शून्यापासून सुरुवात करून थेट इंग्लंडच्या प्रिन्सकडून कौतुकाची थाप मिळवणारा मराठी उद्योजक !!
मराठी माणूस उद्योग करू शकत नाही असा एक सर्वसाधारण समज आहे. पण या समजाला भेदून टाकणारे बरेच यशस्वी उद्योजक आपल्याला या राकट आणि दगडांच्या देशाने दिले आहेत. आज आम्ही अशाच एका उद्योजकाबद्दल सांगणार आहोत. ते उद्योजक आहेत शरद तांदळे!!
आज ते यशस्वी उद्योजक असले तरी उद्योग उभा करताना त्यांच्याकडूनही अनेक चुका झाल्या. स्वतः केलेल्या चुका दुसऱ्यांनी करू नये म्हणून मूलभूत गोष्टी ते नेहमी लोकांना कळकळीने समजावून सांगतात. शरद तांदळे हे स्वतः केलेल्या चुका प्रामाणिकपणे मान्य करणारे उद्योजक आहेत. आयुष्यात त्यांनी प्रचंड चढउतार बघितले, अनेक नकारही पचवले. पण या सगळ्या गोष्टी त्यांच्या यशासाठी एकेक पायरीचे काम करत होत्या.
इंजिनिअरिंग झाल्यावर नवनविन बिजनेस आयडियांच्या नावाखाली पैशांची उधळण, आई वडिलांची वेळोवेळी केलेली फसवणूक त्यातून कुटुंबासोबत झालेले वाद, नंतर प्रामाणिकपणे चुका मान्य करून जीवतोड मेहनत. तांदळे यांचे हे सर्व अनुभव बघितले तर कित्येक तरुणांना स्वतःची आठवण येईल. शरद तांदळेंचा भूतकाळ हा कित्येक तरुणांचा वर्तमानकाळ आहे. कॉलेजमध्ये राजकारण्यांच्या मागे फिरणे, विद्यार्थी आंदोलने करणे, मासिक सुरू करून आपण काहीतरी क्रांतिकारी करत असल्याच्या आविर्भावात फिरणे, दिवसेंदिवस नैराश्याकडे ढकलले जाणे, आयुष्यात काहीच उरलेले नाही अशा अवस्थेपर्यंत पोचून आत्महत्येचा विचार करणे अशाप्रकाराचा सर्वसामान्य मराठी तरुणाचा असलेला हा प्रवास आहे.
त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट म्हणावा असा प्रसंग म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर हलविण्याचे काम होते. हे काम कुठलाही कॉन्ट्रॅक्टर करायल तयार नव्हता. कारण त्यात फायदा नव्हता. ती संधी त्यांनी हेरली, काही मजुरांना घेऊन त्यांनी तो ट्रान्सफॉर्मर हलवला. मग जे काम कुणीही करत नव्हते अशी कमी फायद्याची कामे त्यांना मिळत गेली, आणि हळूहळू मग कामाचा पसारा वाढत गेला. जर त्यांनी फायदा नाही म्हणून ते काम केले नसते तर नंतर मिळालेली चांगली कामे त्यांना मिळाली नसती. यावरून आलेल्या संधीचे तुम्ही कसे सोने करता यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे, या म्हणीची प्रचिती येते. यातूनच मग बीडमधून पुण्यात नोकरीच्या शोधात आलेला एक तरुण शेकडो मुलांना रोजगार देतो, स्वतः सारखे २०० नविन उद्योजक उभे करतो, त्या तरुणाला इंग्लंडच्या प्रिन्सच्या हस्ते पुरस्कार मिळतो.. असा तरुण खऱ्या अर्थाने तरुणांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि काहीतरी शिकावे असा असतो.
यशस्वी होऊन देखील ते अनेक क्षेत्रात सक्रिय असलेले पाहायला मिळतात. त्यांचे म्हणणे आहे की आधी यशस्वी झाल्याशिवाय राजकारण किंवा समाजकारणात जाऊ नये. एकदा यशस्वी झाले की मग काय करायचे ते करायला तुम्ही मोकळे आहात. ही गोष्ट ते स्वतः जगले आहेत. इतरांना मदत करणे, तरुणांना आयुष्यात आणि करियरमध्ये मदत होईल यासाठी ते नेहमी कार्यरत असतात. त्यांनी काही वर्षांपूर्वी "रावण - राजा राक्षसांचा" नावाचे पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती देखील निघाली होती. नुकतेच त्यांनी 'द अंत्रेप्रेन्योर' नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी उद्योग कसा सुरू करायचा, त्याला कसा मोठा करायचा याबद्दल स्वतःच्या उदाहरणांवरून मार्गदर्शन केले आहे.
एक सामान्य नागरिक ते यशस्वी उद्योजक हा सगळा प्रवास त्यांनी त्यांच्या 'द अंत्रेप्रेन्योर'मध्ये मांडला आहे. हे पुस्तक म्हणजे एका सामान्य घरातल्या मुलाचा हा प्रवास आहे, त्यात त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, त्यांनी केलेल्या चुका, योग्यवेळी घेतलेले चांगले निर्णय ज्यांच्यामुळे ते उद्योगात यशस्वी होऊ शकले. त्यांच्या आयुष्यातील अशा कित्येक गोष्टी बघितल्या तर तुम्हाला उद्योगाबद्दल आणि एकंदरीतच आयुष्याबद्दल स्वच्छ दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.