहानने बर्‍हाणपूरचा निरोप घेतला.  पण त्याआधी तो एका नर्तकीच्या प्रेमात पडला होता. या नर्तकीचे नाव होते गुल-आरा! बर्‍हाणपूरच्या जवळच करारा गावात शहाजहानने दोन महाल बांधून त्या गावाचे नाव 'महल गुल आरा' असे बदलले होते.

(महल गुल-आरा)

या नर्तकीच्या प्रेमात पडलेला  शहाजहान अनेक रात्री याच महालात मुक्कामाला असायचा. या गावाच्या बाजूने वाहणार्‍या नदीत नाव घेऊन चांदण्या रात्री फेरफटका मारणे हा त्याचा आवडता विरंगूळा होता. या प्रेमप्रकरणाने शहाजहानच्या सासर्‍याचे- युसुफ खानचे धाबे दणाणले. असेच चालू राहीले तर मुमताजच्या मुलांना सत्तेवर येणे कठीणच होते. असे म्हणतात की याच विचाराने शहाजहानच्या सासर्‍याने कपटाने गुल आराला नदीत बुडवून मारून टाकले. यानंतर काही काळातच मुमताज महलचा पण मृत्यू झाला. आधी उल्लेख केलेल्या आकुखान्यात सहा महिने  मुमताजचे शव जतन करून ठेवण्यात आले. आग्र्याला ताजमहालात कबर तयार झाल्यावर मुमताजचे शव बुर्‍हाणपूरातून आग्र्याला हलवण्यात आले.

(आहूखाना)

बुऱ्हाणपुरात आजही आहूखाना आणि गुलआरा महल या वास्तू बघायला मिळतात. पण ताजमहाल आग्र्याला असल्यामुळे पर्यटकांच्या यादीत बुर्‍हाणपूर हे नाव नसते. असं म्हणतात की शाहजहानला ताजमहाल बुर्‍हाणपूरलाच तापी नदीच्या किनार्‍यावर बांधायचा होता.  पण संगमरवराच्या त्या वास्तूचे वजन इथल्या मातीला झेपले नसते आणि राजस्थनातून संगमरवर इथे आणणे फारच महागात पडले असते या विचाराने ताजमहाल पुढे आग्र्याला बांधण्यात आला. मुमताजच्या बाबाने गुलाआराचा खून केला नसता तर कदाचित ताजमहालात मुमताजऐवजी गुलआराचे थडगे बांधले गेले असते, मुमताजचा औरंगजेब गादीवर न येता गुलआराचा एखादा मुलगा बादशाह बनला असता आणि आज कदाचित हिंदुस्तानचा इतिहासही काही वेगळाच असता, नाही का?

सबस्क्राईब करा

* indicates required