computer

इंजिनियर्सचे अपहरण करून मेक्सिकोच्या ड्रग कार्टेलने रेडिओ नेटवर्क कसे तयार केले?

ड्रग तस्करी आणि ड्रग्ज वॉर जगजाहीर आहे. पाब्लो इस्कोबार आणि नार्कोस आठवत असेलच तुम्हांला. मेक्सिकोतही ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत ज्यांना हे कार्टेल संबोधतात. ड्रग्जच्या किंमतीपासून त्याच्या वितरणापर्यंतच्या सर्व गोष्टींवर या कार्टेल्सचेच नियंत्रण असते. इथल्या कार्टेल्सच्या ड्रग वॉरने आधीच लाखो लोकांचे रक्त सांडले आहे. ड्रग्ज व्यवसायातील मोठा डॉन 'एल चापो'ला अटक केल्यानंतर मेक्सिकोला लागलेली ही ड्रग तस्करीची कीड संपेल अशी अशा होती. पण इथे नेमके याच्या उलटेच होत आहे. मेक्सिकोतील ड्रग कार्टेल्सनी इथले पोलीस आणि लष्कर दोन्हींसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे.

या कार्टेल्सनी आपल्या गुप्त संदेशाची देवाणघेवाण करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र रेडिओ यंत्रणा उभारली आहे. यासाठी हे तस्कर तंत्रज्ञानात पारंगत असणाऱ्या इंजिनियर्सचे अपहरण करतात आणि त्यांच्याकडून आपल्याला हवी त्या पद्धतीची संदेशवहन प्रणाली तयार करून घेतात. विशेष म्हणजे या कार्टेल्सनी आजपर्यंत जितक्या इंजिनियर्सचे अपहरण केले आहे त्यातील एकही इंजिनियर्स त्यांच्या तावडीतून सुटून सहीसलामत परत आलेला नाही. त्यांचे पुढे काय होते हेही कुणाला कळत नाही.

कार्टेल्सनी उभारलेली ही रेडिओ यंत्रणा नष्ट करण्यासाठी मेक्सिकन लष्कर कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यांनी आजवर कार्टेल्सनी उभारलेले कित्येक टॉवर्स पाडले आहेत. तरीही आपली रेडिओ यंत्रणा सुरळीत चालवण्यासाठी हे पुन्हा त्यातील तज्ञ इंजिनियर्सचे अपहरण करून त्यांच्याकडून जबरदस्तीने आपले काम करवून घेतात. लष्कराच्या लाख प्रयत्नानंतरही त्यांची रेडिओ सेवा पूर्णतः विस्कळीत झालेली नाही.

२०११ मध्ये लष्कराने इथल्या एका कार्टेलचे रेडिओ नेटवर्क विस्कळीत केले होते. या एकाच नेटवर्कमध्ये १६७ रेडिओ अँटिनाज होते. असे वेगवेगळ्या कार्टेलचे वेगवेगळे नेटवर्क आहेत. २००९ च्या जानेवारीमध्ये जोस अँटोनिओ नावाच्या एका इंजिनियरचे अपहरण झाले होते. तो एका मेकॅनिक शॉपमधून गायब झाला. त्यानंतर अँटोनिओचे काय झाले हे आजतागायत कुणालाही माहिती नाही, अगदी त्याच्या घरच्यांनाही. नंतर या कार्टेलच्या सदस्यांना अटकही झाली तरीही अँटोनिओ मात्र परत आला नाही. २०११ मध्ये आयबीएम इंजिनियर असलेला अलेक्झांद्रो मोरेनोही असाच गायब झाला.

हे कार्टेल या इंजिनियर्सना गुलाम करून ठेवतात. फक्त रेडिओ टॉवरच नाही, तर आता लष्करी लोक संदेशवहनासाठी जसा वॉकीटॉकी वापरतात तशीच यांनी स्वतःची वॉकीटॉकी यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे आता त्यांचे फोन संभाषण वगैरे कशावरच सरकारला नियंत्रण ठेवता येत नाही. हे कार्टेल्स एखाद्या कॅन्सरप्रमाणे मेक्सिकोला पोखरत आहेत. रस्त्यांनी, समुद्रमार्गे किंवा कुठल्याच प्रचलित दळणवळण पद्धतीचा वापर करता येत नाहीत म्हणून हे जमिनीखाली शकडो फूट लांबीचे भुयार खोदून त्याद्वारे ड्रग्जचा सप्लाय करतात.

फक्त त्यांची रेडिओ यंत्रणा बंद पडल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येईल किंवा मेक्सिकोतून त्यांना हद्दपार करता येईल असे नाही. ड्रग कार्टेल्सची व्याप्ती आणि त्यांचे जाळे यांची पाळेमुळे यापेक्षाही अधिक खोलवर पसरलेली आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात तज्ञ असणाऱ्या तरुण इंजिनियर्सनाही हे कार्टेल सुखाने जगू देत नाहीयेत. यांच्यामुळे देशाच्या बौद्धिक संपदेलाही धोका निर्माण झाला आहे हे मात्र नक्की.

सबस्क्राईब करा

* indicates required