संक्रांतीला वाण देण्याच्या १३ सॉलिड आयडियाज. यावर्षी तुम्ही काय वाण देणार??
संक्रांत जवळ आली की बऱ्याच गोष्टींचे वेध लागतात. पतंग, तिळाचे लाडू, तिळगूळ, गुळपोळ्या, भोगीची भाजी, रथसप्तमी, पहिली संक्रांत, लहान मुलांची बोरनहाणं, काळ्या कपड्यांची खरेदी आणि बरंच काही. बायकांना तर आता यावर्षी संक्रांतीला काय वाण द्यायचं याची चिंता लागते. पूर्वी स्त्रियांना कुठेतरी एकत्र भेटता यावं म्हणून सुरु झालेली हळदीकुंकवाची प्रथा अजूनही चालू आहे. तेव्हा वाण म्हणून काहीही छोटी वस्तू दिली जायची कारण मुख्य हेतू गाठीभेटी असायचा. आता मात्र हौस आणि त्यामुळं प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळी वस्तू वाण म्हणून देण्याची पद्धत सुरु झालीय.
दरवर्षी काय नवीन वाण द्यायचं, किती बायकांना बोलवायचं, सोबत तिळाचे लाडू द्यायचे की वड्या हे सगळे प्रश्न असतातच. आता सगळयांची उत्तरं काही आम्ही देणार नसलो तरी वाण काय द्यायचं याचे काही पर्याय नक्कीच सुचवू शकतो.
मुळात बायकांना काहीही छोटंसं जरी गिफ्ट मिळालं तरी त्या खुश असतात. त्यामुळं हे वाण खूप महागाचं, खूप हटके वगैरे असायला हवं असं काही नसतंच. छान ठेवणीतल्या साड्या नेसायच्या, दागिने घालायचे, मिरवायचं आणि मैत्रिणींसोबत साड्या-दागिने-पाककृतींच्या गप्पा मारण्यासाठी हळदीकुंकू आणि वाण एक निमित्त हो..
१. छोट्या बॅग्स
बायकांचं हे एक बरं असतं, एक बॅग आहे म्हणून दुसरी नको असले काही त्यांचे नखरे नसतात. अर्थात बायकांच्या प्रत्येक प्रकारातच इतक्या व्हरायटीज असतात की दोन गोष्टी एकसारख्या होतच नाही. आता हेच पाहा ना. साधी बॅग भेट म्हणून द्यायची म्हटली तर कितीतरी ऑप्शन्स आहेत.
पोटली बॅग किंवा बटवा
मोबाईल पाऊच
स्लिंग बॅग
चालायला किंवा फिरायला जाताना मोबाईल, घराची किल्ली आणि काही पैसे या स्लिंग बॅगेत टाकले की हात मोकळे आणि छान फिरणं होतं. यात रेक्झिन किंवा कापडी असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतात.
आजकाल पैठणी साड्या आणि ड्रेसेससोबत पैठणी मटेरियल छोट्या पर्सेस पण खूप चालतात. त्यातही हातात धरायची आणि खांद्याला किंवा मनगटाशेजारी अडकवायची अशा दोन्ही पद्धतीच्या पर्सेस मिळतात.
२. ज्वेलरी बॉक्सेस्
कापडी आणि आर्टिफिशियल ब्रोकेडचे ज्वेलरी बॉक्सेस बाजारात सगळीकडे दिसतात. वेगवेगळ्या रंगांतले हे बॉक्सेस भेट देण्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतील. हवंतर त्यात छोटासा हातात धरायचा आरसा वगैरेंसारख्या वस्तूही वाणासोबत ठेवता येतील.
३. साखर, फळ किंवा गुळाच्या ढेपा
काही लोक वाण म्हणून साखर, फळ किंवा गुळाच्या लहान ढेपा देतात. प्लास्टिकच्या वस्तू देण्यापेक्षा हे असे घरी नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ वाण म्हणून देणं खरंच सोयीस्कर आहे.
४. घरगुती लोणची आणि चटण्या
ज्यांना असे वाणसामानातले पदार्थ द्यायचे नसतील त्यांच्यासाठी घरगुती लोणची आणि चटण्या देणं हाही चांगला पर्याय आहे. बऱ्याच ठिकाणी बचत गट किंवा काही स्त्रिया घरगुती लोणची-चटण्या बनवतात. त्यांना मदत आणि एक उपयोगाची वस्तू दिल्याचं देणाऱ्या व्यक्तीला समाधान!!
५. छोटी रोपं
संक्रांतीला अजून काही दिवस अवकाश आहे, पण थोडेच दिवस उरल्यानं हे लगेच करायला घ्यायला हवं. छोट्या पिशव्यांमध्ये रोप रुजवून त्याचं वाण तुम्ही देऊ शकता. शहरांत कुंड्यांमधली छोटी शेती होतेच, आणि तुमच्या घराला अंगण असेल तर मग काय विचारता? विकत आणलेल्या वाणापेक्षा या वाणाचं महत्त्व खूप जास्त असेल.
६. बांबूपासून बनवलेल्या वस्तू
टी कोस्टर्स ,वेतापासून बनवलेले लहान ट्रे, शोभेच्या वस्तू असंही काही वाण म्हणून द्यायला हरकत नाही. अशा वस्तू ऑफिसमधल्या टेबलावर किंवा बेडशेजारच्या स्टूलावर छान शोभून दिसतात.
७. दुपट्टे ,स्कार्फ, ब्लाऊज पीस आणि खण!!
आजकाल पंजाबी ड्रेस तर सगळेच वापरतात. त्यामुळं मिक्स आणि मॅचच्या जमान्यात लेहरिया किंवा बाटीक दुपट्टे वाण म्हणून द्यायला छान दिसतील.
प्लेन किंवा प्रिन्टेड स्कार्फ छान दिसतात. आजकाल ब्रोकेडचेही स्कार्फ मिळतात. काहीजणी ते अंगावर घेण्यापेक्षा त्याचा गणपतीला शेला म्हणून किंवा पूजेच्या वेळेस मूर्तीखाली अंथरायलाही वापरतात. कोणती वस्तू कुणी कशी वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न. आपण फक्त उपयोगात येईल अशी वस्तू भेट द्यावी म्हणजे झालं.
सध्या ओटी भरताना ब्रोकेडचे ब्लाऊजपीस सगळे देतात. पण कांथा वर्क केलेले किंवा कलमकारी, मधुबनी, वारली अशा प्रिंट्स असलेले ब्लाऊजपीस वाण म्हणून एकदम हटके प्रकार असेल पाहा.
धारवाडी खण हाही वाण म्हणून मस्त पर्याय असेल.
८. पूजा थाळी
सध्या छान डेकोरेटेड अशा पूजेच्या थाळ्या मिळतात. रोज वापरायला आणि औक्षण करायला अशा दोन्ही वेळेस उपयोगी पडणारा प्रकार आहे हा..
९. कुंदन रांगोळ्या
गेल्या वर्षभरात बांगड्या आणि वाट्या वापरुन काढायच्या रांगोळ्यांचं प्रस्थ सुरु झालंय आणि आपल्या ठिपक्यांच्या-संस्कार भारतीच्या रांगोळ्या मागं पडल्या आहेत. पण वेळ नसेल तेव्हा किंवा "आता ही रांगोळी आणि रंग कुठे ठेवले रे देवा"!! असा प्रश्न पडतो तेव्हा कुंदन रांगोळ्या पटकन हाताशी असलेल्या बऱ्या असतात. त्यातले तुकडे वेगवेगळ्या प्रकारे ठेवले की प्रत्येक वेळेस वेगळी डिझाईन बनते ती वेगळीच!!
१०. ज्यूट किंवा कॉटन बॅग्ज
प्लस्टिक बंदी झाली आहेच. त्यामुळं वेगवेगळ्या आकाराच्या बॅगा सतत लागत असतात. म्हणून ज्यूट बॅग्ज हा भेट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुमच्या बजेटप्रमाणं लहान किंवा मोठी बॅग तुम्ही भेट म्हणून देऊ शकाल. ती वापरली जाईलच याची हमखास खात्री आहे, काय म्हणता??
काही समाजसेवी संस्था किंवा काही स्त्रिया घरगुती व्यवसाय म्हणून कॉटनच्या बॅग्ज बनवून विकतात. या बॅग्जचाही तुम्ही भेट देण्यासाठी विचार करु शकाल.
११. उदबत्तीघर, दिवा किंवा छोटे चौरंग
उदबत्तीघर तसं प्रत्येकाच्या घरी असतंच. पण त्यातही ते थोडं डेकोरेटिव्ह असेल तर खास प्रसंगांसाठी राखून ठेवलं जातं. उभं किंवा आडवं असे दोन्ही प्रकार त्यात येतात. उभी उदबत्तीघरं साधी असतात, पण आडव्यांमध्ये बरीच कलात्मकता दिसून येते.
असंच धूप जाळण्यासाठीचं घरही भेट म्हणून देता येईल.
वरुन झाकण असलेल्या पितळी दिव्याचा सुद्धा तुम्ही यासाठी विचार करु शकता.
मीनाकारी काम केलेले मेटलचे वेगवेगळ्या आकारातले चौरंग आजकाल सर्रास मिळतात. पूजेच्या वेळेस त्यावर दिवा, फळ किंवा दुधाची वाटी असं काहीही ठेवता येते.
१२. विशेष लोकांनी बनवलेल्या वस्तू
बुद्ध्यात्मक, विकसनशील किंवा शारिरीक अपंगत्व असलेल्या मुलांच्या शाळेत सुंदर तोरण, काचेचे दिवे, डेकोरेटिव्ह मेणबत्त्या, बॅग्ज अशा बऱ्याच वस्तू बनवल्या जातात. तुमच्या आसपास अशी एखादी संस्था असेल तर तुम्ही त्यांच्याकडून या वस्तू विकत घेऊ शकाल.
१३. किचनमधली उपयोगी भांडी
तुपाचं भांडं, छोट्या काचेच्या बरण्या, मेलामाईनचे ट्रे किंवा थोड्या मोठ्या आकाराचे मिक्सिंग बाऊल्स हे भेट द्यायला चांगले ऑप्शन्स आहेत.
ड्रायफ्रूट किसण्याची किसणी जवळजवळ सगळ्यांच्याकडे असतेच, तरी बजेटप्रमाणे तुम्ही ती द्यायची की नाही याचा विचार करु शकता.
या यादीत आम्ही रुमाल, नॅपकीन, प्लास्टिकच्या बरण्या, हळदीकुंकवाचं पंचपाळ अशा नेहमीच्या यशस्वी कलाकारांना मुद्दाम घेतलं नाहीय. तरीही वाण देण्यासारख्या अजून असंख्य गोष्टी आहेत ज्यांचा या यादीत समावेश नाही. तेव्हा तुमच्याकडच्या आयडिया आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आम्ही त्यांची भर घालून यादी वाढवत नेऊ. कदाचित एखाद्या वर्षी आता काय बरे वाण द्यावे हा प्रश्न तुम्हांला पडेल आणि हाच लेख तुमच्या कामी येईल.