डॉ. महालिंगम गोविंदराजना मिळाला आहे जगातली पहिली अधिक पोषणमूल्य असलेली बाजरी विकसित करण्यासाठी जागतिक पुरस्कार!!
स्वातंत्र्यानंतर दहा वर्षांत, म्हणजे साधारण १९६० साली भारत अन्नधान्याच्या बाबतीत अल्पकाळात स्वयंपूर्ण झाला आणि खऱ्या अर्थाने हा देश कृषिप्रधान झाला. या धोरणांना आपण हरितक्रांती म्हणून ओळखतो. भारतात हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांना समजले जाते, तर जगात हरितक्रांती आणण्याचे श्रेय जाते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना. भारतातील हरितक्रांतीचे मोठे श्रेय बोरलॉग यांना देखील दिले जाते. जगाने त्यांना नोबेल, तर भारताने पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते. या गोष्टींवरून बोरलॉग यांचे काम किती मोठे होते याचा अंदाज तुम्हाला आला असेल.
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या कार्याने हे पुढील पिढ्यांतील संशोधकांना प्रेरणा दिली आहे. या संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०११ सालापासून रॉकफेलर फाऊंडेशनकडून बोरलॉग यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील अन्नधान्य उत्पादन आणि कृषीक्षेत्रात अनन्यसाधारण असे संशोधन करणाऱ्या ४० वर्षं वयाच्या आतील संशोधकांना हा पुरस्कार देण्यात येतो. १०,००० डॉलर्स म्हणजेच जवळपास ८ लाख रुपये बक्षीस म्हणून विजेत्यांना देण्यात येतात. ज्या पद्धतीने डॉ बोरलॉग यांनी तरुण वयात जागतिक भूकबळीची समस्या मिटविण्यासाठी असामान्य काम केले तशाच तरुणांचा शोध घेत हा पुरस्कार देण्यात येत असतो.
आनंदाची गोष्ट म्हणजे यंदाचा पुरस्कार एका भारतीय व्यक्तीला घोषित झाला आहे. भारतीय संशोधक डॉ. महालिंगम गोविंदराज यांना हा पुरस्कार मिळणार आहे. डॉ. गोविंदराज हे हार्वेस्टप्लस आणि अलायन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी इंटरनॅशनल तसेच इंटरनॅशनल सेंटर फॉर ट्रॉपिकल ऍग्रीकल्चर (ciat) या संस्थांसाठी वरिष्ठ संशोधक म्हणून काम करतात. गोविंदराज यांना हा पुरस्कार बाजरीचे बायफॉर्टीकेशन केले म्हणून देण्यात आला आहे. यामुळे बाजरीत लोह आणि जस्त(झिंक) यांचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे. बाजरीच्या या व्हरायटीला त्यांनी नाव दिले आहे- धनशक्ती!!!
बायफॉर्टीकेशन या पद्धतीत पिकाचे उत्पादन हे त्यांचे पोषकतत्वे वाढवून केले जात असते. वर्ल्ड फूड फाउंडेशनने धनशक्तीबद्दल काढलेले निकष बघता डॉ. गोविंदराज यांच्या संशोधनाचे महत्व पटल्याशिवाय राहत नाही. २०० ग्राम धनशक्ती हे महिलांना आवश्यकतेपेक्षा ८० टक्के अधिक लोह पुरवते, तर इतर बाजरीच्या प्रजाती फक्त २० टक्के लोह पुरवतात.
तामिळनाडू येथील एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या गोविंदराज यांच्या कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. पिढ्यानपिढ्या शेती चालत आली होती. गोविंदराज यांनी मात्र शेतीला शिक्षणाची जोड दिली आणि आज ते इतिहास घडवत आहेत. तामिळनाडू विद्यापीठात पदव्युत्तर आणि पीएचडीचे शिक्षक त्यांनी पूर्ण केले आहे. २०११ ते २०२१ असे दहा वर्ष ते इक्रीसॅट या संस्थेत संशोधक म्हणून काम करत होते.
डॉ. गोविंदराज करत असलेले संशोधन हे देशभरातील फक्त शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वांसाठीच प्रचंड उपयोगी आहे. आजच्या तारखेला देशात १,२०,००० शेतकरी धनशक्ती बाजरी पिकवत आहेत. एवढेच नव्हेतर गोविंदराज यांनी धनशक्ती बरोबरच इतर दहा लोह आणि जस्ताचे अधिक वाढीव प्रमाण असलेल्या बाजरीच्या प्रजाती तयार करण्यात योगदान दिले आहे. केनिया, झिम्बाब्वे, सुदान, नायजेरिया, सेनेगल या देशांमध्ये या बियाणांची लागवड होत आहे आणि त्या देशांतील लोकांना अन्नधान्य संपूर्ण करण्यात आपल्या देशाच्या सुपुत्राचे मोठे योगदान होत आहे याचा निश्चितच अभिमान वाटायला हवा. गोविंदराज यांच्या योगदानामुळे २०२४ पर्यंत भारतातील ९० लाख लोक चांगले पोषकतत्वे असलेल्या बाजरीचे सेवन करत असतील असा अंदाज आहे.
डॉ. गोविंदराज यांच्यावर डॉ. बोरलॉग यांच्या संशोधनाचा मोठा प्रभाव आहे. देशाला मिळालेला हा सन्मान निश्चितच कृषीक्षेत्रात काम करण्यासाठी इतर तरुणांना प्रोत्साहन देणारा ठरणार आहे. भारतात शेतजमिनीची असलेली उपलब्धता आणि अजूनही मोठी लोकसंख्या शेतीवर निर्भर असल्याने या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रचंड संधी आहे. या निमित्त ही संधी घेण्यासाठी नवे तरुण समोर येतील अशी अपेक्षा आपण करू शकतो.