निन्जा अभ्यास काय असतो आणि त्यात पदवी मिळवणारा हा आधुनिक निन्जा आहे तरी कोण ?
आज तरुण असलेल्या अनेकांना निन्जा हातोडी नक्कीच आठवत असेल. निन्जा हातोडीला बघून आपल्यालाही त्याच्यासारखं झाडावरून उड्या मारणं, पोहणं, अत्यंत वेगाने धावणं, वेगवेगळे वेश बदलणं, जमायला पाहिजे ही एक सुप्त इच्छा मनात आली असेलच. आपण फक्त विचार करत राहिलो. एका माणसाने तर चक्क निन्जा विद्येत मास्टर डिग्री मिळवली आहे. निन्जा स्टडीजमध्ये मास्टर डिग्री मिळवणारा तो जगातला पहिला पदवीधर ठरला आहे.
कोण आहे तो आणि हे निन्जा स्टडीज काय असतं जाणून घेऊया.
त्या व्यक्तीचं नाव आहे गिनीची मित्सुहाशी. निन्जा युद्ध कौशल्यावर अभ्यास करण्यासाठी त्याने २ वर्षं मध्य जपानच्या एका गावात अभ्यास केला आहे. जपानचा हा भाग home of the ninja म्हणून ओळखला जातो. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याला जपानच्या मी विद्यापीठातून मास्टर्स डिग्री मिळाली आहे.
त्याने या दोन वर्षात काय काय शिकलं ते पाहूया.
मुलभूत पातळीवरचं मार्शल आर्ट्स, जपानचं पारंपारिक लढाईचं कौशल्य, खडतर वातावरणात जगण्यासाठी लागणारी कौशल्ये आणि पर्वतारोहणाची कला या गोष्टींचा या अभ्यासात समावेश होता.
या अभ्यासाचं वैशिष्ट्य असं की त्याने फक्त पुस्तकी अभ्यास केला नाही, तर तो खरोखर निन्जाचं जीवन जगला. तो स्वतः म्हणतो की खरे निन्जा दिवसा शेतात राबायचे आणि संध्याकाळी सराव करायचे. हे त्याने फक्त वाचलंच नाही तर स्वतःही करून बघितलं. त्याने शेती केली आणि सोबत सरावही केला.
गिनीची मित्सुहाशी इथेच थांबणार नाहीय. तो आता पीएचडीचा अभ्यास करतोय. याखेरीज तो स्वतः निन्जा कौशल्ये शिकवतो. त्याने निन्जा विद्येत मास्टर डिग्री मिळवून एका नव्या अभ्यासाला सुरुवात करून दिली आहे.
निन्जा हा काय प्रकार असतो?
निन्जा हे जपानच्या संस्कृतीचा एक भाग होते. ते सिक्रेट एजंटसारखे काम करायचे. गुप्त पद्धतीने काम करणे, पाळत ठेवणे, गुप्तपणे हल्ला करणे, अशा प्रकारच्या कामांसाठी त्यांना तयार केलं जायचं. ही कामे सोपी नसल्यामुळे त्यांना वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करावी लागायची. ते अत्यंत चपळ असायचे आणि कोणत्याही खडतर परिस्थितीत जगण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असायचं. निन्जाचा इतिहास १२ व्या शतकापर्यंत मागे जातो.
भारी आहे ना? आपण भारतात असा कुणाबद्दलचा अभ्यासक्रम चालू करू शकतो? कमेंटबॉक्समध्ये आयडीयाज तर द्या..