computer

१६ वर्षे न सापडलेला गुन्हेगार क्रिमिनल प्रोफाईलींगच्या आधारे ४ तासांत असा शोधला!!

गेल्या वर्षी येऊन गेलेली असुर नावाची वेब सिरीज तुम्ही पाहिली का?  या सिरीजमध्ये एक सिरियल किलर काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना मारून टाकत असतो. हा गुन्हेगार कोण आहे? तो लोकांना का मारतो आहे? याचा काहीच पुरावा मिळत नसतो. मग होतं काय, तर आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सुविधा वापरून सदर गुन्हेगाराचा शोध घेतला जातो व त्याला शिक्षा होते. 

जगभरात रोज कितीतरी गुन्हे घडत असतात. पण वर म्हटल्याप्रमाणे काही वेळेला असंही होतं की गुन्हेगाराचा काहीच पत्ता लागत नसतो. पण आज अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅब्सचा वापर करून गुन्हेगाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो. तरीपण गुन्हेगार शोधायला बराच वेळ जातो आणि कष्टही बरेच करावे लागतात.  मग तर विचार करा मागच्या ६० ते ७० वर्षांपूर्वी ही परिस्थिती कशी असेल. समजा एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडला आणि तो करणाऱ्या गुन्हेगाराचा काहीच ठावठिकाणा नाहीये, तो एकापाठोपाठ एक गुन्हे करतोय अशा वेळेला तेव्हा काय होत असेल?

तर ही गोष्ट आहे एका सिरियल किलरची. सुमारे ६०-७० वर्षांपूर्वीची!. हा सिरियल किलर मोकाट सुटला होता. साल १९५६. ब्रूकलीन या न्यूयॉर्कच्या उपनगरात पॅरामाऊंट थिएटर्मध्ये'वॉर अँड  पीस'चा शो सुरू होता अन अचानक संध्याकाळी ७.५० वाजता बॉम्बस्फोट झाला. थिएटरमधून धुराचे लोट दिसू लागले. सर्वत्र एकच पळापळ चालू झाली. पॅरामाउंटचा हा बॉम्बस्फोट काही नवीन पद्धतीने झालेला नव्हता. गेल्या १६ वर्षांपासून याआधीसुद्धा अशा प्रकारचे ३२ स्फोट शहरात झाले होते. एकाच व्यक्तीने हातानेच तयार केलेल्या बॉम्बच्या साह्याने थिएटर, भुयारी पादचारी मार्ग, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा या शहरात असणाऱ्या मोक्याच्या असणाऱ्या ठिकाणी तब्बल ३२ बॉम्बस्फोट घडून आणले होते, असा पोलीसांचा कयास होता.

या स्फोटांमध्ये वापरलेली स्फोटके एकाच प्रकारची होती. बहुतेक सर्व स्फोटात जीवित हानी झालेली नव्हती, पण वित्तहानी होत होती आणि हे बॉम्बस्फोट करणारी व्यक्ती स्वतःची FP अशी ओळख असलेले एक पत्र नेहेमीच ठेवून जात होती. या स्फोट मालिकेची सुरुवात महायुध्दाच्या आधी झाली होती. युध्द संपल्यावरही बाँबस्फोटाची मालिका चालतच राहिली. मात्र हा FP कोण होता याचा ठावठिकाणा लागत नव्हता. १९५६ मध्ये या गुन्हेगाराने वर्तमानपत्रांना पत्र पाठवायला सुरुवात केली आणि या पत्रांमध्ये FP या अक्षरांचा उल्लेख करत सदर व्यक्ती आपणच आहोत हे सिद्ध केलं. पण हा FP कोण होता हे न्यूयॉर्क पोलीस दलाला १६ वर्षे शोधून काढण्यात यश आलं नव्हतं. 

ब्रुकलीनच्या बाँब स्फोटानंतर मात्र सगळं काही करून थकलेल्या पोलिसांनी गेल्या १११ वर्षांत ज्या गोष्टीचा कधी आधार घेतला नव्हता तो घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आता मानसोपचारतज्ञांकडे जाण्याचे ठरवले. त्या दिवशी दुपारी कॅप्टन फिनी आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जेम्स ब्रुसेल यांना फोन करण्यासाठी ऑफिस सोडले. FP या अक्षरांचा पुरावा सोडला तर बाकी काहीच सापडत नाही, पण कदाचित त्या गुन्हेगाराच्या मनाचा ठाव घेता आला तर कदाचित त्याला अटक करणे सोपे जाईल असा पोलिसांचा अंदाज होता. तो कसा दिसतो, कसा राहतो याचा थांगपत्ता लागत नव्हता. पण त्याच्या वागण्यावरून त्याचे व्यक्तिमत्व जर शोधून काढता आले तर अटकेचा मार्ग सोपा होईल हा पोलिसांचा विचारच १९५६ साली क्रांतीकारक होता. 

(डॉ. जेम्स ब्रुसेल)

कॅप्टन फिनी डॉक्टर ब्रुसेल यांच्याकडे पोहचले तेव्हा ते आपल्या कामात प्रचंड व्यग्र होते. 'द न्यूयॉर्क डिपार्टमेंट ऑफ मेंटल हायजीन'च्या तब्बल १,२०,००० रुग्णांचा भार त्यांच्यावर होता आणि त्यात दरवर्षी तीन हजारांनी वाढ होत होती. कितीतरी पेशंटच्या फाईल्स त्यांच्या टेबलावर पडलेल्या होत्या आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या कितीतरी व्याख्याने व बैठकांचं नियोजन झालेलं होतं. हे सगळं सांगत डॉक्टर ब्रुसेल म्हणाले की मी अस्तित्वात असणाऱ्या लोकांचा अभ्यास करतो भूतांचा नाही. समजा, यातूनही वेळ काढून डॉक्टरांनी योग्य विश्लेषण करून काही आडाखे बांधले आणि ते चुकीचे निघाले तर पोलीस चुकीच्या दिशेने जातील हे दडपण डॉ ब्रुसेल यांना जाणवत होतंच. आणि महत्त्वाचं म्हणजे पोलीस दलातली तज्ञ मंडळी १६ वर्षांत काही शोधू शकली नाहीत तर तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करत आहात? असा प्रश्न त्यांच्या मनात उभा होताच. पण शेवटी हा प्रश्न न्यूयॉर्क शहराच्या सुरक्षेचा असल्याने ब्रुसेल या प्रकरणात भाग घेण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. 

पुढे वाचण्यापूर्वी आपण आता मानसोपचार तज्ञ कसे काम करतात ते जाणून घेऊया!

मानसोपचारतज्ज्ञ सामान्यतः समोरच्या व्यक्तीची चौकशी करतात, त्या दरम्यान काही टिपणं काढतात आणि त्यावरून त्या व्यक्तीच्या मनात काय आहे याचा मागोवा घेतात आणि समस्येच्या मूळाशी पोहचतात. त्यानंतर रोग्यावर उपचार सुरु करतात. इथे गणित नेमकं उलट मांडायचं होतं. त्या गुन्हेगाराची पत्रं आणि गुन्ह्याची पध्दत, त्याचे हस्ताक्षर, त्याची भाषा, कामाची पध्दत याचा अभ्यास करून ती व्यक्ती समोर आली तर कशी असेल याचा अंदाज बांधायचा होता. म्हणजे अंदाज बांधताना उलट प्रवास करायचा असतो. या पध्दतीला रिव्हर्स सायकॉलॉजी म्हणतात. 

डॉक्टर ब्रुसेल यांनी बर्‍याच अभ्यासानंतर त्या व्यक्तीची लैंगिकता, वंश, कामाचा इतिहास, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याचे अंतर्गत स्वतःशीच चालू असणारे युद्ध ज्याने त्याला हे सर्व करण्यासाठी प्रवृत्त केले असावे या सगळ्या गोष्टींवरून एक प्रोफाइल निर्माण केले आणि त्याच्या आधारे या FP पर्यंत पोहचण्याचा रस्ता शोधण्याचा प्रवास सुरु केला. या रिव्हर्स सायकॉलॉजीला नंतरच्या काळात क्रिमिनल प्रोफाईलींग हे नाव देण्यात आलं. 

डॉब्रुसेल्स यांच्या विचारांचा वेग फारच अधिक असायचा. एकमेकात गुंतलेले दुवे शोधून काढण्यात त्यांना फारसा वेळ लागायचा नाही. संध्याकाळी घरी गेल्यावर वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी शब्दकोडी बनवणे हा त्यांचा छंद होता. कदाचित या सरावामुळेच उपलब्ध माहितीवरून त्यांनी गुन्हेगाराचे चित्र अगदी सहजरित्या पोलीसांसमोर उभे केले. पुरावे म्हणून जमा केलेली त्याची पत्रे, न फुटलेल्या बाँबचे फोटो, पोलीसांच्या पंचनाम्यांच्या प्रती याचा ढीगच पोलीसांनी डॉक्टरांसमोर टाकला. बराच वेळ तो पुरावा बघून डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली.

त्यांच्या मते हा बाँम्बर paranoid schizophrenia या रोगाचा बळी होता. हा मानसिक रोग असलेल्या व्यक्तीला आपले आयुष्य दुसरे कोणीतरी ताब्यात ठेवतं आहे, काबू करतं आहे असा भास होत असतो. त्यांच्या मनात त्यांनीच निर्माण केलेले पण प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले शत्रूही असतात. त्यांचं कोणासोबतही पटत नाही. डूख धरून ठेवणं हा त्यांचा स्थायीभाव असतो. सर्वसामान्य माणसं भांडतात आणि काही वेळाने विसरतात. पण ही माणसं कायम स्वरुपात राग कोंडून ठेवतात. साधारण वयाच्या पस्तीशीनंतर या रोगाची लक्षणं दृश्य स्वरुपात दिसायला लागतात. 

हा विचार करून डॉक्टरांनी पहिला तर्क मांडला "जर त्याने पहिला बाँबस्फोट १९४० साली केला असेल तर आता त्याचे वय ४५-५० च्या आसपास असेल."

काही वेळाने त्यांनी दुसरा तर्क मांडला:  "हा बॉम्बर सडपातळ नसेल आणि लठ्ठही नसेल."  या तर्कालाही एक संशोधनाचा आधार होता. जर्मन मानसशास्त्रज्ञ Ernst Kretschmer यांनी १०००० पॅरॅनॉइड व्यक्तींची तपासणी केल्यावर त्यांना असे आढळले होते की बहुतेक रोगी 'ना सडपातळ ना लठ्ठ' या वर्गीकरणात मोडत होते. 

आता पुढचा तर्क! त्याच्या लिखाणाच्या पध्दतीवरून - एकही खाडाखोड नाही, स्पेलिंगच्या चुका नाहीत म्हणजे हा माणूस शिस्तप्रिय आणि दिलेल्या कामाचा भोक्ता असावा. तो कामावर वेळेत येत असेल- त्याचे कोणासोबतही भांडण होत नसेल आणि आपण "बेस्ट" आहोत असा त्याचा समज असेल. पण याच दरम्यान झालेल्या कोणत्या तरी अन्यायामुळे तो इतका दुखावला गेला असेल आणि हीच सकारात्मक शक्ती त्याने विध्वंसासाठी वापरली असेल. डॉक्टरांच्या भाषेत सांगायचं झालं तर तो He is quiet, polite, methodical, prompt असा असेल. पण आता तो बेफाम सुटला होता. याचं कारण त्याच्यावर अन्याय झाला होता.

(डॉ. जेम्स ब्रुसेल)

नंतरचा तर्क त्याच्या लिखाणाबद्दल होता. त्याच्या लिखाणात रोजच्या भाषेत वापरले जाणारे अमेरिकन शब्द -ज्याला स्लँग म्हणतात, उदाहरणार्थ Dude, Guy, Fix -असे शब्द नव्हते आणि dastardly deeds सारखे कठीण शब्द घाईत लिहिले गेले होते. याचा अर्थ असा होत होता की तो इंग्रजी शिकला होता, पण ती त्याची मातृभाषा नव्हती. म्हणजेच तो स्थलांतरीत होता. त्याची इंग्रजी G काढण्याच्या पध्दतीवरून तो 'स्लाव्ह' म्हणजे पूर्व युरोपातून आला असावा. त्याच्या अक्षरातील 'डब्लू' पध्दतीवरून त्याच्या लैंगिकतेचा अर्थ असा होत होता की त्याला इडीपस कॉम्प्लेक्स असावा. इडीपस कॉम्प्लेक्स म्हणजे आईबद्दल वाटणारी कामवासना. या सर्व कारणांमुळे त्याने लग्न केले नसावे आणि तो आपल्या कुटुंबासोबतच राहत असावा. 

इतकी माहिती सांगीतल्यावर पत्र वाचनाला सुरुवात झाली आणि त्या प्रत्येक पत्रात कॉन एडीसन आणि त्यांच्या सारख्या कंपन्यांना धडा शिकवला पाहिजे अस उल्लेख होता. याचाच अर्थ असा होता की त्या माणसावर नोकरीत असताना कंपनीनेच आपल्यावर अन्याय केला असं त्याचं ठाम मत असावं. पत्रं ज्या पोस्टात टाकली गेली होती त्यावरून पोलीसांनी असा इसम त्या भागात शोधायचे ठरवले. 

थोडक्यात नजरेसमोर असलेली व्यक्ती ४० ते ४५ या वयोगटातील असावी. तो स्लाव देशांपैकी कुठल्यातरी देशांमधून आलेला असावा. सदर व्यक्ती हा अत्यंत शिस्तप्रिय आहे व त्याने यापूर्वी कुठलाही गुन्हा केलेला नाहीये. या व्यक्तीला एका कंपनीतून कामावरून काढून टाकलेलं आहे. अमेरिकेत एका ठराविक वयात वेगळे राहण्याची पद्धत असते, पण हा व्यक्ती त्यास अपवाद आहे. तो अजूनही त्याच्या कुटुंबासोबतच राहतो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही या व्यक्तीपर्यंत पोहोचाल तेव्हा तेव्हा तो तुम्हाला विरोध करणार नाही. तो शिस्तप्रिय असल्याने अगदी अटक झाल्यानंतरसुद्धा एखाद्या समारंभाला जात असल्याप्रमाणे कोट वगैरे घालून तुमच्या सोबत एकदम टापटीपपणे येईल, हे ऐकून पोलीस थोडेसे चक्रावून गेले. ब्रुसेल यांनी हे देखील सांगितलं होतं की सदर व्यक्ती राहण्यास न्यूयॉर्क शहराच्या एका विशिष्ट भागातच आहे.

या दरम्यान पोलीसांनी कॉन एडिसन या कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचार्‍यांची १९४० पासूनची यादी तपासून या वर्णनात कोण बसतं आहे याचा तपास सुरु केला. आणि काय आश्चर्य!! अगदी हुबेहुब फिट्ट बसेल अशा एका माणसाचे नाव त्यांना सापडले. या माणसाचे नाव होते जॉर्ज मेटेस्की.
 

(जॉर्ज मेटेस्कीने)

कंपनीचा बॉयलर मेंटेनन्स करणार्‍या या कर्मचार्‍याला कामावर असताना अपघात झाला होता. बॉयलर फुटल्याने त्याच्या अंगावर विषारी वाफ लोटली गेली होती. त्यामुळे त्याला न्युमोनिया झाला होता. या अपघातामुळे २६ दिवसाच्या रजेनंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्याने कंपनीवर तीन वेळा खटला केला होता. पण त्यात तो हरला होता. त्याचा पत्ता घेऊन पोलीस घरापर्यंत पोहचले. जॉर्ज मेटेस्कीनेच दार उघडले. पोलीसांनी त्याला अटक करण्यासाठी आलो आहे असे म्हटल्यावर कोणताही विरोध न करता त्यांच्यासोबत येण्यास तयार झाला. डॉक्टर ब्रुसेल्स यांनी दिलेल्या वर्णनात आणि प्रत्यक्षात असलेल्या जॉर्ज मेटेस्कीत तसूभराचाही फरक नव्हता. पोलीसांना 'थोडे थांबा,आलोच' असे म्हणून तो आतमध्ये गेला आणि इस्त्री केलेला डबल ब्रेस्टेड सूट घालून अगदी अप टू डेट तयार होऊन बाहेर पडला. पोलीस का आले आहेत असा देखील प्रश्न त्याने केला नाही. कारण त्यांच्या युध्दात असे होणार याची त्याला खात्रीच होती. शेवटी पोलीसांनीच न राहवून त्याला विचारले "FP म्हणजे काय? " त्यावर त्याने उत्तर दिले  "Fair Practice!"

त्यानंतर जॉर्ज मेटेस्कीला कोर्टात हजर करण्यात आले पण तो paranoid schizophrenia ने म्हणजे वेडाने पछाडलेला असल्याने त्याला वेड्यांच्या इस्पितळात भरती करण्यात आले. १६ वर्षं जंगजंग तपास करून हाती न लागलेला बॉम्बर एका मानसशास्त्राच्या तज्ञाने चार तासांच्या अभ्यासात शोधला होता. डॉक्टर ब्रुसेल्स यांच्या क्रिमिनल प्रोफायलींगने हे शक्य झाले होते. यानंतर अनेक गंभीर गुन्हे शोधण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यात आला. 

हे झाले अमेरिकेतील उदाहरण. भारतात असे काही घडले आहे का? हो, अर्थात. अनेक खून करणार्‍या रामन राघवनला पकडण्यासाठी याच तंत्राचा वापर करण्यात आला होता. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा!

 

लेखक: श्रीपाद कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required