सायकली, शवपेटी, विमान हे सोडा, या पठ्ठ्याने तर गिनीज बुकने दिलेलं स्मृतिचिन्हही खाऊन टाकलं होतं!!!
बर्याच वर्षांपूर्वी धनंजय कुलकर्णी नावाच्या एका तरुण मुलाचे नाव महाराष्ट्रात फारच गाजत होते. हा धनंजय नेहेमी काहीतरी अच्चाट उद्योग करत असायचा. कधीकधी तो धावत्या डेक्कन क्वीनमधून फलाटावर उडी मारायचा, तर कधी पंधरा दिवस एका जागीच उभा रहायचा. त्याचा सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम होता काचा खाण्याचा!! एखाद्या कार्यक्रमात तो चार पाच ट्यूबलायटी खाऊन दाखवायचा! पण हे काही करिअर करण्याचे व्यवसाय नाहीत. बर्याच वेळा निव्वळ 'आचरटपणा' किंवा 'आगाऊपणा' या सदारातच हे मोजलं जातं. त्यामुळे धनंजयचं पुढं काय झालं हे कधीच काही कळलं नाही.पण असे उद्योग करणारे महाभाग जगात बरेच होऊन गेले.
आज ज्या इसमाची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याने तर आख्खे विमानच खाऊन दाखवले आहे. आता तुम्ही म्हणाल ओ बोभाटावाले, आज तुम्ही दिवाळीच्या फराळात काय खाल्लं? पण सांगतोय ती गोष्ट एकदम खरी आहे . झालंच तर हे विमान खाण्यापूर्वी १८ सायकली-७ टिव्ही- ५०० मीटर लोखंडाची चेन खाण्याचे विक्रम पण त्याने केले होते. कोण होता हा इसम? जाणून घेऊ या हे असले प्रयोग करणार्या माणसाबद्द्ल!
मिशेल लोटिटो नावाचा हा माणूस त्याच्या या अचाट सवयीमुळे असाच प्रसिद्ध झाला. तो एक फ्रेंच करमणूककार होता. या बेट्याची करमणूक करण्याची शैलीही अजबच. काय होती ती? तर लोटीटो सामान्य माणूस खाऊ शकणार नाही अशा गोष्टी खात असे. त्याच्या खायच्या गोष्टींमध्ये लोखंड, काच, रबर यांचा समावेश असे. सायकल, सुपरमार्केट ट्रॉलीज, झुंबर, टीव्हीसेट, पलंग, कॉम्प्युटर, आयफेल टॉवरचा एक छोटा भाग, शवपेटी, याशिवाय चक्क एक विमानही या पठ्ठ्याच्या पोटात गेलेलं आहे!
त्याच्या या खाण्याच्या सवयीला 'पिका' नावाच्या मानसिक व्याधीची पार्श्वभूमी होती. या आजाराने ग्रस्त व्यक्ती या काहीच पोषणमूल्य नसणाऱ्या काच, धातू इत्यादी अशक्यप्राय आणि विचित्र वस्तूंचे सातत्याने सेवन करतात.
लोटिटोचा जन्म १५ जून १९५०चा. तो जन्माने फ्रेंच होता. त्याला आपल्या या विचित्र सवयीची जाणीव काचेच्या ग्लासमधून पाणी पीत असताना झाली. तो ग्लास त्याने तोडला आणि त्याचे छोटे तुकडे त्याने चावायला सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षीच त्याने लोकांची करमणूक करायला सुरुवात केली. वास्तविक धातू म्हणा किंवा काच, सामान्य माणूस ते पचवू शकणारच नाही. पण डॉक्टरांच्या मते लोटिटोच्या जठराच्या आणि आतड्याच्या जाड अस्तरामुळे त्याला धातू खाल्ल्यानंतरही विशेष त्रास झाला नाही. शिवाय त्याच्या शरीरातील पाचकरसही अतिशय शक्तिशाली होते. त्यामुळेच तो अनेक असामान्य पदार्थ लीलया जिरवू शकत असे. काही विषारी धातूंचं सेवन करूनही त्याच्यावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.
लोकांचं मनोरंजन करताना तो रोजच्या आहारातून १ किलो धातू खात असे. त्याआधी तो मिनरल ऑइल (आपण गाडीत टाकतो त्या मोबील ऑइलसारखे) पीत असे. शिवाय खाताना मधूनमधून भरपूर प्रमाणात पाणीही पीत असे. एका अंदाजानुसार १९५९ ते १९९७ या कालावधीदरम्यान लोटिटोने ९ टन धातू पचवला होता. त्याच्या पोटाच्या एक्स-रे मधून दररोज ९०० ग्रॅम धातू पचवण्याची त्याच्या आतड्यांची क्षमता होती हे आढळून आलं आहे. पण त्याने सांगितल्याप्रमाणे आपण खातो तसं मऊ अन्न (केळी, उकडलेली अंडी, बटाटे इ.) खाऊन मात्र तो आजारी पडत असे.
या गोष्टी खाण्याची त्याची एक विशिष्ट पद्धत होती. खाण्याआधी तो पुढ्यातील गोष्टींचे छोटे छोटे तुकडे करत असे. त्यानंतर मिनरल ऑइल पिऊन मग धातूचे तुकडे चावत असे. हे तुकडे गिळताना पाणी पीत असे. या दोन्ही गोष्टींचा फायदा त्याला एखाद्या लुब्रिकंटप्रमाणे धातूच्या चकत्या घशाखाली उतरवताना होई. १९७८ ते ८० या काळात त्याने सेसना -१५० हे विमान खाल्लं. पुढे जाऊन त्याच्या या आगळ्यावेगळ्या सवयीमुळे त्याला लोक 'मिस्टर इट ऑल' या नावाने ओळखू लागले. त्याच्या या 'हटके' टॅलेंट(!)ची दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनेही घेतली. गिनीज बुकमध्ये त्याच्या नावाची नोंद झाली. गंमत म्हणजे त्याबद्दल त्याला मिळालेलं पितळी स्मृतिचिन्हही त्याने खाऊन टाकलं.
एवढं सगळं वाचल्यावर, असलं काही चित्रविचित्र खाल्ल्यामुळे त्याला 'दुसऱ्या दिवशी सकाळी' (!) काही प्रॉब्लेम यायचा का? असा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविक आहे. पण तसं काहीही होत नसे.
पुढे २००७ मध्ये नैसर्गिक कारणांमुळे त्याचा मृत्यू झाला. यावरून तो खात असलेल्या गोष्टींमुळे त्याच्या शरीरावर कोणताही विपरीत परिणाम झाला नाही ही गोष्ट स्पष्ट झाली. अर्थात म्हणून असे अचाट प्रयोग कृपया कुणीही करू नयेत हे वेगळं सांगायला नको.
स्मिता जोगळेकर