प्रोजेक्ट MK Ultra-१: माणुसकी शब्दाला कलंक अशा सीआयएच्या अघोरी कारस्थानाची कथा!!
तारीख: २८ नोव्हेंबर १९५३. (अ) वेळ मध्यरात्री नंतरची. स्थळः स्टेटलर हॉटेल, न्यूयॉर्क.
त्या रात्री अचानक वरच्या मजल्याच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा खळखळाट आणि काही सेकंदांतच हॉटेलच्या फूटपाथवर काहीतरी धप्पकन पडल्याच्या आवाजाने हॉटेलचा सिक्युरिटी गार्ड दचकून बाहेर पळाला. फूटपाथवर एका माणसाचा देह पडल्याचं लक्षात आल्यावर त्याने ओरडायला सुरुवात केली, "आपल्या गेस्टपै़की कोणीतरी वरून उडी मारली आहे." उडी मारणार्याचा जीव कधीच गेला होता. तोपर्यंत पोलीसही पोहचले होते. हॉटेलच्या गेस्ट रजिस्ट्रेशन कार्डवर दोन नावं होती. फ्रँक ओल्सन आणि रॉबर्ट लॅशब्रुक. पोलीस दहाव्या मजल्यावरच्या रुम नंबर 1018A पोहचले तेव्हा दार उघडेच होते. पोलीस आत घुसले.
रुमच्या बाथरुममध्ये डोकं गच्च धरून बसलेला माणूस पुटपुटत कापर्या आवाजात म्हणाला, "मी रॉबर्ट लॅशब्रुक. फ्रँक ओल्सनने उडी मारली, त्या आवाजाने मी जागा झालो"
(फ्रँक ओल्सन)
थोड्याच वेळात पोलिसांनी येऊन दुसर्या गेस्टला ताब्यात घेतले. काही वेळात त्याचे स्टेटमेंट घेतले गेले. उडी मारणार्याची ओळख पटवली गेली. फ्रँक ओल्सन- अमेरिकन लष्करासाठी काम करणारा शास्त्रज्ञ!
पोलीसांच्या कागदावर फ्रँक ओल्सनने उडी मारून आत्महत्या केली / तो खिडकीतून पडला इतकीच नोंद झाली. मोठमोठ्या शहरात अशा घटना नेहेमीच घडत असल्याने या नोंदीनंतर पोलीसांचा तपास इथेच थांबला. काही तासांतच सीआयएचे अधिकारी फ्रँक ओल्सनच्या घरी पोहोचले. कोणीतरी ही बातमी त्याच्या पत्नीला आणि मुलांना सांगायलाच हवी होती. ओल्सनचा देह इतका छिन्नविछिन्न झाला होता की त्याचे अंतिम दर्शन न घेण्याचा सल्ला त्याच्या कुटुंबियांना देण्यात आला. एका बंद शवपेटीत त्याचे दफन करण्यात आले.
(स्टेटलर हॉटेल, न्यूयॉर्क)
सीआयएचे अधिकारी फ्रँकच्या घराकडे निघाले होते, तेव्हाच त्या हॉटेलचा मॅनेजर या घटनेने अस्वस्थ झाला होता. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? त्याने टेलिफोन ऑपरेटरला विचारलं रुम 1018A मधून एखादा कॉल बाहेर केला गेला होता का? त्याकाळात म्हणजे १९५३ साली हॉटेलचे सर्व फोन ऑपरेटरच्या बोर्डातूनच पुढे जायचे. बर्याच वेळा ऑपरेटर हे फोन ऐकत असायचे. मॅनेजरचा कयास खरा होता. ऑपरेटरने तो कॉल ऐकला होता. रॉबर्ट लॅशब्रुकने न्यूयॉर्कच्या लाँग आयलंड मधल्या डॉ. अब्रामसनला फोन केला होता. फारच त्रोटक असे संभाषण ऑपरेटरच्या कानावर पडले होते.
लॅशब्रुक: "वेल, तो गेला"
डॉ. अब्रामसन: 'वेल, फारच वाईट झालं".
या संभाषणाचा अर्थ एकच होता. हे असे कधीतरी घडणार हे दोघांनाही माहिती होतं. सगळं काही विपरीत घडलं होतं. पण ते फक्त सीआयएला कळत होतं. फ्रँकच्या कुटुंबियांना तर त्याचा पत्ताही नव्हता.
अनेक दशकांनंतर या सर्व घटनेला एक वेगळंच वळण लागलं. फ्रँक ओल्सन फक्त लष्कराचा शास्त्रज्ञ नव्हता, तो सीआयएच्या एका अत्यंत गोपनीय प्रोजेक्टवर काम करत होता. हा प्रोजेक्ट फक्त गोपनीयच नाही तर अमानवी,अमानुष होता. अमेरिकन सरकारला त्याचा पत्ताही नव्हता. हो, आणि पत्ता लागणार तरी कसा? कारण तो अमेरिकेच्या राक्षसी महत्वाकांक्षेचा काळा कोंब समजल्या जाणार्या सीआयएचा प्रोजेक्ट होता. सीआयएचा हा हिडीस चेहेरा अनेक वेळा जगासमोर आला आहे. पण सीआयएच्या कारवायांवर लगाम घालण्याचं धाडस आजपर्यंत एकही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दाखवू शकलेला नाही. त्याचं कारणही सोपं आहे, सत्ता टिकवून ठेवायची असेल तर सीआयएसारखा सैतान दिमतीला हवाच.
आजपर्यंत सीआयएच्या अनेक अघोरी कृत्यांची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली गेली आहेत. फ्रँक ओल्सनची कथा म्हणजे सीआयएच्या शेकडो अघोरी आख्यानातला एक अध्याय आहे. गरज भासल्यास अमेरिका आपल्या नागरिकांचा पण बळी देते याची साक्ष देणारं हे प्रकरण आहे.
'बोभाटा'च्या येणार्या लेखमालिकेतून फक्त फ्रँक ओल्सनची कथा आम्ही सांगणार आहोत. ही कथा गुंतागुंतीची आहे. सीआयएच्या बोचक्यातून एक चिंधी ओढली तर त्यासोबत दहा घाणेरड्या धांदोट्या कशा बाहेर येतात ते पण आपण वाचणार आहोत. निमित्त फक्त फ्रँक ओल्सनच्या आत्महत्येचं झालं. त्यानंतर जगासमोर आला सीआयएचा निव्वळ तिरस्करणीय प्रोजेक्ट- एमके अल्ट्रा!
क्रमशः
प्रोजेक्ट MK Ultra-२: भेटा CIA च्या अमानुष एमके अल्ट्राला जन्म देणाऱ्या अॅलन डलेसला !!
प्रोजेक्ट MK Ultra-३: काळ्या विद्येचा जादूगार सिडनी गॉटलीबने केले लोकांवर अमानुष रासायनिक प्रयोग!!